Education System : परदेशी विद्यापीठांबद्दलची ओरड अनाठायी

मला तर ह्या युक्तिवादात फार तथ्य दिसत नाही. जरा आपण ह्या तक्रारी तपासू. परदेशी विद्यापीठांना शिक्षक नेमणूक आणि पगार यांत मुक्तहस्त असेल तर सरकारी विद्यापीठांना नियमाप्रमाणे शिक्षक नेमावे लागतात आणि नियमाप्रमाणे पगार द्यावा लागतो म्हणून ही विषम स्पर्धा आहे असा हा सूर आहे.
Education System
Education SystemAgrowon

- नीरज हातेकर

परदेशी विद्यापीठांना (Foreign University) भारतात मुक्तद्वार देणार, ह्या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रातून (Education) बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. बहुतांशी तक्रारी. परदेशी विद्यापीठांना आरक्षण (Reservation) लागू नसणार, शिक्षकांच्या नेमणुकीचे निकष आणि पगार ते ठरवणार, अभ्यासक्रम, शुल्क आणि प्रवेशाचे निकष तेच ठरवणार. ह्या उलट शासकीय रचनेतील विद्यापीठाना अनेक बंधने पाळावी लागतात म्हणून ही विषम स्पर्धा आहे वगैरे.

मला तर ह्या युक्तिवादात फार तथ्य दिसत नाही. जरा आपण ह्या तक्रारी तपासू. परदेशी विद्यापीठांना शिक्षक नेमणूक आणि पगार यांत मुक्तहस्त असेल तर सरकारी विद्यापीठांना नियमाप्रमाणे शिक्षक नेमावे लागतात आणि नियमाप्रमाणे पगार द्यावा लागतो म्हणून ही विषम स्पर्धा आहे असा हा सूर आहे.

पण आज बहुसंख्य प्राध्यापक कंत्राटी आणि तासिका तत्वावर आहेत. त्यांना काय पगार द्यायचा आणि कसे नेमायचे हे निकष सरकार ठरवत नाही, तर महाविद्यालये, विद्यापीठे ठरवतात. शिवाय अगदीं नियमित पोस्ट्सची भरती तरी कुठे नियमाने करतात? आज कायम स्वरुपी नेमणुकींच्या बाबतीत शिक्षण संस्थांनी जो बाजार लावलाय तो कुणाला माहीत नाही? आरक्षण वगैरेचे नियम कसे धाब्यावर बसवत असतात हे ही आपल्याला माहितच आहे.

नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार अगदी कुलगुरूच्या नेमणुकीपासून खालपर्यंत सुरू आहे. तसेच आरक्षणाचे. समाजातील दुर्बल घटकांना सामावुन घेणे म्हणजे ५० टक्के आरक्षण लावून प्रवेश प्रक्रिया राबविणे एवढाच अर्थ. ते पैसे पण शासनाकडून वसूल होतात. मागास स्तरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी शैक्षणिक आणि आर्थिक मदत किती विद्यापीठांतून होते?  

ह्या विद्यापीठांची समस्या नियमांनी बांधले जाणे नाहीच आहे. नियमांची ढाल दाखवून आपले इप्सित साध्य करुन घेण्यात ह्या लोकांचा हातखंडा. त्यांचा प्रॉब्लेम गव्हर्नन्सचा आहे. शिक्षक, शिक्षण सहसंचालक आणि तत्सम नोकरशाही, विद्यापीठातील पदाधिकारी आणि मंत्रालयातील ओसडी वगैरे मंडळींनी ही व्यवस्था स्वतःच्या हितासाठी इतकी वापरली आहे की ती आता मेलेली आहे. अगदी मोजके अपवाद सोडले तर आपली शासकिय उच्च शिक्षण व्यवस्था संपलेली आहे.  

मुघल साम्राज्य संपल्यावर सुद्धा कित्येक वर्षे लाल किल्यापुरतीच सत्ता उरलेले बादशाह स्वतःला हिंदुस्तानचे सम्राट वगैरे बिरुदे लावून घेत असत. तशीच आताची परिस्थिती आहे. हे आपण जितक्या लवकर कबूल करू तितके चांगले.

आपल्याला ह्या बाबतीत आहे ते मोडून पुन्हा शून्य अवस्थेपासून सुरुवात करावी लागणार आहे. सुक्या बरोबर ओले सुद्धा जळेल ह्याची खंत आहे, पण त्याला ईलाज नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com