Irrigation Management : सिंचन व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान

आज बहुतांश तरुण आणि प्रगतिशील शेतकरी विज्ञाननिष्ठ असून, उत्तम दर्जाच्या उत्पादनासाठी योग्य ती माहिती, ज्ञान मिळविण्यामध्ये आघाडीवर आहे. पाण्याच्या उत्पादकतेची संकल्पना गेल्या दोन भागांमध्ये आपण समजून घेतली.
rrigation
rrigationAgrowon

सतीश खाडे

Irrigation Management Story : पिकाला मोजून पाणी देण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पारंपरिक पाटपाणी पद्धतीमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय यामध्ये टाळला जातो. त्याच प्रमाणे दिल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजणे शक्य होते.

ड्रीप व सूक्ष्म सिंचन (micro irrigation) संच प्रणालीचा वापर शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला तर पुढील गोष्टी नक्की होतील.

१. तुमच्याच विहीर, बोअरवेल किंवा भूजलाच्या पाण्याची बचत होईल. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तरी पाणी उपलब्ध असेल. एखाद्या वर्षी दोन पावसांतील अंतर वाढले तरी संरक्षित पाणी देता येईल.

२. पिकाची उत्पादन व त्याची गुणवत्ता दोन्हींमध्येही वाढ होईल.

३. अधिक पाणी शाश्‍वतपणे उपलब्ध झाल्याचा अंदाज आल्यानंतर कदाचित पिकाचे क्षेत्रही वाढवता येईल.

४. पिकाला लागणारे पाणी आणि उपलब्ध पाणी यांचा ताळमेळ घालून पिकांची योग्य निवड करता येईल. पाणी मध्येच संपल्यामुळे पीक वाळण्याची आपत्ती उद्‍भवणार नाही.

rrigation
Agriculture Irrigation : 'पाणीतुटीमुळे अपेक्षित सिंचन नाही'

५. अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त खते देण्यामुळे जमिनी चिबड झाल्या किंवा होत आहेत. ते टाळता येईल.

६. जरुरीइतकेच पाणी पिकाला दिल्याने पाण्याची उत्पादकता लक्षणीय रित्या वाढेल. (उत्पादन प्रति घनमीटर पाणी.)

७. मागील भागामध्ये आपण पिकांची पाण्याची गरज कशी काढायची, याची माहिती घेतली. त्याचा वापर करून एकूण गावाच्या पाण्याचा ताळेबंद अधिक अचूक मांडता येईल. आपल्या गावात पडणारा पाऊस, उपलब्ध पाणीसाठा यानुसार योग्य ती पीक पद्धती निवडता येईल.

सूक्ष्म सिंचन यंत्रणेचा प्रभावी वापर होण्यासाठी...

१. सर्व शेतकऱ्यांपर्यंत पिकाला लागणाऱ्या पाण्याची गरज आणि त्या संबंधित महत्त्वाची माहिती पोहोचविण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी गंभीरतेने कृती कार्यक्रम राबवला पाहिजे.

२. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सूक्ष्म सिंचनाचे ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ हे मोबाईल ॲप जागतिक दर्जाचे असूनही मोफत उपलब्ध आहे. त्यात पाणी काढण्याची सर्व गणिते आपोआप होवून पंप किती वेळ चालवायचा आहे, हे रोजच्या रोज सांगण्याची व्यवस्था आहे. त्याच्या प्रसारासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.

३. सूक्ष्म सिंचन संबंधित सर्व घटकांचे उदा. निर्माते, वितरक, विक्रेते, कामगार यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.

४. सूक्ष्म सिंचन संबंधित सल्लागार व कुशल कामगारांची उपलब्धता गाव पातळीपर्यंत वाढायला हवी.

५. राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमात ड्रीप उभारणीचे कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश व्हायला हवा.

६. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात पाणी व्यवस्थापन आणि विशेषतः सूक्ष्म सिंचना बाबत सखोल भर द्यायला हवा.

७. शेती संबंधित सवलती, कर्जवाटप व अन्य सोयीसुविधा यांचा सूक्ष्म सिंचन प्रशिक्षणाशी संबंध जोडण्याचे धोरण स्वीकारणे गरजेचे.

सूक्ष्म सिंचन तंत्र अधिक काटेकोर बनविण्यासाठी काही नवीन तंत्रज्ञान वापरता येतात. त्याची माहिती घेऊ.

डिफ्यूजर सिंचन पद्धत ः

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सरळ मुळांच्या कक्षेमध्ये पाणी दिले जात असले तरी त्यातही काही प्राणात पाणी वाया जाऊ शकते. हे दोन प्रकारे होते.

१. ठिबकच्या तोटीतून पडणारे थेंब आधी मुळाभोवतीची उभी जमीन भिजवते. नंतर हळूहळू ओल आडवी पसरत जाते. यात मुळाभोवती आडवी जागा भिजेपर्यंत मुळांच्या खाली पाणी उतरलेले असते. हे पाणी मुळांद्वारे वापरले जात नाही. (म्हणजेच वाया जाते.)

२. काही पिकांची मूळे विशेषतः फळझाडांची पाणी शोषणारी मुळे ही मातीच्या थरात जमिनीपासून ९ ते १२ इंचांच्या खालीच असतात. जमिनीपासून नऊ इंचांपर्यंत झालेली ओल मुळे वापरू शकत नाही. असे वरील थरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वाया जाते. या दोन्ही गोष्टी डिफ्यूजर सिंचन पद्धतीत टाळल्या जातात.

डिफ्यूजर पद्धत म्हणजे पाण्याच्या एका थेंबाचे शंभर भागात विभागणी करणे. पाणी मातीला देण्याऐवजी थेट मुळांना देणे. या मुळे ‘वाफसा’ अवस्था जास्तीत जास्त काळ साधली जाते. पीक सुदृढ राहून उत्तम उत्पादन मिळते. विजय जोगळेकरांनी यावर संशोधन करून मातीची भाजलेली दंडगोलाकार (cylindical) भांडी बनवली आहेत. त्यांना तळाशी छिद्र असतात.

ही भांडी फळ झाडाच्या भोवती खोडापासून दूर झाडाच्या परिघावरच (canopy) जमिनीत नऊ इंच खाली पुरतात. यात ठिबकद्वारे थेंब थेंब पाणी पडते. भांड्याच्या तळाच्या छिद्रातून थेंब बाहेर पडताना तो १०० पेक्षा अधिक तुकड्यात रूपांतर होऊन आडवे पसरत जातो.

मुळांचा पाणी शोषण्याचा दर आणि त्याला पाणी पाजण्याचा दर या यंत्रणेत जवळ जवळ समान राहतो. पाणी किती वेळ चालू ठेवायचे याचे गणित साधल्यास पिकाच्या तहानेइतकेच पाणी देता येते. त्याहीपेक्षा खते देण्यसाठी ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते.

या मातीच्या भांड्यांखाली एक फूट रुंद व चार-पाच इंच जाडीचा गांडूळ खत व आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित करून एक थर पसरला जातो. यात खताची ७०% पर्यंत बचत होते. तसेच झाडांची फलधारणाही मागे पुढे करता येते.

हेही जोगळेकरांनी अभ्यासातून विकसित केलेले तंत्र आहे. या पद्धतीत पाटपाण्याच्या केवळ पंधरा ते वीस टक्के पाण्यातही फळबाग चांगले उत्पादन देऊ शकते, हे जोगळेकरांनी दाखवून दिले आहे.

rrigation
Micro Irrigation : सुक्ष्म सिंचन प्रस्ताव मंजुरीच्या मार्गात अडथळे

सूक्ष्म सिंचनाला सेन्सरची जोड

शेतामध्ये विविध ठिकाणी आर्द्रतामापक संवेदके (सेन्सर) वापरून त्यानुसार सिंचन चालू बंद करण्याची यंत्रणा आपल्याकडे गेल्या २० ते ३० वर्षांपासून उपलब्ध आहे. मात्र त्याच्या सेन्सरसाठी आवश्यक खात्रीशीर वीज, वायरिंग, संगणक आणि त्याची देखभाल यासोबतच ते खर्चिक असल्यामुळे शेतकरी त्यापासून कोसो दूर आहे.

अधिक नफा देणाऱ्या व्यावसायिक आणि नगदी पिकांमध्ये काही प्रमाणात त्याचा वापर होत असे. मात्र आता तंत्रज्ञानामध्ये प्रचंड सुधारणा झाली असून, संवेदकही वायरलेस झाले असून, त्यासाठी विजेची, इंटरनेटचीही गरज राहिलेली नाही.

सेन्सरच्या क्षमताही वाढल्या असून, आता एकरी दोन किंवा तीन सेन्सर पुरेसे ठरतात. यामुळे खर्चात बचत होत आहे.

उपग्रह माहिती साठवण (सॅटेलाइट डाटा स्टोअरेज) यंत्रणेमुळे

प्रत्येक विभागाची, गावाची हवामान माहिती इंटरनेटवर नोंदवली व साठवली जाते. ती सर्वांना उपलब्ध आहे. तसेच खासगी किंवा वैयक्तिक मालकीच्या हवामान केंद्रांकडून माहितीची उपलब्धता वाढली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांनी तालुकानिहाय पिकांच्या पाणी गरजेची माहिती संकेतस्थळावर नोंदवलेली आहे.

सेन्सरची कनेक्टिव्हिटीही वाढलेली आहे. त्याद्वारे घेतलेल्या शेतातील आर्द्रता, हवामान, तापमान यांची माहिती लहरीच्या स्वरूपात पाठवली जाते. या लहरी दीड कि.मी.पर्यंत दूर सहज पोहोचतात. तितक्या अंतरातील इंटरनेटशी जोडले जाऊन ती माहिती क्लाउड कॉम्पिटिंगला जातो.

असा प्रकारे सेन्सर, उपग्रह आणि खासगी हवामान केंद्राकडून आलेल्या माहिती विश्‍लेषण केले जाते. बहुतांश सेन्सर निर्मात्या कंपन्यांनी त्यासाठी आवश्यक ते साॅफ्टवेअर बनवलेले आहे. त्यामुळे या सर्व माहितीचे विश्‍लेषण केल्यानंतर इंटरनेटद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर त्याची माहिती येते.

त्यात आताच्या हवामानानुसार पिकाची पाण्याची गरज किती आहे, आणि त्यासाठी पंप किती वेळ चालू ठेवायचा, हेही कळवले जाते. अगदी त्यावरूनच प्रत्यक्ष पंपाला सूचना देण्याचीही सोय आहे. मात्र ती नसली तरी मोबाईलवरून पंप चालू व बंद करता येतो.

शेतात एकरी दोन ते तीन सेन्सर बसवावे लागतात. तेही खुंटीसारखे शेतात खोचता व काढता येतात. त्यामुळे त्यांचा अनेक वेळा वेगवेगळ्या शेतामध्ये वापर करता येतो. ते चांगलेच टिकाऊ (२५ते ३० वर्षे) आहेत.

राज्यामध्ये अशा सेन्सर प्रणालीचे प्रयोग सुरू आहेत. (बुचकेवाडी) वैष्णव धाम, ता. जुन्नर या गावात नाबार्डचा पुढाकार आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्यात डाळिंब, भाजीपाल्याबरोबर ज्वारी या पिकासाठी सेन्सर यंत्रणेचा वापर केला आहे. येथील शेतकऱ्यांचा अनुभव उत्साह वाढवणारे दिसत आहेत.

फुले इरिगेशन शेड्यूलर ॲप

आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता स्मार्ट फोन आला आहे. त्यात सहज व मोफत डाउनलोड करता येणारे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे एक मोबाईल ॲप आहे. पाणी व्यवस्थापन शास्त्रज्ञ विशेषतः डॉ. सुनील गोरंटीवार व त्यांच्या चमूच्या संशोधनातून तयार झालेल्या या ॲपद्वारे विविध पिकांना किती पाणी द्यायचे, ते सांगते.

मोबाईलवर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतावर जाऊन त्यात शेतीविषयक प्राथमिक माहिती भरायची. तुमच्या शेतीचे लोकेशन, त्याचे क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, जमिनीचा प्रकार, पाण्याचा स्रोत, पंपाचा एच. पी., पिकाचे नाव, पीक लावल्याची दिनांक, यापूर्वी पाणी दिल्याची दिनांक ही आणि अशी सोपी माहिती भरायची असते. इंग्लिश व मराठी या दोन्ही भाषांत ती भरता येते.

आपली वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा अधिक जागी क्षेत्र असल्यास त्यांचीही माहिती भरण्याची सोय आहे. एकदा माहिती भरली, की ती पुन्हा पुन्हा भरावी लागत नाही. हे ॲप त्या दिवशी तुमच्या त्या शेतातल्या पिकाच्या पाण्याची गरज सांगते.

तसेच पंप किती वेळ सुरू ठेवायचा, याची तंतोतंत वेळ देते. म्हणजेच पिकाला तहानेइतकेच पाणी दिले जाते. पाण्याचा काटेकोर वापर केला गेल्यामुळे पाण्याची बचत तर होईलच, पण अतिपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून शेती दूर राहील.

rrigation
Irrigation Subsidy : तुषार, ठिबक सिंचन अनुदानासाठी परवड

हवामान विषयक माहितीचा करा वापर ः

पिकाच्या अनुषंगाने हवामान तपशील, स्थानिक पिकांची वाढलेली किंवा कमी झालेली पाण्याची गरज ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे वेबसाइटवर दिली जाते. त्याचाही आधार घेऊन आपल्या पिकाला नेमके किती पाणी द्यायचे, हे काढता येते.

पाण्याची उत्पादकता वाढविण्याचा पहिला टप्पा म्हणजे मोजून मापून पाणी देण्याचे तंत्र शिकणे. एकदा ते शिकलो की पुढील टप्प्यामध्ये त्यात आणखी बचत कशी करायची, त्याची उत्पादकता कशी वाढवायची हे आपण याच सदरामध्ये पुढे पाहणार आहोत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com