Water Shortage : जलविम्याद्वारे करू दुष्काळावर मात

Drought Update : पाऊस कमी पडला की दुष्काळ पडतो. दुष्काळ पडला की पाण्याची टंचाई निर्माण होते, रोजगार हमीची कामे चालू करावी लागतात, वगैरे वगैरे. पण दुष्काळाचा परिणाम फक्त एवढाच नाही. दुष्काळाचा एकूण समाजजीवनावर फार मोठा परिणाम होतो.
Drought
DroughtAgrowon

जयंत पाटील

Monsoon Update : चालू वर्षी फेब्रुवारीपासून मॉन्सूनवर परिणाम करणाऱ्या ‘एल निनो’ परिस्थितीची चर्चा सुरू झाली. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार मागील शंभर एक वर्षात निर्माण झालेल्या एल निनोचा आपल्या देशातील पावसावर अनेकदा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

त्यामुळे साहजिकच या वर्षी दुष्काळाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच विविध हवामान तज्ज्ञांचे भाकित, चैत्रातला पाऊस, भेंडवळची घटमांडणी, अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. दुष्काळ वाईटच, तो पडू नये यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू. पण पडला तर? पोटात गोळा उठला ना?

चालू वर्षी ११ एप्रिल २०२३ रोजी हवामान विभागाने प्रसारित केलेल्या जून ते सप्टेंबर मॉन्सूनच्या अहवालानुसार देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. याच अहवालात तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विशेष करून कोकण, मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असे दिसून येते. म्हणजेच, या प्रदेशात दुष्काळाची शक्यता आहे.

पण दुष्काळ काय आपल्यासाठी नवा नाही. दुष्काळ काय पहिल्यांदा पडतोय काय, तो तर आपल्या पाचवीला पुजलेला! असे अनेक दुष्काळ आपण अनुभवले आहेत. पण अनुभवातून आणि शास्त्रीय निरीक्षणातून दुष्काळाची शक्यता आधीच समजल्यामुळे आपल्याला पूर्वतयारी करण्याची संधी मिळते आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याकरिता हवामानशास्त्रज्ञांचे आपण आभार मानू.

Drought
Announcement of Drought District Exemption : दुष्काळ सवलतींची घोषणा करण्याचा शासनाला विसर

पाऊस कमी पडला की दुष्काळ पडतो. दुष्काळ पडला की पाण्याची टंचाई निर्माण होते, टँकर लावावा लागतो, रोजगार हमीची कामे चालू करावी लागतात, वगैरे वगैरे. पण दुष्काळाचा परिणाम फक्त एवढाच नाही. दुष्काळाचा एकूण समाजजीवनावर, पशुधनावर, झाड-झाडोऱ्यावर, माणसाच्या जीवनमानावर फार मोठा परिणाम होतो.

दुष्काळ पडल्यावर शासनाद्वारे वेगवेगळ्या योजना राबविल्या जातीलच, शासनाची जबाबदारी शासन पार पाडेलच, पण आपण काही करू शकतो का, याचा आपण विचार केला पाहिजे. संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो.

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. कोविडसारख्या महामारीतसुद्धा शेती क्षेत्राने देशाला तारून नेले होते तसेच आताही संभाव्य दुष्काळावर शेतकरी नक्कीच मात करू शकतात.

जसे आपण संभाव्य संकटाचा विचार करून पीकविमा काढतो तसेच संभाव्य दुष्काळाचा विचार करून आपण ‘जलविमा’ काढून ठेवला पाहिजे. संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी काही उपाययोजना आपण वैयक्तिकस्तरावर, तर काही सामूहिकस्तरावर करता येतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, पावसाळ्यापूर्वीच्या जलसंधारण उपाययोजना!

आपल्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर आपण योग्य नियोजन, काटकसर व बचत करून मात करतो. त्याचप्रमाणे, या संभाव्य दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पाणी साठविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे हा मूलमंत्र अवलंबला तर शासनाच्या प्रयत्नांना आपली मदत होईल आणि दुष्काळ पडलाच तर त्यावर आपण सगळे मिळून

सहज मात करू. जलसंधारण आणि काटकसरीने पाणी वापराच्या वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी वैयक्तिकस्तरावर आणि गावकरी सामूहिकस्तरावर सहज राबवू शकतात. दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी हाच आपला ‘जलविमा.’

Drought
Watershed Development In Katkalamba : काटकळंबा गावाने दुष्काळ केला हद्दपार; आता पाणीदार झाले गाव...

पाऊस कमी पडला तर तीन प्रमुख समस्या निर्माण होतात. पहिली समस्या म्हणजे पिकांचे नुकसान व उत्पन्नात होणारी घट. दुसरी समस्या चाऱ्याची टंचाई व पशुधनाचे नुकसान. या दोन्ही समस्या आर्थिक स्वरूपाच्या आहेत. तिसरी मुख्य समस्या आहे लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची! ही समस्या सामाजिक स्वरूपाची आहे.

याशिवाय दुष्काळामुळे उद्‍भवणाऱ्या रोजगार, आरोग्य, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, कृषी आधारित उद्योगांचे नुकसान, अशा विविध समस्यांचा समाजाला व शासनाला सामना करावा लागतो. प्रत्येक शेतकऱ्यास वैयक्तिकस्तरावर आणि प्रत्येक गावास सामूहिकस्तरावर जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजना केल्याने जास्त पाऊस पडणार नाही. परंतु दुष्काळ व टंचाईची तीव्रता नक्कीच कमी करता येईल.

ग्रामीण भागाकरिता पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी दररोज प्रत्येकी ५५ लिटर पाणीपुरवठ्याचा निकष आहे. हिशेब सोपा करायला ५० लिटर गृहीत धरू. म्हणजे ५ जणांच्या एका कुटुंबाला दररोज २५० लिटर पाणी लागते.

उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत २५ हजार लिटर पाण्याची गरज असते. पशुधन असेल तर १५ हजार लिटर अधिक करू. म्हणजे टंचाईच्या १०० दिवसांसाठी एका कुटुंबाला साधारण ४० हजार लिटर पाणी लागते. या शेतकरी कुटुंबाने आपल्या शेतात एक एकरावर जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजना केल्या तर यापेक्षा अधिकपट पाणी वाचविले व मुरविले जाऊ शकते.

याच निकषाप्रमाणे उन्हाळ्याच्या १०० दिवसांसाठी १,००० लोकसंख्या व १,००० पशुधनासाठी एकूण पाण्याची गरज ७५ लाख लिटर होते. जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजना गावातील १०० शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकरावर केल्यास ५ कोटी लिटर पाणी सहजपणे अडविले व वाचवले जाऊ शकते.

जे गणितात बसते ते व्यवहारात बसवायचे असेल, तर सर्वांनी वैयक्तिक आणि सामूहिकस्तरावर जलसंधारण व पाणी बचतीच्या उपाययोजना करण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी व जलसंधारण विभागातील अधिकारी-कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, पाणी विषयातले जाणकार किंवा स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन केले तर आपण संभाव्य दुष्काळ व टंचाईवर नक्की मात करू शकतो. लेखाच्या पुढील भागात आपण वैयक्तिक आणि सामूहिकस्तरावर जलसंधारणाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

(लेखक मागील तीस वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com