Unemployment In India : व्यावसायिकांनी येत्या काळात व्यवसायाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज

आज ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करून अर्थार्जन करीत आहेत. असे असले तरी व्यावसायिकांनी येत्या काळात स्वतःमध्ये आणि त्यांच्या व्यवसायाच्या पद्धतीत काही बदल करण्याची नितांत गरज आहे.
unemployment in india
unemployment in india Agrowon

बेरोजगारी ही देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. लाखो तरुण दरवर्षी कॉलेजमधून पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र त्यांचं भविष्य अंधकारमयच आहे. सरकारी नोकर भरती असो किंवा पोलिस भरती असो अशा भरतीच्या जागेच्या संख्येच्या कित्येकपट अधिक संख्येने तरुण जातात.

एका-एका जागेसाठी शेकडोंची उपस्थिती असते. यावरून बेरोजगारीचा अंदाज आपल्याला बांधता येईल. खासगी कंपनीत, कारखान्यात जॉब करणेदेखील सोपे राहिले नाही. अत्यंत कठीण काम, अल्पसा पगार आणि पगार वाढीचा आणि जॉब कायमस्वरूपी होण्याची देखील खात्री अजिबात देता येत नाही.

अशा भयानक परिस्थितीतून तरुणाई जात आहे. याच बेरोजगारीमुळे गुन्हेगारी, मानसिक विकार, व्यसनाधीनता, विवाह न जमणे, आत्महत्या यांसारख्या समस्यादेखील वाढताना दिसत आहे.

आजच्या तरुणाला त्यांच्या शिक्षणाप्रमाणे पगार मिळवून देण्यात देशाची व्यवस्था कमी पडत आहे. सरकारी नोकरी मिळणे किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळणे आता नशिबाचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

भौतिक जीवनात जगण्यासाठी पैशाची नितांत गरज असते आणि पैसा हा चांगल्या मार्गाने मिळवलेला असणे आवश्यक आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ असं संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे.

या उक्तीप्रमाणे तरुणांना चांगल्या मार्गाने, चांगल्या प्रमाणात पैसा मिळवून देण्याचे सामर्थ्य व्यवसाय किंवा दुकानदारीत आहे. चांगल्या पगाराच्या शाश्‍वत नोकऱ्या आता राहिल्या नाहीत, दुसरीकडे शेती व्यवसाय हा प्रचंड बेभरवशाचा झाला आहे.

त्यामुळे येत्या काळात तरुणांची बेरोजगारी फक्त व्यवसाय दूर करू शकेल, हेच सत्य आहे. मात्र व्यवसायात किंवा दुकानदारीत देखील स्पर्धा आहे. यशस्वी व्यवसाय करणे ही एक खडतर तपश्‍चर्या आहे.

unemployment in india
Maharashtra Politics : महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न वाढले अन् सरकार राजकारणात व्यस्त

व्यवसायात यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी तरुणांनी अंगीकारणे आवश्यक आहे. देशातील खेडे आता पूर्वीप्रमाणे राहिले नाही. खेडेगाव देखील खूप समृद्ध झाले आहे.

त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना खूप दूरवर किंवा मोठ्या शहरात जाण्याची गरज आता उरली नाही. आज ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करून अर्थार्जन करीत आहेत.

असे असले तरी व्यावसायिकांनी येत्या काळात स्वतःमध्ये आणि त्यांच्या व्यवसायाच्या पद्धतीत काही बदल करण्याची नितांत गरज आहे. तो बदल न केल्यास व्यवसायाचा आलेख खाली जाऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

व्यवसाय करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे स्वभाव. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा भिन्न भिन्न असतो त्यात अनेक गुणदोष असतात. मात्र व्यावसायिक लोकांनी आपल्या स्वभावात नम्रता ठेवणे आवश्यक आहे.

अनेक ग्राहक एखाद्या चांगल्या स्वभावाच्या दुकानदाराकडे आवर्जून खरेदीसाठी जातात. दुकानाचे अंतर जास्त पडत असले तरीही स्वभावामुळे आकर्षित होणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी नाही. त्यामुळे व्यवसाय करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी असे म्हणतात.

दुकानदाराच्या चेहऱ्यावरील हास्य आणि गोड बोलणे अनेकांना खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असते. स्वभावासोबत सेवा चांगली असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकाला एखादी वस्तू दाखवणे, समजून सांगणे, शिल्लक नसल्यास वेळेवर मागून देणे या गोष्टी व्यावसायिकांनी नियमित कराव्यात.

ग्राहकाची खरेदी झाल्यावर मोठी वस्तू असल्यास ती वस्तू त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवणे हा व्यावसायिक शिष्टाचार आहे, त्यासाठी विशेष काही खर्च करावा लागत नाही.

प्रत्येक दुकानदार किंवा व्यावसायिक हा नफा कमवण्यासाठीच बसलेला असतो. मात्र तो किती कमवावा, किती घ्यावा याला मर्यादा असल्या पाहिजे. एकाच ग्राहकाकडून खूप नफा कमवण्यापेक्षा अनेक ग्राहकांकडून योग्य नफा कमवल्यास एकंदर नफ्याचे प्रमाण हे जास्त असते.

म्हणून गिऱ्हाईक आले की त्याला लुटा त्यापेक्षा योग्य दरात वस्तू विका, हा मंत्र दुकानदाराने जोपासला पाहिजे. दुकानाची जागा योग्य ठिकाणी असावी शिवाय दुकानातील वस्तूंची मांडणी योग्यप्रकारे केलेली असावी जेणेकरून दुकानात कोणकोणत्या वस्तू मिळतात हे ग्राहकाला लगेच समजले पाहिजे.

अनेक वस्तूंची खरेदी ग्राहक फक्त डिस्प्ले बघूनच करतात असा अनुभव आहे. अनेकदा काही ग्राहक वस्तू परत घेऊन येतात, बदलून मागतात, गॅरंटी मागतात यांसारख्या बाबी वस्तू खरेदीच्या वेळेसच ग्राहकांना सांगणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील वादविवाद टाळता येतील.

एखादी वस्तू परत घेणे शक्य असल्यास ती घ्यावी, त्याचा दूरगामी परिणाम व्यवसाय वृद्धीवर होतो. नवीन अथवा जुने दुकान असो नफ्यातील काही विशिष्ट भाग हा जाहिरातीवर खर्च झाला पाहिजे. नवीन दुकानाच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला पाहिजे.

यात जेवढी गर्दी होईल तेवढा व्यवसायाचा प्रचार होतो आणि व्यवसाय वाढीस लागतो. व्यवसाय उभा करताना आपल्याकडील भांडवल तसेच बँकेचे कर्ज याचा अंदाज बांधून व्यवसाय करणे गरजेचे आहे.

खाद्यपदार्थांच्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण खूप चांगले असते. मात्र ९५ टक्के हॉटेल आणि स्वीटच्या दुकानांमध्ये स्वच्छतेचा आणि शुद्धतेचा अभाव असल्याचे जाणवते. पदार्थांची चव कितीही चांगली असली तरी ग्राहकांच्या डोळ्यांनी पाहिलेली अस्वच्छता त्यांना परत येण्यास अटकाव करते.

unemployment in india
येत्या काळात बेरोजगारी, महागाईविरोधात लढा उभारणार

त्यामुळे खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांनी स्वच्छता आणि वस्तूची शुद्धता याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दुकानातील कामगारांना एकसारखा पोशाख, हँड ग्लोज, मास्क, कॅप, खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवणे आणि अंतर्गत स्वच्छतेवर फारसा विशेष खर्च होत नाही.

मात्र ग्राहकाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाच्या कार्यवाहीच्या भीतीपेक्षा आपल्या व्यवसायासाठी ही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

व्यवसाय करत असताना खर्चाचा ताळेबंद, कागदपत्रे, टिपण, पावत्या या सर्वांचे जतन करणे खूप महत्त्वाचे आहे. एखादी वस्तू विकल्यावर तिचे येणारे सर्व पैसे हा नफा आहे, असे समजून तो खर्च करायचा हे योग्य नाही.

याप्रकारे अनेक दुकानदार अडचणीत आले आहेत. अनेकांची दुकानदारी काही वर्षात बंद पडली. त्यामुळे व्यावसायिकांनी मुळात व्यर्थ खर्च करू नये किंवा खर्च करताना आपल्याला झालेल्या नफ्याचा विचार करूनच करावा.

व्यावसायिकांनी सामाजिक जीवनदेखील सांभाळणे आवश्यक आहे. वेळात वेळ काढून ग्राहकांच्या सुखदुःखात, समाजातील काही कार्यक्रमात उपस्थित राहणे आवश्यक आहे. आपल्या दुकानातील कामगारांना देखील योग्य त्या सूचना वेळोवेळी करणं आवश्यक आहे.

दुकानात सीसीटीव्ही, दुकानाचा विमा, अग्निरोधक यंत्रणा असणे खूप आवश्यक आहे. आजच्या ऑनलाइनच्या युगात अनेक मंडळी ऑनलाइन खरेदी करतात. त्यामुळे या प्रकारचे ग्राहक आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी योग्य त्या ऑफर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

या सर्वांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे. तरुण व्यावसायिकांनी जर सकारात्मक बदल करून व्यवसाय केल्यास निश्‍चितपणे त्यांची आणि आपल्या देशाची प्रगती होईल, यात शंका नाही.

(लेखक शेती-ग्रामीण समस्यांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com