हळद प्रक्रियेसाठी वापरा ‘आयआयएसआर प्रगती’ वाण

महाराष्ट्रात नगदी पिकांना पर्यायी म्हणून हळद या पिकाकडे शेतकरी वळत आहेत. यातूनच सन २०२१-२२ मध्ये भारतामध्ये हळद लागवड क्षेत्र व उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकाचे राज्य बनले आहे.
Turmeric Processing
Turmeric ProcessingAgrowon
Published on
Updated on

महाराष्ट्रात नगदी पिकांना पर्यायी म्हणून हळद (Turmeric) या पिकाकडे शेतकरी (Turmeric Farming) वळत आहेत. यातूनच सन २०२१-२२ मध्ये भारतामध्ये हळद लागवड क्षेत्र (Turmeric Acreage) व उत्पादनामध्ये महाराष्ट्र (Turmeric Production) अव्वल क्रमांकाचे राज्य बनले आहे. हळदीचा वापर (Use Of Turmeric) हा प्रामुख्याने खाण्यासाठी आणि उद्योगधंद्यासाठी उदा. औषध निर्मिती, नैसर्गिक रंगनिर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग, सौंदर्यप्रसाधन निर्मिती, इ. उद्योगांमध्ये केला जातो.

हळदीमधील कुरकुमीन या घटकांमुळेच जागतिक बाजारपेठेमध्ये हळदीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खाण्यासाठी वापरात येत असलेल्या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण प्रामुख्याने दोन ते पाच टक्के असते, तर उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण हे पाच टक्क्यांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

कुरकुमीन या घटकाचे हळदीमधील प्रमाण हे प्रामुख्याने जातीचा गुणधर्म, वातावरण, हवामान, लागवडीच्या व्यवस्थापनाच्या विविध पद्धती, प्रक्रियांचा प्रकार, साठवणूक अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. कुरकुमीनची स्थिरता सुद्धा हळद लागवडीमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे.

  • -भारतामध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त कुरकुमीन असलेल्या जातीमध्ये प्रामुख्याने उत्तर पूर्व भारतातील लकाडॉंग (८ %), मेघा (७.५ %), रोमा (६.० %), राजेंद्र सोनिया (७.५ %), आयआयएसआर प्रगती (५.०२ %), फुले स्वरूपा (५.१४ %) इ. जातींचा समावेश होतो.

  • -कुरकुमीनचे प्रमाण हे ७५ टक्के जातीपरत्वे तर २५ टक्के हे हवामान व व्यवस्थापन यावर अवलंबून असते. या जातींमध्ये महाराष्ट्रामध्ये ४.५ % ते ५.५ % च्या दरम्यान कुरकुमीन आढळते.

  • -महाराष्ट्रामध्ये हळदीचे बियाणे बदलाचे प्रमाण हे १० टक्के पेक्षा कमी आहे. पारंपरिक बियाणे लागवडीकडेच शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर ‘सेलम’ या वाणाची लागवड केली जाते. याचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठीच्या हळदीमध्ये केला जातो. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण हे ३.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान आढळते. परंतु औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मागणीनुसार नवीन जातींचा लागवडीसाठी विचार होणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्यपूर्ण वाण ः

नुकत्याच झालेल्या सन २०२१ २२ च्या संशोधन आढावा बैठकीमध्ये हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांसाठी हळदीपासून जास्तीत जास्त कुरकुमीन आणि सुगंधी तेलाचे उत्पादन मिळवण्यासाठी ‘आयआयएसआर प्रगती (ACC ४८)’ या वाणाची शिफारस केली आहे.

कुरकुमीनच्या स्थिरतेच्या दृष्टीने भारतीय मसाला पिके संशोधन संस्था, कालिकत, केरळ येथे हा वाण २०१७ मध्ये निवड पद्धतीने विकसित केला आहे. तेथून प्रसारित झालेल्या ‘आयआयएसआर प्रगती’ या वाणाची लागवड महाराष्ट्रातील हवामानात केल्यास त्यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त कुरकुमीन मिळत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा वाण औद्योगिक वापराच्या दृष्टीने लागवडीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

  • -महाराष्ट्रामध्ये हळद लागवडीखालील क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सिंचनाच्या पाण्याचे दुर्भिक्ष असते. अशा क्षेत्रांमध्येही लागवड करण्यासाठी हा वाण अत्यंत योग्य आहे. कारण हा वाण १८० दिवसांमध्ये तयार होतो. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास पुढील दोन महिने फक्त संरक्षित पाणी द्यावे लागते. पुढे उन्हाळ्यामध्ये या वाणास पाण्याची फारशी गरज भासत नाही.

  • -या वाणापासून ओल्या हळदीचे सरासरी ३८ टन प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. कमाल ५२ टन प्रति हेक्‍टर एवढे उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे.

  • -या वाणामध्ये कुरकुमीनचे प्रमाण ५.०२ टक्के आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील वातावरणामध्येही ते स्थिर राहते. किंवा काही भागांत त्यापेक्षाही जास्त कुरकुमीनचे प्रमाण आढळते. ओलिओरेझीनचे प्रमाण १५.२९ टक्के आणि सुगंधी तेलाचे प्रमाण

  • ६.३ टक्के आढळते. सोळा ते वीस टक्क्यांपर्यंत उतारा मिळतो.

  • -हा वाण सूत्रकृमींना प्रतिकारक्षम आहे.

या वाणाचे गुणधर्म :

  • सरासरी झाडाची उंची - १०४ सेंटिमीटर

  • सरासरी पानाची लांबी व रुंदी -४९ × १३.३ सेंटिमीटर

  • सरासरी फुटव्यांची संख्या- ३.५ प्रति झाड

  • गाभ्याचा रंग - नारंगी

  • सरासरी पानांची संख्या - १५.८७ प्रति फुटवा

  • सरासरी गड्ड्यांची संख्या - तीन

  • सरासरी प्रति झाड उत्पादन - ५७७.९३ ग्रॅम.

प्रक्रियेसाठी प्रगती या वाणाची वाढती मागणी पाहता या वाणाची लागवड महाराष्ट्रामध्ये वाढेल अशी अपेक्षा आहे. या वाणाच्या शुद्ध बियाण्याची उपलब्धता भारतीय मसाला पिके संशोधन संस्था, केरळ यांच्याकडून किंवा त्यांनी परवाना दिलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून होऊ शकते. परवाना प्राप्त शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्या अशा -

  • -कसारिन बाबू, नेचर ॲग्रो प्रोड्यूसर, गुंटुर, आंध्र प्रदेश.

  • -पिडीक्ती आझाद, गुंटूर, आंध्र प्रदेश.

  • -मुकेश चौराधिया, छत्तीसगड

  • -राम प्रसाद रेड्डी, संगारेड्डी, मेडक, तेलंगण

  • -मोहम्मद अख्तर, आदिलाबाद, तेलंगण

संपर्क ः ०४९५ - २७३०७०४

-भारतीय मसाला पिके संशोधन संस्था, कोझिकोड, कालिकत, केरळ.

जितेंद्र कदम, ९४२१३९२६६८ (सहयोगी प्राध्यापक, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान पदव्युत्तर संस्था, किल्ला, ता. रोहा, जि. रायगड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com