
आंबा ः
- वाढीची अवस्था
- आंबा बागेतील (Mango Orchard) गवत काढून बागेची साफसफाईची कामे सुरु करावीत. जेणेकरून बागेतील जमिनीमधील पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन मोहोर (Mango Blossom) येण्याची प्रक्रिया सुरु होण्यासाठी झाडाच्या मुळांना आवश्यक असलेला ताण बसण्यास मदत होईल.
- पारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी करावी. खूप जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतीयांश उंचीवर करावी व कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी १२ ते १५ फूट उंचीवर करावी.
- छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरपायरीफॉस ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारून संपूर्ण झाड भिजवून घ्यावे. तसेच छाटणी केलेल्या झाडांच्या बुंध्यात या कीटकनाशकाचे द्रावणदेखील ओतावे. त्यानंतर १ लिटर ब्लॅक जपान डांबराच्या द्रावणामध्ये २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावे. छाटणी केल्यानंतर सुरुवातीच्या काळात झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
- नवीन फुटवे आल्यानंतर दोन आठवड्यांनी ३ ते ५ फुटवे ठेवून नवीन फुटव्यांची विरळणी करावी. पहिली विरळणी केल्यानंतर, छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरवात झाल्यावर दर एक फुटावर एक याप्रमाणे खोडाच्या सर्व बाजूला फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत.
- घन लागवड (५ x ५ मी. किंवा ६ x ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करावी. यामध्ये उंची कमी करणे, एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे इत्यादी कार्यवाही करावी. घन पद्धतीने लागवड केलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी.
भाजीपाला रोपवाटिका पूर्वतयारी (वांगी/मिरची/टोमॅटो) ः
- जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरू करावीत. वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा प्रमाणे मिसळावे.
- रोपवाटिकेसाठी ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
- पेरणीवेळी गादीवाफ्यावर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौरस मीटर अंतरावर मिसळून घ्यावे. आणि त्यानंतर १० सेंमी अंतरावर ओळींत बियाण्याची पेरणी करावी.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस,
थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांची ५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती होईल असे पहावे.
(टीप ः ॲग्रेस्को शिफारस आहे.)
संपर्क ः ०२३५८ - २८२३८७/ ८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.