आंब्यापासून लोणचे, जॅम, जेली

आंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरूपांमध्ये आवडीने खाल्ला जातो. वर्षातील काही महिनेच आंबा फळ उपलब्ध होते. वर्षभर आंब्याची चव चाखण्यासाठी आंबा फळांवर योग्य प्रक्रिया करून वर्षभर साठवणे शक्य होते. कच्च्या आणि पिकलेल्या आंब्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात.
Mango
MangoAgrowon
Published on
Updated on

१) कैरीचे पन्हे

साहित्य-

कैऱ्या ३, गूळ २०० ग्रॅम, वेलची तुकडे ६

कृती

प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. या कैऱ्या प्रेशर कुकरमध्ये एका भांड्यात ठेवून ३ शिट्ट्या काढाव्यात. तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यावा. त्यानंतर कुकरमधून कैऱ्या बाहेर काढून त्यातील गर चमच्याने वेगळा काढावा. आंब्याची कोय वेगळी करावी. गूळ आणि वेलची बारीक करून घ्यावी. तयार गरामध्ये बारीक केलेला गूळ आणि वेलची पूड मिसळून घ्यावी. तयार मिश्रण काचेच्या निर्जंतुक बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. पन्हे बनवण्यासाठी तयार केलेले मिश्रण १ चमचा प्रमाणात १ ग्लास पाण्यामध्ये मिसळून सर्व्ह करावे. हे मिश्रण किमान १ महिन्यापर्यंत साठवून ठेवता येते.

२) लोणचे

साहित्य-

कैऱ्या ३, अर्धा चमचा हळद, छोटी वाटी मीठ, तिखट, हिंग पाव चमचा, लवंग ४ ते ५, दालचिनी २, काळी मिरी ६-७, जिरे पाव चमचा, मेथीदाणे अर्धा चमचा, मोहरीची डाळ छोटी वाटी, तेल ३०० ग्रॅम.

कृती

प्रथम तेल कडकडीत गरम करून थंड होण्यास ठेवून द्यावे. मंद आचेवर तव्यामध्ये लवंग, दालचिनी आणि काळी मिरी ३-४ मिनिटे परतून घ्यावी. गॅस बंद करून गरम तव्यावर मेथीचे दाणे परतून घ्यावेत. सर्व खडे मसाले जाडेभरडे कुटून घ्यावेत. मीठ थोडे तव्यामध्ये परतून घ्या. तेल थंड झाल्यानंतर त्यात हळद, हिंग घालून मिसळून घ्यावे. कुटलेल्या मसाल्यामध्ये तिखट, मीठ, मोहरीची डाळ व्यवस्थित मिसळून घ्यावी. तयार मिश्रणात आंब्याच्या फोडी व्यवस्थित मिसळून घ्याव्यात. मिश्रणात मिसळलेल्या आंब्याच्या फोडी निर्जंतुक काचेच्या बरणीमध्ये भरून त्यावर थंड केलेले तेल ओतावे. बरणीत आंब्याचे तयार लोणचे भरल्यानंतर ती १० ते १५ दिवस उन्हामध्ये ठेवावी. अधूनमधून आंब्याच्या फोडी हलवत राहावे. हे लोणचे १ ते २ वर्षांपर्यंत उत्तम राहते.

३) जॅम

जॅम बनविण्यासाठी दशहरी, केसर किंवा हापूस आंबे घ्यावेत. त्यामुळे जॅमला चांगला रंग येतो.

साहित्य

आंबा लगदा ५०० ग्रॅम, साखर ३५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल किंवा लिंबाचा रस १.५ ग्रॅम, पाणी ५० मिलि.

कृती

प्रथम आंबे स्वच्छ धुऊन घ्यावेत. आंब्यावरील साल काढून त्याचा गर काढावा. चाळणीच्या गर व्यवस्थित गाळून लगदा करावा. गाळून घेतल्यामुळे गरातील साल आणि इतर पदार्थ बाजूला काढले जातात. तयार लगदा नॉनस्टिक कढईमध्ये घेऊन त्यात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून व्यवस्थित ढवळून मंद आचेवर शिजवावे. मिश्रण शिजत असताना अधूनमधून हलवत राहावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहावे. जेणेकरून करपणार नाही. जॅम तयार झाला की नाही हे तपासण्यासाठी थोडेसे मिश्रण चमच्यामध्ये घेऊन चमचा तिरका करून मिश्रण न तुटता पडते का ते पाहावे. मिश्रण न तुटता पडत असेल तर जॅम तयार झाला असे समजावे. तयार जॅम निर्जंतुक बरणीमध्ये भरून सामान्य तापमानास थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यानंतर हवाबंद करून फ्रीजमध्ये ठेवावे. तयार जॅम साधारण वर्षभर चांगला टिकतो.

४) जेली ः

साहित्य

आंबा लगदा ५०० ग्रॅम, साखर ३५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल किंवा लिंबाचा रस १ ग्रॅम, पेक्टिन ४.२ ग्रॅम.

कृती

जेली बनविण्यासाठी चांगले पिकलेले, गडद पिवळ्या रंगाचे आंबे निवडावेत. आंब्याची वरील साल काढून त्याचा लगदा करावा. हा लगदा गाळणीने गाळून घ्यावा. म्हणजे त्यातील सालीचे तुकडे आणि इतर अनावश्यक घटक वेगळे केले जातील. तयार लगद्यामध्ये साखर, पेक्टिन आणि सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे. उकळत असताना अधून मधून मिश्रण हलवत राहावे, जेणेकरून ते मिश्रण लागणार नाही. जेली तयार झाली किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे मिश्रण मिसळावे. त्याची गुठळी तयार झाल्यास जेली तयार झाली असे समजावे. मिश्रण उकळत असताना वरील बाजूस जमा झालेला साका काढून टाकावा. तयार जेली निर्जंतुक काचेच्या बरणीमध्ये भरून हवाबंद करावी.

५)आंबा पोळी ः

साहित्य ः

आंबा गर ५०० ग्रॅम, साखर २०० ग्रॅम, वेलची तुकडे ५ ते ६, तेल २ चमचे.

कृती ः

आंबा पोळीला आंबापापड असेही म्हणतात. आंबापोळी बनवण्यासाठी चांगले पिकलेले, गडद पिवळ्या रंगाचे आंबे घ्यावेत. आंबे स्वच्छ धुऊन त्यांचा गर काढावा. हा गर गाळणीने गाळून त्यात साखर व वेलची पूड मिसळून घ्यावी. गराचे मिश्रण मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर एका स्टीलच्या ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यावे. तयार मिश्रण ताटामध्ये पसरून किमान २ ते ३ दिवस उन्हात ठेवावे. उन्हात वाळविताना पोळीवर माती किंवा इतर कोणतीही घाण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा पोळी उन्हात चांगली वाळल्यानंतर चाकूने मोकळी करून घ्यावी. आवडीनुसार त्याचे काप करून साठवून ठेवावी.

--------------------

- करिश्मा कांबळे, ८४५९३७४६८४

(अन्न तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com