Fish Farming : मत्स्य संवर्धनामधील समस्या सोडवण्यासाठी हे उपाय करा

मत्स्य संवर्धनाचे प्रशिक्षण किंवा प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकाद्वारे तंत्रज्ञान आत्मसात करावे. मत्स्य संवर्धनामधील काही प्रमुख समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती आवश्यक आहे.
Fish Farming
Fish FarmingAgrowon

Fish Farming : मत्स्य संवर्धनासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे योग्य आकाराचे मत्स्य तलाव, पाण्याचा बारमाही पुरवठा, मत्स्य बीजांची (Fish Seed) उपलब्धता, खत व खाद्य व्यवस्थापन (Feed Management) इत्यादी. याशिवाय इतर महत्त्वाच्या बाबी म्हणजे मत्स्य संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान व माशांची बाजारविक्री संबंधी माहिती असावी.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाव आणि शेततळ्यांमध्ये मत्स्य संवर्धन (Fish conservation) केले जाते. परंतु तांत्रिक माहितीच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. योग्य उपाययोजना अमलात न आणल्यामुळे उत्पादनात घट होऊन नफ्याचे प्रमाण कमी होते. यासाठी महत्त्वाच्या समस्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.

मत्स्यबीजांची वाढ न होणे :

- अनेक ठिकाणी मत्स्य तलावामध्ये संचयन केलेल्या मत्स्य बीजांची वाढ न झाल्याचे दिसून येते किंवा झाली असल्यास माशांची संख्या खूपच कमी झालेली दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे सुरुवातीला संचयन केलेल्या मत्स्यबीजांचा आकार खूप लहान असल्यास तलावातील इतर भक्षक प्राण्यांकडून किंवा पक्षांकडून बीजांचे भक्षण होते. परिणामी, माशांची संख्या कमी होते, उत्पादनात घट होते.

- सुरुवातीला मत्स्यबीजांची संचयन अधिक प्रमाणात झाले असल्यास दाटी होऊन माशांची वाढ जलद गतीने होत नाही.

Fish Farming
Kolambi Fish : लक्षद्वीपमध्ये शोभिवंत कोळंबी उत्पादन महिलांसाठी ठरला फायद्याचा व्यवसाय

उपाय योजना :

- मत्स्य तलावामध्ये मत्स्यबीज संचयनाची घनता प्रतिटेक्टरी १०,००० बीज एवढी ठेवावी. मत्स्य बीज आकार बोटुकली इतका म्हणजेच ८० ते १०० मिमी आणि वजन ८ ते १० ग्रॅम असावे.

- मत्स्यबीज विश्‍वसनीय ठिकाणावरूनच खरेदी करावे. संचयनापूर्वी मत्स्यबीजांची संख्या मोजूनच तलावामध्ये सोडावे. सर्व बीज मोजणे शक्य नसते. त्यामुळे बीजांच्या एकूण पिशव्यापैकी तीन पिशव्या अंदाजे निवडून बीजांची सरासरी काढावी.

त्या आधारावर इतर पिशव्यामधील बीजांची संख्या गृहीत धरावी. असे केल्यामुळे मत्स्य संवर्धनामधील खाद्य व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करता येते.

- मत्स्य तलावावर बर्ड नेट (पक्षी प्रतिबंध जाळी) लावणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावातील मासे सुरक्षित राहतात.

२) माशांची अचानक मरतूक :

मत्स्य संवर्धन शास्त्रीय पद्धतीने केल्यास माशांचे आरोग्य चांगल्या स्थितीत राहते. परंतु एकूण व्यवस्थापनामध्ये त्रुटी राहिल्यास माशांची चांगल्या प्रकारे जलदगतीने वाढ होत नाही, क्वचित प्रसंगी मरतूक होते.

- प्रामुख्याने तलावातील पाण्याचे घटक म्हणजे प्राणवायू, सामू इत्यादी. तलावामध्ये प्राणवायुचे प्रमाण खूप कमी झाल्यास मासे तणावाखाली आल्यामुळे मरतुक होते. त्याचप्रमाणे पाण्यातील सामूचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास पाण्याचा दर्जा खालावतो. माशाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

उपाययोजना :

- तलावातील पाण्याचा दर्जा उत्तम ठेवावा. त्याकरिता तलावातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.

- तलावामध्ये पाण्यातील प्राणवायू हा ५ मि.ग्रॅ./लिटरपेक्षा जास्त असावा.

- पाण्यातील सामूचे प्रमाण ७.५ ते ९ असावे.

- आवश्यकतेनुसार तलावामध्ये नवीन पाणी घेऊन तळाकडील पाणी काढून टाकावे. त्यामुळे विषारी वायू निघून जातात. पाण्याची गुणवत्ता सुधारते.

तलावामध्ये शेवाळ होणे :

- तलावामध्ये खतांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे वनस्पती प्लवंगाची वाढ जास्त प्रमाणात होते.

- वनस्पती प्लवंग रात्रीच्या वेळी पाण्यातील प्राणवायू शोषण कतात. त्यामुळे तलावातील पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण खूप कमी होते. मासे मृत्युमुखी पडतात.

उपाययोजना :

- तलावामध्ये शेवाळाचे प्रमाण वाढल्यास काही दिवस असेंद्रिय खत व खाद्य देणे थांबवावे. तलावामध्ये जनावरांचे मल व मूत्र जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.

- तलावामध्ये शक्य झाल्यास गवत्या मासा किंवा सायप्रिनस मासा सोडावा. त्यामुळे वनस्पती प्लवंगावर नियंत्रण आणता येते. सेंद्रिय खत वापरल्यास प्राणी प्लवंग निर्मिती होते. हे प्राणी प्लवंग वनस्पती प्लवंगावर भक्षण करतात. अशा प्रकारे वनस्पती प्लवंगाची झालेली बेसुमार वाढ कमी करता येते.

Fish Farming
Kolambi Fish : लक्षद्वीपमध्ये शोभिवंत कोळंबी उत्पादन महिलांसाठी ठरला फायद्याचा व्यवसाय

योग्य बाजारभाव न मिळणे :

- योग्य व्यवस्थापन ठेवल्यास माशाची वाढ चांगली होते. परंतु काही वेळा मत्स्योत्पादनात वाढ होऊनही पाहिजे तसा बाजारभाव मिळत नाही. योग्य किंमत मिळत नसल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात घट होते.

उपाययोजना :

- तलावातील माशांची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी जेणेकरून मोठ्या आकाराच्या माशांना योग्य किंमत मिळेल व उर्वरित लहान आकाराच्या माशांना तलावामध्ये लवकर वाढण्यास मदत होईल.

- शक्य झाल्यास जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी माशांची विक्री करावी. जेणेकरून माशांना चांगला बाजार भाव मिळेल.

- मासे विक्रीच्या पारंपरिक पद्धतीला छेद देऊन गिफ्ट तिलापियासारख्या माशांच्या विक्रीसाठी जिवंत ताजे मासे विक्री केंद्र यांसारखा पर्यायी पद्धतीचा अवलंब करावा.

मत्स्य खाद्याची उपलब्धता :

- मत्स्य संवर्धनामध्ये मत्स्य खाद्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून, संवर्धनाच्या एकूण खर्चामध्ये ५० ते ६० टक्के खर्च खाद्य व्यवस्थापनावर होतो. त्यामुळे कोणते खाद्य व किती प्रमाणात द्यावे समजून घेतले पाहिजे.

- माशांना वाढीसाठी नैसर्गिक खाद्य म्हणजे प्लवंग आवश्यक असतात. त्यासोबत पूरक खाद्यामध्ये भाताचा कोंडा वापरावा. भाताच्या कोंड्यासोबत शेंगदाणा पेंड समप्रमाणात दिली जाते.

शेंगदाणा पेंडऐवजी तीळ, कोरटे, सूर्यफूल पेंड खाद्य म्हणून वापरता येते. त्यासोबत एकूण खाद्यामध्ये खनिजे एक टक्का या प्रमाणात मिसळावीत.

- कार्प जातीचे मासे शाकाहारी असल्यामुळे त्यांना भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड हे खाद्य देतात. काही मांसाहारी माशांच्या संवर्धनामध्ये प्राणी खाद्याचा वापर केला जातो.

-संवर्धनामध्ये योग्य खाद्य उपलब्धता व मुबलक प्रमाणात न दिल्याने माशांची वाढ खुंटते. वाढ झाली नसल्यामुळे योग्य बाजारभाव मिळत नाही. परिणामी, पाहिजे तसा नफा मिळत नाही.

- माशांना खाद्य नियमितपणे व कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणत: तलावातील एकूण माशांच्या वजनाच्या ३ ते ५ टक्के एवढे खाद्य दिले जाते.

माशांना खाद्य देताना खाद्य पिशव्या किंवा ट्रेचा वापर केला जातो. सुरुवातीला मत्स्य बीजांसाठी तलावाच्या कडेने खाद्य टाकले जाते.

संपर्क ः डॉ. अजय कुलकर्णी, ९८६००७९८२६, (सहायक प्राध्यापक, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com