
कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानातील फरकाचा (Climate Change) कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. विविध फळपिकांमध्ये मुख्यतः तापमान बदलाचा (Temperature) परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये (Winter) तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर त्याचा पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. अति थंड हवामान, थंडीची लाट (Cold wave), धुके, थंड वारे आणि गारा आदी कारणांमुळे झाडांना इजा होते. परिणामी फळझाडांचे मोठे नुकसान होते. अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर होणारा अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घ्यावी.
- कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते, वनस्पतींच्या पेशी मरतात, फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
- शीत हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यांवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तिहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात.
- अतिशीत तापमानामुळे खोड आणि फांद्या यांच्या आतील भाग काळा पडून ठिसूळ बनतो. विशेषतः रोपवाटिकेतील कोवळी कलमे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात.
- तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळ्यापर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावून त्यात बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.
- उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोचते. आंब्याचा मोहोर जळतो. सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात. तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.
- तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो. द्राक्षाची फळे गळतात, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते.
- संत्रा, मोसंबीत १० अंश सेल्सिअसच्या खाली तापमानात वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
उपाययोजना ः
- थंडी, उष्ण तापमान आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता वाऱ्याच्या बाजूने वारा प्रतिबंध झाडांची(सुरू, बोगनवेल, बांबू, घायपात मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी, पांगारा, ग्लिरीसिडीया इ.) रांग लावावी.
- बागेच्या सभोवार मध्यम उंच कुंपण घालून झाडांची लागवड करावी. उदा. शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ. झाडांची सतत निगा व छाटणी करावी.
- मुख्य फळझाडे लहान असल्यास रब्बी हंगामात दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मुग, मटकी इ.
- केळी, पपई व पानवेलीच्या भोवती दाट शेवरी लावावी.
- फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. बागेत रात्रभर धूर व उष्णता राहील याची काळजी करावी.
- बागेस रात्री पाणी द्यावे. यामुळे जमिनीचे तापमान वाढते. पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
- थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते, अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
- झाडांच्या खोडाजवळ व आळ्यात गवत, कडबा पाचोळा, गव्हाचे तूस इ. आवरण घालावे.
- केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. प्रती झाड १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
- द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
- डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे.
- रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी काळे प्लॅस्टिक, पोती यांचा उपयोग करावा.
- पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जल व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो.
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.