Mulching Benifit: फळबागेत मल्चिंग करणे का आवश्यक आहे?

बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन (Mulching) फायदेशीर ठरते. आच्छादनाचे प्रामुख्याने सेंद्रिय आच्छादन आणि प्लॅस्टिक आच्छादन असे दोन प्रकार पडतात.
Fruit Orchard
Fruit OrchardAgrowon

कोरडवाहू फळझाडांची (Fruit Orchard) वाढ प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. साधारणपणे उन्हाळ्यात (Summer Season) कडक उन्हामुळे जमिनीतील उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होते. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या काळात प्रतिदिन साधारणपणे ७ ते ८ मि.मी. पासून १४ ते १५ मि.मी. पर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होते.

बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन (Mulching) फायदेशीर ठरते. आच्छादनाचे प्रामुख्याने सेंद्रिय आच्छादन आणि प्लॅस्टिक आच्छादन असे दोन प्रकार पडतात.

फळबागांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाच्या खोडाभोवती किंवा जमिनीवर आळ्यात गवत, पालापाचोळा किंवा प्लॅस्टिक यांचा वापर आच्छादन म्हणून करता येतो. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

आच्छादनाचे फायदे ः

- बाष्पीभवनामुळे (Evaporation) जमिनीतील सुमारे ७० टक्के ओलावा निघून जातो. त्यासाठी आच्छादन फायदेशीर ठरते.

- आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याची बचत होते.

- पाऊस व वारा यापासून जमिनीची होणारी धूप थांबते.

- तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

- झाडांना अतिरिक्त ताण बसत नाही. त्यामुळे झाडाची उत्पादकता, फळांचे उत्पादन आणि दर्जा सुधारतो.

- खतांचा व पाण्याचा वापर योग्यप्रकारे करता येतो.

- आच्छादनामुळे झाडाभोवती सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाचे क्रिया वेगाने आणि सुरळीत पार पडते.

- नैसर्गिक घटक असलेले आच्छादन वापरल्यामुळे कालांतराने त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होऊन सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते.

Fruit Orchard
Banana Crop Insurance : फळबाग पडताळणीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा सव्वा कोटी रुपये हप्ता जप्त

आच्छादनाचे प्रकार ः

१) सेंद्रिय आच्छादन ः

शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत, सोयाबीनचे काड, साळीचा भुसा, उसाचे पाचट आणि तुरकाडी इ.

२) कृत्रिम आच्छादन ः

प्लॅस्टिक (पॉलिथिन)

प्लॅस्टिक आच्छादन ः

१) काळ्या रंगाचे आच्छादन ः

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी तसेच तणांची वाढ रोखण्यासाठी याचा वापर होतो.

२) परावर्तन करणारे प्लॅस्टिक आच्छादन

- या प्रकारच्या आच्छादनामुळे झाडाभोवतीचे तापमान कमी ठेवण्यास मदत होते.

३) पारदर्शक प्लॅस्टिक आच्छादन ः

मातीचे तापमान वाढविण्यासाठी तसेच माती निर्जंतुक करण्यासाठी वापर होतो. तसेच तणांच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडते.

वापराची पद्धत ः

- शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत तसेच सोयाबीनचे काड व उसाचे पाचट यांचा ५ टन प्रति हेक्टर प्रमाणे वापर करावा. दोन ओळींत जमिनीवर पसरावे किंवा रोपाच्या खोडाभोवतीचे तण काढून सर्व बाजूंनी सुकलेले गवत किंवा काडीकचरा पसरून घ्यावा.

- आच्छादन करताना जमिनीत ओलावा असावा.

- वाळलेले गवत किंवा धसकटे पेटवताना कलमांना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.

- प्लॅस्टिक आच्छादन वापरताना झाडाच्या आळ्याच्या आकाराची साधारणतः १ ते २ मीटर व्यासाची फिल्म गोलाकार किंवा चौकोनी कापावी.

फिल्मबरोबर मध्यभागी खोडासाठी खोडाच्या आकाराचा काप घ्यावा. त्यानंतर खोड मध्यभागी राहील याप्रमाणे काप घेतलेल्या भागातून ती पसरावी. त्यानंतर फिल्म सर्व बाजूंनी मातीने झाकून घ्यावी.

बी. जी. म्हस्के, ९०९६९६१८०१ (बी. जी. म्हस्के हे सहायक प्राध्यापक, तर डॉ. एन. एम. मस्के हे प्राचार्य म्हणून एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, जि. औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com