Silk Farming : रेशीम किटकांवरील रोगांचे व्यवस्थापन

Diseases of Silkworms : सध्या रेशीम शेतकरी वर्षभर एकामागून एक बॅचेस घेत असून, त्यात दोन बॅचेसमध्ये खंड पडू देत नाहीत. अशा प्रकारे वर्षभर रेशीम कीटक संगोपन चालू ठेवल्यास रोगजंतू व किडींना जीवनक्रम चालू राहून रोगांचा अधिक प्रसार होऊ शकतो.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड

Silkworm Diseases : सध्या रेशीम शेतकरी वर्षभर एकामागून एक बॅचेस घेत असून, त्यात दोन बॅचेसमध्ये खंड पडू देत नाहीत. अशा प्रकारे वर्षभर रेशीम कीटक संगोपन चालू ठेवल्यास रोगजंतू व किडींना जीवनक्रम चालू राहून रोगांचा अधिक प्रसार होऊ शकतो. अशा काही कारणांमुळेच रेशीम किटकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोषांचे उत्पादन व दर्जात घट होते. रेशीम कीटकांवर जिवाणू, विषाणू व बुरशी यामुळे रोग होतात. एकदा रोग झाल्यानंतर पूर्णतः नियंत्रणात आणणे अवघड असते. त्यामुळे रेशीम कीटक मोठ्या प्रमाणात मरतात. हे लक्षात घेता रेशीम किटकांस रोग होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात रेशीम कीटकास होणारे प्रमुख रोग पुढील प्रमाणे...
१) फ्लॅचरी २) मस्कार्डीन ३) ग्रासरी ४) पेब्रिन
१. फ्लॅचरी रोग -
(रोगकारक घटक : इन्फेक्शियस फ्लॅचरी विषाणू किंवा स्ट्रेप्टोकोकाय बॅसीलाय जिवाणू)
कारणे ः
-कीटक संगोपनगृहात जास्त तापमान, आर्द्रता असणे.
-निकृष्ट तुती पाला प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात अळ्यांना खाद्य म्हणून दिल्यास.
- वेळेवर स्पेसिंग न देणे. बेडमध्ये रेशीम अळ्यांची प्रमाणाबाहेर गर्दी असल्यास.

अळीच्या कोणत्या भागास या रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यावरून त्याचे तीन प्रकार पडतात.
अ) सेप्टिसेमिया : प्रामुख्याने रेशीम अळ्यांच्या रक्तात स्ट्रेप्टोकोकाय बॅसीलाय हे जिवाणू वाढल्यामुळे हा रोग होतो.
कारणे ः
-हे जिवाणू जमिनीत, हवेत, तुती पाल्यावर, कीटक संगोपनगृहात कीटक संगोपन साहित्यावर मुक्त संचार करीत असतात. विशेषतः तुती पाल्याला चिकटलेले जिवाणू अळ्यांना झालेल्या जखमेतून शरिरात प्रवेश मिळवतात. रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे : रेशीम अळ्यांची हालचाल व भूक मंदावून वाढ खुंटते. शरीर ताठ होऊन त्वचा मऊ पडते.
रोगग्रस्त अळ्या उलटी करतात. त्याची विष्टा हिरवट मण्यासारखी दिसते. अशा अळ्या मृत पावतात.

ब) पचनसंस्थेचा फ्लॅचरी :-हा रोग प्रामुख्याने रेशीम अळीच्या पचनसंस्थेस होतो.
लक्षणे :
-अळीची विष्ठा हिरवट, मऊ व मण्यांच्या माळेप्रमाणे असते.
-अळीची भूक व हालचाल मंदावून वाढीचा वेग कमी होतो.
-रोगग्रस्त अळ्यांची तुती पाल्याखाली जाऊन बसण्याची प्रवृत्ती दिसून येते.
-शेवटच्या अवस्थेतील रेशीम अळ्यांवर या रोग झाल्यास कीटक कोष न बांधता चंद्रिकेवर फिरत राहतात. चंदिकेवरच मरतात.

क) सोटो किंवा टॉक्सिकॉसिस : जीवाणूद्वारे तयार झालेल्या विषाच्या सान्निध्यात रेशीम अळी आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे याला ‘टॉक्सिकॉसिस’ असे म्हणतात.
कारणे ः
-बॅसिलस थुरिंजीएन्सीस या जिवाणूची कीडनाशक म्हणून पिकांमध्ये फवारणी केली जाते. याचा फवारा कळत नकळत तुती झाडांवर झाल्यास व अशी तुती पाने अळ्यांच्या खाण्यात आल्यास रेशीम अळ्यांना या रोगाची बाधा होते.
लक्षणे :
-रोगग्रस्त अळी अचानकपणे तुती पाला खाणे कमी करतात.
-मृत रेशीम अळीचे शरीर काळे पडते. त्वचा नाजूक होऊन फाटते. त्यातून गडद तपकिरी रंगाचा दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर पडतो.

Silk Farming
Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

२. मस्कार्डीन रोग :

रोगकारक घटक : बिव्हेरिया बॅसियाना व नोमुरिया रीलाय बुरशी
परजीवी बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव हिवाळ्यात तसेच पावसाळ्यात दिसून येतो. रेशीम अळीच्या मृत शरीराचा रंग पांढरा झाल्यास पांढरा मस्कार्डीन आणि हिरवा झाल्यास हिरवा मस्कार्डीन असे म्हटले जाते.
-पांढरा मस्कार्डीन हा बिव्हेरिया बॅसियाना व हिरवा मस्कार्डीन नोमुरिया रीलाय या बुरशीमुळे होतो.
कीटक संगोपनगृहातील कमी तापमान व जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते.

लक्षणे :
अळ्यांची भूक कमी होऊन हालचाल मंदावते.
रोगाची प्रादुर्भाव झालेल्या अळ्याचे मृत शरीर कडक होऊन पांढऱ्या व हिरव्या खडूसारखे दिसते.

Silk Farming
Tussar Silk Farming : वनक्षेत्रात टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन द्या

३. ग्रासरी रोग :
रोगकारक घटक ः बीएमएनपीव्ही बॉम्बॅक्स पॉलीहायड्रोसिस विषाणू
रेशीम कीटकांना होणाऱ्या विविध रोगांपैकी जवळपास ३३ ते ५५ टक्के वाटा ग्रासरी रोगाचा आहे. हा रोग सर्वच रेशीम उत्पादक देशामध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव वर्षभर होत असला तरी अधिक प्रादुर्भाव पावसाळा व उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये जाणवतो. ग्रासरी रोगग्रस्त अळ्यांची त्वचा फाटून दुधासारखा द्रव बाहेर येत असल्यामुळे याला दुध्या रोग असेही म्हणतात. त्याच प्रमाणे रोगग्रस्त अळ्या रॅकवर अथवा चंद्रिकेवर डोके खाली करून उलट्या लटकलेल्या दिसत असल्यामुळे काहीजण लटक्या रोग असेही म्हणतात.

रोग होण्याची कारणे :
ग्रासरी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रेशीम अळ्यांची त्वचा फाटून बाहेर येणारा पांढरा द्राव रॅक, तुती पाने, कीटक संगोपन साहित्य आणि जमिनीवर सांडतो. या द्रवामध्ये असंख्य विषाणू असून, त्याच्या संपर्कात आलेली अळी किंवा पांढरा द्राव पडलेली तुती पाने खाल्ल्यामुळे निरोगी रेशीम अळ्यांमध्ये ग्रासरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे एकमेकांचे कीटक संगोपन साहित्य (उदा. चॉकी ट्रे, चंद्रिका, इत्यादी) वापरण्याचे टाळावे. कारण असे साहित्यही विषाणूचे वाहक बनू शकते.
लक्षणे : रोगजंतूंचा रेशीम अळ्याच्या शरिरात प्रवेश झाल्यानंतर पाचव्या ते सातव्या दिवशी रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
रेशीम अळ्यांच्या सर्व शरीराच्या वलयांवर सूज पसरते. सुजेमुळे शरीराची त्वचा ताणली जाऊन त्वचा फाटते. त्यातून दुधासारखा पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येतो. अळ्या कातीवर बसण्यापूर्वी अळ्याच्या त्वचेला चकाकी येते. अळ्या कातीवर बसत नाहीत. तसेच अळ्यांची भूक व हालचाल मंदावून अळ्या मृत पावतात.

व्यवस्थापन :
-शिफारशीप्रमाणे योग्य त्या मात्रेमध्ये निर्जंतुकीकरण व संगोपनगृहात स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
-कोषाच्या दोन पिकात ८ दिवसाचे अंतर असावे. या काळात संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करून घेता येते. रोगाच्या प्रसारास प्रतिबंध होतो. निर्जंतुकीकरणासाठी २ टक्के ब्लिचिंग पावडर, ०.३ टक्के कळीचा चुना वापरावा. म्हणजे १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम ब्लिचिंग पावडर आणि ३० ग्रॅम चुना द्रावण तयार करून फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे. (तक्ता १)

रेशीम कीटक संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण व कामाचे नियोजन :
अनु. क्र. --- दिवस --- करावयाचे काम

१. --- पूर्वीचे कोषाचे पीक काढणीनंतर --- संगोपनगृहातील रॅक, ट्रे, फिडींग स्टॅन्ड, पाने कापणी पाटा इ. ब्लिचिंग पावडरच्या साह्याने निर्जंतुकीकरण करावे. रोगग्रस्त अळ्या व कोष वेचून नष्ट करावेत.
२. --- बाल्य रेशीम किटक आणण्याअगोदर ५ दिवसापूर्वी --- संगोपनगृहात व संगोपन साहित्य ब्लिचिंग पावडर २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून निर्जंतूक करावे.
३. --- बाल्य रेशीम किटक आणण्याअगोदर ४ दिवसापूर्वी --- अस्त्र ही निर्जंतूक पावडर ५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून संगोपनगृह व संगोपन साहित्यावर फवारून निर्जंतूक करावे.
४. --- बाल्य रेशीम किटक आणण्याअगोदर ३ दिवसापूर्वी --- संगोपनगृहात व संगोपन साहित्य ब्लिचिंग पावडर २०० ग्रॅम अधिक चुना ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये तयार केलेल्या द्रावणाने फवारणी करून निर्जंतूक करावे.
५. --- बाल्य रेशीम कीटक आणण्याअगोदर २ दिवसापूर्वी --- संगोपनगृह, व्हरांडा व संगोपन साहित्य २% फॉरमॅल्डिहाईड याचा वापर करून निर्जंतुक करावे.

रेशीम किटक संगोपन करताना घ्यावयाची काळजी :

-संगोपनगृहात प्रवेश करताना साबणाने हात पाय स्वच्छ धुवावे. संगोपनगृहात वेगळी चप्पल वापरावी.
-रेशीम कीटकांची विष्ठा व खाल्लेली पाने गोळा करून संगोपनगृहापासून दूर अंतरावर कंपोष्ट खड्ड्यात टाकावी. संगोपनगृहात तिरपे वायुविजन व्यवस्था असावी.
-वेळोवेळी रोगग्रस्त अळ्या व पोचट कोष ट्रेमधून काढून टाकावेत. सतत हात स्वच्छ धुवावेत.
-आर्द्रता ९० टक्क्यांवर असल्यास दररोज सकाळी तुती पाला टाकण्याच्या अर्धा तास अगोदर ट्रे मध्ये रेशीम कीटकांवर चुना धुरळणी करावी. यामुळे रोग प्रसार न होता बेड कोरडे राहण्यास मदत होते.
- मॅन्कोझेब २ टक्के किंवा कॅप्टन २० ग्रॅम अधिक केओलिन ९८० ग्रॅम याची धुरळणी करावी.
-रेशीम कीटकावरील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य तापमान व आर्द्रता याचे प्रमाण तक्त्यामध्ये दिले आहे.
- रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी प्लॅस्टिक चंद्रिकेवर कोष न करणाऱ्या अळ्या हॅन्डग्लोव्हज घालून हाताने वेचून घ्याव्यात. जमिनीत गाडून टाकाव्यात.
- रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर कोष तयार झाल्याची खात्री करून ५ व्या दिवशी कोष काढणी करावी.

- प्लॅस्टिक चंद्रिकेवर कोष करण्यासाठी सोडलेल्या अळ्यांच्या वरच्या बाजूस वर्तमानपत्रांचे आच्छादन करावे. म्हणजे रेशीम कीटक धागा वाया घालवत नाही.
-प्लॅस्टिक ट्रे, चंद्रिका व इतर संगोपन साहित्य ६ x ४ x ३ फूट आकाराच्या सिमेंट काँक्रिटच्या हौदात ३० ग्रॅम चुना व ५०० ग्रॅम ब्लिचिंग पावडर प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात एक तास बुडवून निर्जंतुकीकरण करावे. चंद्रिकेवरील रोगग्रस्त धागा विरघळतो.
-संगोपनगृहाच्या दाराजवळ गोणपाटाचे पायदान ठेवून त्याला पाय पुसून आत ये जा करावी. आर्द्रता जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर अधिक चुना मिश्रण शिंपडून घ्यावे.
-यशस्वी रेशीम कोष उत्पादनात ३८ टक्के वाटा उच्च प्रतीच्या तुती पाल्याचा वाटा असून. ३७ टक्के संगोपन गृहातील तापमान व आर्द्रतेचा वाटा आहे. संगोपनगृहात २२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान मर्यादित ठेवावे. आर्द्रता किंवा तापमान जास्त झाल्यास रेशीम कीटक रोगास बळी पडतात. कोष उत्पादनात घट येते.

रेशीम कीटक संगोपनगृहात पाच वाढीच्या अवस्थेत तापमान व आर्द्रता खालील प्रमाणे ठेवावे.

अवस्था --- तापमान (अंश से.) --- आर्द्रता (टक्के)

पहिली --- २७-२८ --- ८५-९०
दुसरी --- २६-२७ --- ८०-८५
तिसरी --- २५-२६ --- ७५-८०
चौथी --- २४-२५ --- ७०-७५
पाचवी --- २४-२५ --- ६५-७०


डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२
धनंजय मोहोड, ९४०३३९२११९
(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com