बांधावरची झाडे

बांधावरची झाडे हे दुर्लक्षित प्रकरण आहे. वृक्षारोपण करताना विदेशी झाडे न लावता फणस, म्हाळुंग, भोकर, कांचन यांसारख्या उपयुक्त व देशी झाडांची निवड करणे सुज्ञपणाचे ठरेल.
Tree
TreeAgrowon
Published on
Updated on

बांधावरची झाडे (भाग १)

बांधावरची झाडे हे दुर्लक्षित प्रकरण आहे. वृक्षारोपण करताना विदेशी झाडे न लावता फणस, म्हाळुंग, भोकर, कांचन यांसारख्या उपयुक्त व देशी झाडांची निवड करणे सुज्ञपणाचे ठरेल.

पारूबाई फणसाची भाजी छान बनवायची. कोवळ्या फणसाचे विळ्याने कापून मोठे तुकडे करून ते ती उमवून घ्यायची. हे उकडलेले तुकडे पाट्यावर ठेचून घ्यायची. नंतर त्यात कांदा, मिरची घालून कढईत परतवायची. कसली चवदार भाजी व्हायची! कधी कधी गरम मसाला वापरून मटणासारखी रस्साभाजी बनवायची. तिच्या दारात मोठे डेरेदार फणसाचे झाड आहे. त्या दुर्गम आदिवासी वाडीवर भर उन्हात फणस हाताशी असायचे. हे झाड (Tree) पाहिले की मला मोठी गंमत वाटते. मोठे डेरेदार, हिरव्यागर्द पर्णसांभाराने नटलेले हे झाड. दाट सावली पडते याची. ओबडधोबड खोडावर जेव्हा फणस लटकतात, तेव्हा एखाद्या लेकुरवाळीच्या कडेवर, पोटावर मुले असावीत तसे हे झाड (Tree) मला भासते. खोडावर लागलेले ही फणसफळे कधी मोठ्या-मोठ्या आकाराची तर कधी द्राक्षाच्या घडांसारखी.

Tree
शेतजमिनींवर वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी ''बांध तिथे झाड योजना"

पिकलेल्या फणसाचे गरे खायला मस्तच असतात. पण याच्या बिया (Seeds) उकडून खाणे हे कोण चवदार प्रकरण! विशेषतः लहान मुलांचे भलतेच आवडते. फणसाचे चिप्स, फणसाच्या पुऱ्या हेही पदार्थ खाण्यास उत्तम लागतात. प्रत्येक कुटुंबाकडे किमान दोन ते पाच फणसाची झाडे असावीच असावी. त्यासाठी चांगल्या देशी फणसाच्या बियांची निवड करावी. त्याची रोपे बनवून लावली तर ती जास्त काळ टिकतात. तसे तर फणसाची रोपे कोणत्याही नर्सरीत सहज मिळतात. बियांपासून तुम्हीही रोपे (Plant) बनवू शकता. फणस खाऊन उरलेल्या बिया सांभाळून ठेवा. पावसाळ्यात कुजलेल्या पालापाचोळ्यात या बिया दडपून ठेवा. या पालापाचोळ्याला गावातले लोक ‘कुहीटा’ असे म्हणतात. माती घालू नका. पावसाळा संपला की त्याला थोडासा पाण्याचा शिपका देत राहा. वर्षभरात चांगली रोपे तयार होतात. नंतर ही रोपे तुम्ही शेताच्या (Farm) बांधावर, अंगणात लावू शकता. शेताच्या (Farm) बांधावरच्या झाडांपासून चार-पाच वर्षांत चांगले उत्पन्न मिळते.

“फणसाच्या मुळ्या गोड असतात, त्यामुळे उंदीर-घुशी त्या कुरतडतात. त्यामुळे वाढलेले झाड मरते,” गावकरी सांगत होते. त्यावर उपाय असा की झाडाच्या (Tree) बुंध्याशी साफसफाई करून ऐचण असणार नाही हे पाहावे. दुसरा पर्याय म्हणजे बुंध्याच्या आसपास कोरफडीसारख्या वनस्पती लावाव्यात असेही एकाने सुचवले. योग्य काळजी घेतली तर जंगल भागात देखील फणसाची वाढ चांगली होते.

Tree
फणस आणि हिरव्या मिरचीची धुब्री ते दुबई निर्यात

दुर्मीळ म्हाळुंग
म्हाळुंग हे लिंबासारखेच असणारे आपल्याकडील दुर्मीळ देशी झाड. ‘ई ई ईडलिंबूचा’ असे आपण लहानपणी शिकलो. भारतात लिंबाच्या (Lemon) एकूण ६८ प्रजातींची माहिती उपलब्ध आहे. या सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे ते म्हाळुंग. बहुतेक याचा वापर खूप प्राचीन काळापासून माणसाने केला असावा. कारण इजिप्तमध्ये झालेल्या एका संशोधनात पुरातत्व खात्याला याच्या बिया (Seed) सापडल्यात. मूळचे भारतातीलच हे फळ असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. इथून नंतर ते पर्शिया म्हणजे आताच्या इराणमध्ये गेले असावे. भारतात मात्र ईशान्येकडील राज्ये, मध्य भारत आणि पश्‍चिम घाटात ही झाडे सापडतात. मूतखड्यासारख्या आजारासाठी हमखास म्हाळुंगाचा वापर केला जातो.

आयुर्वेदानुसार म्हाळुंगाचा उपयोग रुचीकर व पित्तशामक आहे. जिव्हा, कंठ व हृदय यांना ते शुद्ध करते. हे फळ जितके जास्त जुने तितके खावयास चांगले, असे मानले जाते. याच्या सालीला खूप उग्र दर्प असतो. चीनसारख्या देशात या वासामुळेही म्हाळुंग लोकप्रिय आहे. तेथे उपहारगृहांत टेबलवर म्हाळुंग ठेवले जाते. वेगवेगळ्या प्रांतांत हे फळ खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पाक, सरबत, मुरब्बा आणि लोणचे या स्वरूपात हे फळ खाल्ले जाते. म्हाळुंगाच्या फोडी करून मधात बुडवून ठेवून त्याचा मुरब्बा करतात. त्यामुळे त्यातील कडूपणा कमी होतो. “याच्यात सुई टोचून ठेवली तर त्याचेही पाणी होते. त्यामुळे मूतखड्यासारखा आजार याने लवकर बरा होतो,” असे गावकरी सांगतात. या आजारावर रामबाण उपाय म्हणून म्हाळुंगाचे संवर्धन गावोगावी होते. सुईचे पाणी झालेले मी तरी पहिले नाही; पण या आजारासाठी १०० ते ३०० रुपयांपर्यंत एक म्हाळुंग विकले जाते किंवा फळांची चोरी होते. कारण पारंपरिक औषधांमध्ये म्हाळुंग हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या झाडाची लागवड बांधावर करायला हवी. काही ठरावीक ठिकाणे सोडली तर ही झाडे (Tree) तशी सहजी कुठे बघायला मिळत नाहीत. पक्व झालेल्या म्हाळुंगाच्या बिया काढून, व्यवस्थित सुकवून ठेवाव्यात. याच बियांपासून रोपे बनवता येतात.

भोकरीची ‘फूड सिक्युरिटी’
परोपकार, प्राणिमात्रावरची माया प्रतीत करावयाची असेल तर भोकरीचे झाड लावून मोठे करावयास हवे. भोकर हे एक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय झाड. मध्यम आकाराचे, वर्षभर हिरवे असणारे, जलद वाढणारे व पाण्याची टंचाई सहन करणारे. या झाडाची पाने व फळे चवीला बरेच गिळगिळीत असतात. फळे (Fruits) व पानांमध्ये गोंदासारखा चिकट पदार्थ असतो. पिकलेले फळ फोडले तर अगदी शेंबूड दिसावा असे. पण ही फळे खायला फारच गोड लागतात.

ऐन चैत्राच्या उन्हात भोकरीच्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटते. त्यानंतर लगेच मोहर व फळे लागतात. फळे चांगलीच टपोरी व छोट्या सुपारीच्या आकाराची. कच्ची असताना हिरवी, पिकल्यावर रंग बदलतो. म्हणजे एका प्रजातीत पिकलेली फळे चमकदार मोतिया-पिवळसर रंगाची बनतात, तर दुसऱ्या प्रजातीची फळे ही चमकदार गुलाबी रंगाची. याला गोंदण असेही म्हणतात.

भर उन्हाळ्यात हमखास भाजी देणारे झाड (Tree) . कोवळ्या पानांचे मुटके, भाजी तर खाल्ली जातेच. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या मोहराची भाजी सुद्धा मस्त लागते. त्यानंतर येणाऱ्या कच्च्या फळांची भाजी खाल्ली जाते. ही कच्ची फळे फोडून सुकवून ठेवली जातात. नंतर पावसाळ्याच्या दिवसांत त्यांची भाजी करता येते. खराब पाण्यामुळे पोट बिघडले तर या भाजीमुळे तेही बरे होते, असे म्हणतात. पिकलेल्या फळांचे सरबत बनवतात. ते शरीराला थंडावा देणारे आहे.

शेळ्या-गायींना हा पाला व फळे (Fruits) खायला खूप आवडते. भर उन्हाळ्यात याची गोड-रसदार फळे जंगली प्राणी, पक्षी यांच्यासाठी मेजवानीच असते. विशेषतः ससे, हरणे झाडाखाली पडलेली फळे खातात. पक्षी फळे खाऊन याच्या बियांचा प्रसार करतात. पावसाळ्यात आपल्याला भोकरीची रोपे उगवलेली दिसतात. त्या रोपांची लागवड योग्य ठिकाणी करून ही झाडे वाढवता येताता. जून-जुलैनंतर झाडाला पिकलेली फळे असतात. त्याच्या बिया जमा करून, त्यापासून देखील रोपे बनवतात येतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या (Farm) बांधावर ‘फूड सिक्युरिटी’ म्हणून हे झाड असावेच असावे.

कांचन वैभव
कांचन म्हणजे सोने. जंगलात एके ठिकाणी कांचन वृक्षासारखाच पण खूप मोठ्या आकाराची पाने असणारा आणि भरपूर उंच वाढलेला एक वृक्ष (Tree) दिसला. याच्या एकेका पानाचा पृष्ठभाग हा दोन्ही हातांच्या एकत्र तळव्यापेक्षाही मोठा होता. शोधल्यावर याचे नाव सेमला कांचन असल्याचे कळले. शिवाय तो खूप दुर्मीळ आहे, असेही समजले. याच्या एकाच पानाला शिवून शिंपी पक्ष्याने सुंदर घरटे बनवले होते. कांचन म्हणजे सोने. साधारण आपट्याच्या पानांसारखी दिसणारी याची पाने. यातही वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की हा जंगलातला सेमला कांचन; तर काही ठिकाणी गुलाबी, पांढरा आणि पिवळा असे फुलांच्या रंगावरून काही प्रकार आहेत. हा अस्सल देशी वृक्ष आहे. तो कोरल, कांचनार, शीद अशा नावांनी वेगवेगळ्या भागांत ओळखला जातो. बाराही महिने डेरेदार, हिरवा असणारा मध्यम उंचीचा हा वृक्ष आहे. कमी पाण्यातही हे झाड येते. रस्त्याच्या कडेला ही झाडे मोठ्या प्रमाणात लावली पाहिजेत. दिल्लीच्या रस्त्यांवर किंवा आपल्याकडे बागेत ही झाडे दिसतात. याच्या कोवळ्या शेंड्यांची, पानांची भाजी केली जाते. फुलांचा आणि कोवळ्या शेंगांचाही उपयोग भाजीसाठी होतो. वृक्षारोपण करताना विदेशी झाडे न लावता कांचन सारख्या उपयुक्त व देशी झाडांची निवड करणे सुज्ञपणाचे ठरेल.

नीलिमा जोरवर
ranvanvala@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com