
Sugarcane Farming : उस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर करावा. पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार खतांची मात्रा द्यावी. आडसाली हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा १६ ते १८ महिन्यांचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत तीन वर्षे राहते.
या तिन्ही वर्षी उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक असते. ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो. ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतर पीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे.
रासायनिक खतांचा वापर करताना प्रतिहेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश अशी शिफारस आहे. मात्र, ही खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. माती परिक्षमामुळे जमिनीचा सामू, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची स्थिती कळते.
को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची २५ टक्के जास्त मात्रा म्हणजेच ५०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे.शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्र खताची मात्रा चार हप्त्यात विभागून द्यावी. जमीन हलकी असेल तर नत्र पाच-सहा वेळा विभागून द्यावे.
उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा.
उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे.
लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही आणि ती देऊही नयेत, दिल्यास त्याचा उसाच्या रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.
खतांची निवड करताना नेहमी सरळ खतेच निवडावीत. मिश्र खते अथवा संयुक्त खते वापरावयाची झाल्यास लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळीच वापरणे योग्य असते.
खतांचा वापर करताना
रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांच्या साहाय्याने द्यावीत.
उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा.
रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.
स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्टरी २.५ लिटर द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
लागवडीची खत मात्रा शेणखतात मिसळून द्यावी. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपयुक्तता वाढून ती पिकास लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.
खत मात्रा ठिबक संचाद्वारे दिल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि खर्चात बचत होते.
--------------
माहिती आणि संशोधन - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे
(An initiative by Salam Kisan.)
(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.