Grape Orchard : संभाव्य पावसाळी स्थितीमध्ये द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवसांत ढगाळी वातावरण किंवा तुरळक तसेच काही ठिकाणी जोराच्या पावसाची शक्यता आहे.
Grape Orchard
Grape OrchardAgrowon

मागील दोन दिवसांच्या वातावरणाचा आढावा घेता दिवस व रात्रीच्या तापमान कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वातावरणातील आर्द्रतादेखील थोड्याफार प्रमाणात वाढलेली आहे.

हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवसांत ढगाळी वातावरण (Cloudy Weather) किंवा तुरळक तसेच काही ठिकाणी जोराच्या पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे सध्याच्या वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्ष बागेत (Grape Orchard) पावसामुळे येणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती आजच्या लेखात घेऊयात.

मणी क्रॅकिंगची समस्या ः

१) बऱ्याचशा बागेत सध्या फळ काढणीचा कालावधी सुरू आहे. ज्या बागेत फळकाढणी सुरू आहे किंवा फळकाढणीस उशीर आहे, अशा बागेत पावसामुळे मणी क्रॅकिंगची समस्या होण्याची शक्यता असते.

२) फळकाढणीकरिता एक आठवडा उशीर असलेल्या परिस्थितीत जर पाऊस जास्त झाल्यास मणी क्रॅकिंग होण्याची शक्यता असेल. थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यास, फारशी अडचण येणार नाही.

जर काही वेळ थोडाफार पाऊस झाला आणि नंतर आकाश निरभ्र झाले अशा परिस्थितीत बागेत कोणतीही अडचण येत नाही. कारण मणी क्रॅकिंग करिता पाणी मुळांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

मुळांद्वारे मण्यापर्यंत पाणी शक्य तितक्या लवकर पोहोचल्यास त्या मण्यांवर दाब निर्माण होतो. त्यानंतर पुढच्या अवस्थेत मणी क्रॅकिंग होताना दिसून येते.

Grape Orchard
Grape Production : सेंद्रिय घटकांवर भर देत रंगीत द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन

३) तज्ज्ञांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार ज्या भागात पाऊस जास्त होतो, तेथे मात्र द्राक्ष मण्याची वाढीची अवस्था कोणतीही असली तरी मणी क्रॅकिंग होऊ शकेल. यावर महत्त्वाच्या उपाययोजनांचा विचार करता, पाऊस येण्याच्या ५ ते ६ तासांपूर्वी बागेत पाणी भरपूर द्यावे.

असे केल्यास द्राक्ष वेलीची मुळी अधिक पाणी ओढून मण्यापर्यंत पोचवेल आणि मण्यांवर जास्त प्रमाणात दाब येणार नाही. म्हणजेच ५ ते ६ तासांनी पुन्हा पाऊस झाल्यास, मण्यापर्यंत पाणी आधीच पोहोचल्यामुळे दाब निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

त्यामुळे मणी क्रॅकिंग झाले तरी ते कमी प्रमाणात होईल. कायटोसॅन २ मिलि प्रतिलिटर पाणी फवारणीद्वारे वापर करून मण्यांवर आवरण तयार होईल, मण्याची लवचिकता वाढेल. परिणामी, मणी क्रॅकिंग टाळता येईल.

४) या कालावधीत बागेत ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढून भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. याचा फळकाढणीच्या अवस्थेतील बागेत फारसा परिणाम होणार नसला तरी त्या आधीच्या अवस्थेतील बागेत भुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

या वेळी बागेत कोणतेही बुरशीनाशक (स्पर्शजन्य व आंतरप्रवाही) वापरण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. परंतु वातावरणाचा विचार करता जैविक नियंत्रणावर (मांजरी वाइनगार्ड २ मिलि प्रतिलिटर पाणी) भर देऊन रोग नियंत्रण करता येईल. या वेळी ड्रीपद्वारे उपलब्धता न करता फवारणी केल्यास फायदेशीर ठरेल.

फळकाढणी, बेदाणा निर्मिती ः

१) आपल्या भागामध्ये जवळपास २५ ते २८ टक्के उत्पादन हे बेदाणा निर्मितीकरिता वापरले जाते. सोलापूर, सांगली आणि विजापूरसारख्या भागांमध्ये प्रामुख्याने चांगल्या प्रतिचा बेदाणा तयार होतो. मण्यात गोडी आल्यानंतर (२२ अंश ब्रिक्स व आम्लता ०.५ टक्का) काढणी करून बेदाणा तयार केला जातो.

२) खाण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या द्राक्षाची काढणी ही तापमान कमी असताना करावी लागते. मण्याचे तापमान जवळपास २० अंश सेल्सिअसपर्यंत आल्यास त्याची साठवणूकक्षमता चांगली आहे, असे म्हटले जाते. या परिस्थतीची विचार करता बागेत फळकाढणी सकाळी ११ पर्यंत करावी.

३) बेदाणा तयार करण्याकरिता द्राक्षाची काढणी ही कोणत्याही वेळी करता येईल. काढणी केल्यानंतर बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष सुकविण्यात येत असल्याने काढणीचा कालावधी विचारात घेतला जात नाही.

परंतु चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होण्याकरिता बेदाणा शेडमध्ये योग्य वातावरण असणे गरजेचे आहे. या वातावरणात जास्त तापमान, कमी आर्द्रता व हवा खेळती राहणे या बाबींचा समावेश होतो.

४) ज्या वेळी पाऊस येतो किंवा काही काळ ढगाळी वातावरण राहिल्यामुळे वारे वाहण्याचा वेग कमी होऊन आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते, अशा परिस्थितीमुळे द्राक्ष सुकण्याकरिता उशीर लागतो. हवा जास्त खेळती नसल्यामुळे मण्यातून पाणी उडून जाण्याचा वेगसुद्धा कमी होतो.

आधीच डिपींग ऑइलमध्ये बुडविलेली द्राक्ष एकमेकांमध्ये चिकटतात.आणि कालांतराने तयार होत असलेला बेदाणा लाल पडतो. बागेत कितीही चांगल्या प्रकारचा द्राक्ष घड असला तरी बेदाण्याची प्रत खराब होते. यावर वेळीच प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असते.

५) ज्या ठिकाणी पाऊस झाला असेल अशा बेदाणा शेडमध्ये पंख्याचा वापर करून बेदाणा रॅकमधून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. यासाठी चारही बाजूंनी शक्यतोवर पंखे लावणे गरजेचे असेल.

६) बऱ्याचदा बेदाणा लवकर सुकावा म्हणून डीपिंग ऑइलची फवारणी पुन्हा घेतली जाते. मात्र ही फवारणी शक्यतो ढगाळी वातावरण असेपर्यंत टाळावी. ढगाळ वातावरणाची स्थिती निवळल्यानंतर ही फवारणी घेता येईल.

Grape Orchard
Grape Market : द्राक्ष व्यवहारात सौदा पावतीचा आग्रह करून फसवणूक टाळा

नवीन द्राक्ष बाग ः

१) ढगाळी वातावरण किंवा पाऊस झाल्यामुळे बागेतील आर्द्रता वाढलेली असल्यास, रिकट घेतलेल्या बागेत त्याचा चांगला फायदा होईल. रिकट घेतल्यानंतर निघालेली सरळ, सशक्त व जोमदार नवीन फूट बांबूला बांधून घ्यावी.

ही फूट ९ ते १० पानांची झाल्यानंतर ६ ते ७ पानांवर शेंडा मारून घ्यावा. निघालेली फूट शेंडा पिचिंगपर्यंत साधारणतः सव्वा ते दीड फूट लांबीची असावी.

२) शेंडा पिंचिंग केल्यानंतर निघालेल्या बगलफुटी ३ ते ४ पानांवर खुडून घ्याव्यात. यामुळे प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून साठा या काडीमध्ये तयार होईल. त्यामुळे काडी जाड होण्यास मदत होईल.

३) खोड तयार करतेवेळी ‘स्टॉप ॲण्ड गो’ पद्धतीने तयार केल्यास जाडी चांगली मिळून अन्नद्रव्यांचा साठा करून घेता येईल. वाढ जोमात होण्याकरिता बागेत पाणी आणि नत्राचा वापर महत्त्वाचा असेल. मुळीच्या कक्षेत पाणी वाफसा परिस्थितीत राहील अशाप्रकारे पाणी द्यावे.

४) वाढत्या तापमानात वेलीच्या पानांतून बाष्पीभवनाद्वारे जास्त प्रमाणात पाणी निघून जाईल. तसेच वेलीची पाण्याची गरजसुद्धा तितक्याच प्रमाणात वाढेल. पाणी कमी असलेल्या बागेत बोदावर आच्छादन करून पाण्याची बचत करावी.

फुटींची वाढ जोमात होण्याकरिता रिकट झाल्यानंतर साधारणतः दोन महिने नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. पालाश या खताचा वापर शक्यतोवर या कालावधीत टाळावा.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com