
शेतकरी ः महेंद्र तुकाराम जोंधळे
गाव ः शेंद्रा, ता.जि.परभणी
एकूण क्षेत्र ः ५ एकर
तुती लागवड ः १ एकर
परभणी जिल्ह्यातील शेंद्रा (ता.परभणी) येथे महेंद्र तुकाराम जोंधळे यांची ५ एकर शेती (Agriculture) आहे. जमीन मध्यम ते भारी प्रकारची आहे. सिंचनासाठी (Irrigation) बोअरमधील उपलब्ध पाणी वापरले जाते.
जमीन कमी असल्यामुळे पारंपारिक पीक पद्धतीने खात्रीशीर उत्पन्न मिळत नव्हते. गावातील काही शेतकरी रेशीम उत्पादक (Silk Producer) शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेत रेशीम शेती (Silk Farming) करण्याचा निर्णय घेतला.
रेशीमशेतीस सुरुवात करण्यापूर्वी विविध ठिकाणच्या अनुभवी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून रेशीम शेतीबाबत माहिती घेतली. एका कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांची मुलाखत पाहिली.
त्यानंतर डॉ. लटपटे यांची भेट घेऊन रेशीम शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली. रेशीम संशोधन योजनेतर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आयोजित प्रशिक्षण देखील पूर्ण केले.
रेशीम शेतीस सुरुवात...
२०१६ मध्ये एक एकर क्षेत्रावर ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर तुतीच्या व्ही-१ या वाणाची लागवड केली.
तुती लागवडी शेजारील जागेत रेशीम कीटकांसाठी संगोपनगृहाची उभारणी केली. साधारण २५ फूट रुंद, ६० फूट लांब आणि १६ फूट उंचीचे टिन पत्र्याचे छत असे संगोपनगृहाचे बांधकाम केले. त्यात लोखंडी पट्ट्याच्या साह्याने रॅक तयार केले आहेत. त्यासाठी साधारण तीन लाख रुपये खर्च आला.
रॅकमध्ये नॉयलॉन जाळ्यांऐवजी घरातील जुन्या साड्यांचा वापर केल्यामुळे खर्च काही प्रमाणात कमी करणे शक्य झाले.
बरबडी (ता.पूर्णा) येथील बाल्यरेशीम कीटक उत्पादक श्रीधर सोलव यांच्याकडून बाल्य कीटकांची (चॉकी) खरेदी करून रेशीम कोष उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
पहिल्या वर्षी थोडे कमी उत्पादन मिळाले. वर्षभराच्या अनुभवातून रेशीम कीटक संगोपनातील अनेक बारकावे माहिती झाले.
त्यातून पुढील काळात कोष उत्पादनात सुधारणा झाली. गेल्या ६ वर्षांतील अनुभव तसेच योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत महेंद्र घेत आहोत.
कोष उत्पादनात वाढ
सुरुवातीची काही वर्षे रेशीम कीटकाच्या बायव्होल्टाईन जातीच्या १०० अंडीपुंजाची एक बॅच घेतली जात असते. त्यापासून प्रति बॅच साधारण ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळत होते.
उत्पादित कोषाची बंगलोर जवळील रामनगरम मार्केटमध्ये विक्री केली जात असे. प्रत्येक बॅचपासून महिन्याकाठी खात्रीशीर उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.
एका वर्षात साधारणपणे १५० अंडीपुजांच्या ४ ते ५ बॅचपासून सरासरी १२५ ते १५० किलो कोष उत्पादन मिळत आहे. उत्पादित संपूर्ण कोषाची पूर्णा येथील मार्केटमध्ये विक्री केली जाते.
व्यवस्थापनावर भर
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी तुतीचा उत्तम प्रतिचा पाला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
प्रत्येक बॅच सुरु होण्यापूर्वी दर्जेदार तुती पाला उपलब्ध होण्यासाठी बागेचे व्यवस्थापन देखील महत्त्वाचे असते. त्यासाठी कोष काढणी सुरू झाल्यानंतर त्वरित तुती बागेची छाटणी केली जाते.
चॉकी अवस्थेत रेशीम कीटकांची विशेष काळजी घेतली जाते.
छाटणीनंतर बागेतील सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणी करून खताच्या मात्रा दिल्या जातात. त्यानंतर सिंचन केले जाते.
छाटणी केल्यानंतर साधारण दीड महिन्याच्या कालावधीत पाने कीटकांना खाद्य म्हणून देण्यासाठी तयार होतात.
कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची साफसफाई, निर्जंतुकीकरण या बाबींवर कटाक्षाने भर दिला जातो. त्यानंतर चॉकी आणल्यानंतर रेशीम कोष उत्पादनाची पुढील बॅच सुरु होते.
मागील कामकाज
२१ डिसेंबरला दगवाडी (जि.नांदेड) येथून चॉकी आणली. रॅकवर खाकी पेपर अंथरूण त्यावर चॉकी ठेवली.
दुसऱ्या दिवशी संगोपनगृहामध्ये दुसरा मोल्ट पास झाला. त्यानंतर कीटकांना तुतीची पानाचे शेंडे कापून फिडींग सुरु केले.
एका दिवसात साधारण दोन वेळा तुती पाला दिला. सहा फिडींगनंतर तिसरा मोल्ट बसला.
कीटकांनी कोष उत्पादन निर्मिती सुरु केल्यानंतर एकाचवेळी एकसमान कोष उत्पादन मिळावे, यासाठी योग्य काळजी घेतली.
रॅकमध्ये चंद्रिका टाकून घेतल्या. त्यानंतर दोन दिवसांत कोष तयार झाले.
आगामी नियोजन
येत्या दोन ते तीन दिवसांत कोष काढणीस सुरुवात केली जाईल. साधारण १२५ किलो कोष उत्पादन अपेक्षित आहे. संपूर्ण कोषाची विक्री पूर्णा मार्केटमध्ये केली जाईल.
बॅच गेल्यानंतर संपूर्ण शेडची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले जाईल.
पुढील बॅच मार्च महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होण्यासाठी तुती लागवडीत आंतरमशागतीची कामे केली जातील. त्यानंतर बागेस ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.
दर्जेदार पाने उपलब्ध झाल्यानंतर चॉकी आणून पुढील बॅच सुरु केली जाईल.
- महेंद्र जोंधळे ७९७२६८१४३८, (शब्दांकन ः माणिक रासवे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.