
डॉ. आर. जी. सोमकुंवर
Grape Farming : गेल्या आठवड्यातील वातावरणाचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचे समजते. येत्या आठवड्यातसुद्धा वेधशाळेच्या अनुमानानुसार पाऊस राहील, असे बोलले जाते. सध्या सुरू असलेल्या ढगाळी वातावरण आणि वाढते तापमान यांचा विचार करता, येता आठवडा नक्कीच पावसाचा राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमध्ये आपल्याकडे बागेत जे वातावरण आहे, त्यामध्ये आपल्याला बागेतील विविध स्थितींमध्ये पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील.
कलम केलेली बाग ः
या महिन्यात कलम करण्यासाठी पुढील दहा दिवस फार महत्त्वाचे आहेत. या वेळी बागेत तापमान (३५ ते ३६ अंश सेल्सिअस) वाढलेले दिसून येईल. आर्द्रता ही ८० टक्क्यांपुढे गेलेले असेल. ही परिस्थिती कलम केलेल्या बागेत कलमजोड मजबूत होण्यासाठी कॅलस तयार होण्यासाठी पोषक आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कलम करून घ्यावे. पुढील काळात तापमान कमी होण्याची शक्यता असेल. असे झाल्यास कलमकाडीवरील डोळे फुटण्यास अडचणी येतील. कलमजोडही पाहिजे त्या प्रमाणात लवकर मजबूत होणार नाही. वातावरणातील परिस्थितीनुसार खुंटकाडीमध्ये रस वहनाची प्रक्रिया कमी अधिक होत असते. तेव्हा सध्याच्या पोषक परिस्थितीचा फायदा घेऊन पुढील कार्यवाही करता येईल.
१) कलम यशस्वी होण्यासाठी सायनकाडी पूर्ण परिपक्व असणे गरजेचे आहे. पीथ तपकिरी असलेल्या परिपक्व काडीचा वापर करावा. बऱ्याच वेळा बागेत बोर्डो व पोटॅशची फवारणी केल्यानंतर काडी बाहेरून परिपक्व झालेली दिसते. मात्र काडीतील पीथ कच्चा असेल. अशा स्थितीमध्ये अन्नद्रव्याचा साठा कमी असल्यामुळे कलम केल्यानंतर डोळा लवकर फुटून निघेल व दोन ते पाने होताच फूट सुकायला लागेल.
२) ज्या बागेत कलम करून नवीन फुटी सहा ते सात पानांच्या झाल्या आहेत, अशा बागेत येत्या आठवड्यात करपा आणि डाऊनी मिल्ड्यू या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असेल. कोवळ्या फुटीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानांवर लहान आकाराचे बारीक ठिपके दिसतात. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत ठिपक्याचे रूपांतर छिद्रामध्ये होते. याचवेळी रोगाचे बीजाणू काडीच्या आत प्रवेश करतात. जुन्या बागेत कोवळ्या फुटीवर करपा आल्यास आपण फुटी काढून टाकण्याची शिफारस करतो. परंतु इथे तसे चालणार नाही. या रोगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल.
डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झालेल्या फुटींवर तळात काळा डाग दिसून येईल. पानाच्या खालील बाजूस या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. अशा वेळी पानाच्या वरील बाजूस पिवळसर तेलकट डाग दिसून येतील. या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक उदा. कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी. या रोगाच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण एकदा काडीमध्ये करपा शिरल्यास किंवा डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू काडीच्या आत गेल्यास पुढील काळात फेब्रुवारीमध्ये रिकट घेतल्यानंतर सुद्धा अडचणीचा सामना करावा लागतो. काही परिस्थितीत यशस्वी झालेले कलमही काढून टाकावे लागते.
३) कलम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे खुंटकाडी ही कोवळी अर्ध परिपक्व व रसरशीत असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बागेत खुंट रोपाच्या बऱ्याचशा फुटी (नवीन व जुन्या) आहेत, अशा ठिकाणी जुन्या फुटी काढून घ्याव्यात. अर्ध परिपक्व ते जवळपास कोवळ्या काडीची कलम करण्यासाठी निवड करावी. पूर्ण परिपक्व झालेल्या काडीमध्ये रसनिर्मिती कमी असून, त्याचे वहनही हवे तितके होत नाही. त्यामुळे कलमजोड यशस्वी होण्यास उशीर लागतो किंवा होतच नाही.
जुन्या बागेत छाटणीपूर्वी पानगळ ः
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फळछाटणीची सुरुवात केली जाते. फळछाटणी होण्यापूर्वी पानगळ करून घेणे महत्त्वाचे असते. फळछाटणीनंतर निघालेल्या फुटींवर असलेल्या घडांची एकसारखी वाढ होण्याच्या दृष्टीने जीए ३ ची फवारणी करतो. एकाच वेळी जर सर्व फुटी निघून घडही एकाच अवस्थेत असल्यास घडाच्या विकासाचे नियोजन सोपे होते. त्यासाठी प्रत्येक काडीवरील डोळा एकाच वेळी फुटणे गरजेचे आहे. पानगळ केल्यानंतर हे शक्य होते. द्राक्ष बागेमध्ये पानगळ माणसांच्या साह्याने हाताने किंवा इथेफॉन या रसायनाचा वापरातून केले जाते.
रसायनाचा वापर करण्यापूर्वी द्राक्षवेलीला किमान पाच ते सहा दिवसांचा पाण्याचा ताण बसणे गरजेचे असते. पानगळ करण्यापूर्वी बागेचा आढावा घेताना भुरी किंवा डाऊनी मिल्ड्यू या रोगांच्या प्रादुर्भावामुळे आधीच बऱ्यापैकी (३० ते ६० टक्क्यांपर्यंत) पानगळ झालेली दिसून येते. तेव्हा बागेत कॅनॉपी किती आहे, याचा अंदाज घेऊन रसायनाची मात्रा ठरवावी. साधारणतः पूर्ण कॅनॉपी असलेल्या बागेत पाचशे लिटर पाणी प्रति एकर लागेल. तर तीस टक्के पानगळ झालेल्या बागेत चारशे लिटरपर्यंत पाणी लागेल. पाण्याचा ताण बसलेल्या स्थितीमध्ये फवारणी करतेवेळी इथेफॉन अडीच ते तीन मि.लि. अधिक ०-५२-३४ हे खत पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करावे. या वेळी द्रावणाचा सामू अडीच ते तीनपर्यंत पोहोचेल.
फवारणीनंतर जवळपास चौथ्या दिवशी वेलीचे एक ते दोन पान खाली पडलेले दिसून येईल. तर दहा ते अकरा दिवसापर्यंत पाने पूर्णपणे गळून काडी उघडी झालेली दिसेल. पुढील चार ते पाच काडी पूर्ण उघडी राहिल्यास डोळे एकसारखे फुटण्यास मदत होईल. बऱ्याचदा फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस येतो, त्यामुळे पानगळ होण्यास अडचण येते. अशा वेळी पुन्हा एकदा तितक्याच मात्रे इथेफॉनची फवारणी करून घ्यावी.
ही फवारणी जमीन वाफशात आल्यानंतर केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. पानगळ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने रसायनाच्या फवारणीचे कव्हरेज महत्त्वाचे असेल. या वेळी पाने जुनी झालेली असून, त्यांची द्रावण शोषण्याची क्षमता कमी असेल. अशा स्थितीमध्ये एकतर सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. अशा वेळी बागेत आर्द्रता वाढलेली असल्यास द्रावणाचे शोषण चांगले होईल.
३) डोळे तपासणी व फळछाटणी ः
फळछाटणी करण्यापूर्वी आपल्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती काडीच्या नेमक्या कोणत्या डोळ्यात आहे, हे पडताळून पाहणे गरजेचे असते. यासाठी डोळे तपासणी महत्त्वाची ठरते. फळछाटणीच्या एक ते दोन दिवस आधी बागेत प्रत्येक जाडीच्या (६ ते ८, ८ ते १० व १० ते १२ मि.मी.) सबकेन व सरळ काडी गोळा कराव्यात. प्रत्येक जाडीच्या पाच ते सहा काड्या तळातील एक डोळा राखून काढाव्यात. या काड्या ओल्या गोणपाटात गुंडाळून प्रयोगशाळेत पाठवाव्यात.
डोळ्यातील सूक्ष्मघड निर्मितीची पडताळणी करून घ्यावी. सूक्ष्मघड निर्मितीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी आपल्या मागील अनुभवाचा फायदा घ्यावा. उदा. सरळ काडी असलेल्या बागेत साधारणतः ६, ७ आणि ८ या डोळ्यांतील पेऱ्याचे अंतर कमी झालेले दिसून येईल. या ठिकाणी सूक्ष्मघड निर्मिती चांगली असते. तेव्हा फळछाटणी घेतेवेळी हे डोळे राखून छाटणी घ्यावी. सबकेन केलेल्या बागेत सबकेनच्या शेजारी गाठ तयार झालेली असेल. डोळा जाड दिसेल. या डोळ्याला ‘टायगर बड’ असेही म्हणतात. फलधारणेच्या अनुषंगाने विचार करता हा डोळा महत्त्वाचा आहे. या गाठेच्या शेजारी निघालेली बगलफूट म्हणजेच ‘सिंगल सबकेन’ होय. या फुटीवर सुरुवातीस दोन पेरे एकदम निमुळते दिसून येतील. हे पेरे राखून छाटणी घेतल्यास सूक्ष्मघड निर्मितीची खात्री मिळते.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.