अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी स्थिरीकरण...

कार्यक्षम रासायनिक खत व्यवस्‍थापनासाठी स्‍थिरीकरण या पायरीबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे. एकदा स्‍थिरीकरण व्यवस्‍थित झाले तरच खत व्यवस्‍थापनातील पुढील पायऱ्यांचे काम चालू शकते.
Land Stabilization
Land StabilizationAgrowon

प्र. र. चिपळूणकर

स्‍थिरीकरण (Stabilization) आणि उपलब्धीकरण या संकल्‍पना सध्याच्या शेती शास्‍त्रात (Agriculture Science) मान्य केलेल्‍या नाहीत. शास्‍त्र आज फक्‍त पहिल्‍या पायरीबाबतच सांगते. पुढील पायऱ्यांबाबत शेतकऱ्यांना काहीच सांगितले जात नाही. हरितक्रांतीच्या (Green Revolution ) सुरुवातीला जी पिके मर्यादित अगर शिफारशीत खत हप्यात उत्तम पिकत होती तशी पुढे ती पिकेनात. असे का होत आहे? यावर स्‍थिरीकरण योग्य प्रकारे होत नाही, ते होण्यासाठी काय करणे गरजेचे आहे यावर कोठेही आजही प्रबोधन केले जात नाही. शेतकरी जगतात नेमके काय चालू आहे? शेतकरी म्‍हणतो पूर्वीप्रमाणे जमिनीच्या अंगात आता ताकद राहिली नाही. ती ताकद परत आणण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. याचा शोध घेणे ऐवजी शेतकऱ्यांनी खताचे हप्‍ते जास्‍त देण्याला पसंती दिली.

रासायनिक खतांवरील (Chemical fertilizer) खर्चात प्रचंड वाढ होत गेल्‍याने शेतकऱ्यांना पडतर कमी राहते. शेतकरी समाज ही एक समस्या आहे हे मान्य करत नाही. यावर काही उपाय असू शकतो, यावरही विचार केला जात नाही. कार्यक्षम रासायनिक खत व्यवस्‍थापनासाठी (Fertilizer Management) स्‍थिरीकरण या पायरीबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे. एकदा स्‍थिरीकरण व्यवस्‍थित झाले तरच खत व्यवस्‍थापनातील पुढील पायऱ्यांचे काम चालू शकते. या बाबत शास्‍त्रीय जगतात नेमके काय चालू आहे ते पाहूयात.

१) शास्‍त्रात फक्‍त स्‍फूरदाचेच स्‍थिरीकरण होते असे सांगितले जाते आणि ते होऊ नये साठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याबाबत अनेक शिफारशी केल्‍या जातात. स्फुरद खत फेकून देऊ नका, पेरून द्या, चळी काढून द्या, माती आड करा, मातीशी कमीत कमी संपर्क येईल अशा पद्धतीने टाका. या सर्व शिफारशी मागे स्‍फुरदाचे स्‍थिरिकरण होऊ न देणे हाच उद्देश आहे. वास्‍तविक स्‍थिरीकरण होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती होऊ नये यापेक्षा चांगली कशी करता येईल याची शिफारस पाहिजे. स्‍थिरीकरण फक्‍त स्‍फुरदाचे होते. बाकी कोणत्‍याही अन्नद्रव्याबाबत स्‍थिरीकरण शब्द उच्चारला जात नाही. वास्‍तवात मुख्य, दुय्यम व सूक्ष्म असे कोणतेही अन्नघटक असोत, मातीत दिल्‍यानंतर प्रथम सर्वांचेच स्‍थिरीकरण होते किंवा होणे गरजेचे आहे. इतका मोठा दोष शास्‍त्रात कसा राहू शकतो? याला कारण पिकाचे अन्नघटक व्यवस्‍थापन हा विषय शास्‍त्रीय जगतात रसायनशास्‍त्र विभागाकडून हाताळला जातो. रासायनिक खत जोपर्यंत पोत्‍यात आहे तोपर्यंत ते रसायनशास्‍त्रात आहे. जमिनीत मिसळले, की पुढील वाटचाल भूसूक्ष्मजीवशास्‍त्र विषयात सुरू होते. यामुळे हा विषय या दोन शास्‍त्रशाखांनी एकत्रित येऊन हाताळणे गरजेचे आहे.

२) माझ्याकडे भारतीय कृषी संशोधन परिषदेने प्रकाशित केलेली ‘पोटॅशिअम ॲण्ड अमोनिअम फिक्‍सेशन इन इंडियन सॉइल’ (पोटॅशिअम आणि अमोनिअमचे भारतीय जमिनीत स्‍थिरीकरण) अशी पुस्‍तिका आहे. या पुस्‍तिकेत नत्र आणि पालाशचे जमिनीत स्‍थिरीकरण होते हे मान्य केलेले आहे. परंतु असे होणे योग्य की अयोग्य, याबाबत लेखक द्विधा मनःस्थितीत आहेत. कार्यक्षम व्यवस्‍थापनासाठी स्‍थिरीकरण गरजेचे आहे. असे एका बाजूने मान्य करताना स्‍थिरीकरण झाल्‍यास त्‍याच्या गरजेप्रमाणे उपलब्धीकरण होईल का या शंकेत आहेत. एकदा स्‍थिर झालेले खत पिकाच्या कापणी नंतरही शिल्‍लक राहिल्‍यास हा साठा पुढील पिकासाठी ही वापरला जातो.

उपलब्धीकरण ः

१) स्‍थिर झालेले अन्नघटक वाढणाऱ्या पिकाच्या एखाद्या ठरावीक वेळच्या गरजेइतकेच उपलब्ध घटकांत सूक्ष्मजीवाकडून रूपांतरित केले जातात, हे नेमके घडते कसे हे शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. आकृतीत दाखविल्‍याप्रमाणे केशमुळाभोवती अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचे गट कार्यरत असतात. यामध्ये बॅक्‍टेरिया, ऑक्‍टिनोमायसेट्‌स‌ आणि बुरशी अशा तीनही प्रजातीचे जिवाणूकडून हे काम केले जाते. प्रत्‍येक अन्नघटक उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जाती प्रजातींच्या जिवाणूंचे नियोजन केलेले असते.

२) वनस्‍पती आपल्‍या मुळातून काही स्‍त्राव बाहेर सोडत असतात. या ‍स्रावातून नेमकी कोणती व किती प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध करून पाहिजेत याचा संदेश त्‍या त्‍या जिवाणूंच्या गटापर्यंत पोहोचतात. शास्‍त्रीय भाषेत या स्रावाला ‘रूट एक्‍झ्ड्‌स‌’ असे म्‍हणतात. एकच अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या अनेक प्रजातीपैकी नेमके हे काम कोणी करावयाचे ते जमिनीमध्ये असलेल्‍या परिस्‍थितिकीनुसार ठरते. या परिस्‍थितिकीमध्ये भरपूर वैविध्य असते. कोणत्‍याही परिस्‍थितीत हे काम चालू राहिले पाहिजे. यासाठी अनेक प्रजातीचे नियोजन असते. मुळातून पाझरणारे स्‍त्राव म्‍हणजे या जिवाणूंना लागणारे अन्नपदार्थ असतात. ते मिळताच नेमक्या त्‍या प्रजाती कार्यरत होतात. गरजेचे अन्नद्रव्य स्‍थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात आणतात. म्‍हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्‍थेतून विरघळणाऱ्या अवस्‍थेत रूपांतर हे अन्नद्रव्याचे पाण्यात द्रावण तयार होते. ते केश मुळातून शोषले जाते. गरजेइतके अन्नद्रव्य उपलब्ध केल्‍यानंतर जिवाणू परत सुप्तावस्‍थेत जातात. या क्रियेला अन्नद्रव्याचे उपलब्धीकरण असे म्‍हणतात.

स्‍थिरीकरण-उपलब्धीकरणाची वाटचाल ः

कार्यक्षम अन्नद्रव्य व्यवस्‍थापनासाठी त्‍याची वाटचाल स्‍थिरीकरण-उपलब्धीकरण याच मार्गाने होणे गरजेचे आहे. स्‍थिरीकरणात काम करणाऱ्या जिवाणूसाठी कुजणारा पदार्थ गरजेचा आहे. तर उपलब्धीकरणातील जिवाणूंचे खाद्य कुजलेला पदार्थ (पहिल्‍या गटाने कुजवून तयार केलेले खत) हे आहे. प्रत्‍येक जिवाणूला काही ठरावीक काम नेमून दिलेले असते. ते काम असेल तरच ते जिवाणू वाढतात, जितके काम असेल त्‍या प्रमाणात आपली संख्या वाढवितात काम संपल्‍यानंतर सुप्‍तावस्‍थेत जातात. असे सुनियोजित जिवाणूंचे जीवनचक्र असते. जिवाणूंना लागणारे अन्नघटक व ऊर्जा सेंद्रिय कर्बातूनच मिळू शकते. यासाठी वरील शास्‍त्राचा अभ्यास झाल्‍यासच आपल्‍याला सेंद्रिय खताचे शेतीतील महत्त्व लक्षात येते.

१) मुळातून येणारे स्राव हे फक्त अन्नद्रव्य गरजेचे संदेश देतात. यातून जिवाणूंची सेंद्रिय कर्बाची गरज भागविली जात नाही असे सांगितले जाते, की पानामध्ये एकूण प्रकाश विश्‍लेषणात तयार झालेल्‍या अन्नद्रव्यांपैकी ३३ टक्‍के अन्नद्रव्ये मुळातील स्रावावर खर्च होतात. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल तर अन्नद्रव्ये मिळविण्यासाठी यापेक्षा जास्‍त कर्ब स्रावातून सोडावा लागत असावा. यामुळे वाढीसाठी अन्नद्रव्ये कमी पडून उत्‍पादन घटत असावे. याला शास्‍त्रीय आधार मिळत नाही.

२) आपल्‍या शैक्षणिक संस्थेतून रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूवर जितके काम चालते त्‍यामानाने अन्नद्रव्य व्यवस्‍थापनातील जिवाणूंचा अभ्यास केला जात नाही. रोग निर्माण करणारे शत्रू जंतू तर पिकाच्या वाढीला मदत करणारे मित्र जंतू. शत्रू जंतू मोजके आहेत. तर मित्र जंतू अगणित आहेत. अलीकडे जिवाणूंच्या कामकाजाबाबत थोडी थोडी जागृती होत आहे. स्‍थिरीकरण व उपलब्धीकरण ही संकल्‍पना मान्य केली गेलेली नाही असे म्‍हटले जात नाही. ती जर मान्य केली तर प्रचलित शास्‍त्रातील काही संकल्पनांना मूठमाती द्यावी लागेल. माती परीक्षणातून खतमात्रा या तंत्राचा डोलारा इथे ढासळून पडेल.

३) जमिनीमध्ये त्‍या वेळच्या पिकाचा गरजेचाच साठा उपलब्ध अवस्‍थेत असतो, बाकी सर्व स्‍थिर साठ्यात असतो. आपण उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश जर जमिनीमध्ये कोणतेही पीक नसता उपलब्ध अन्नद्रव्ये मोजून त्‍यातून जमिनीतून किती अन्नद्रव्ये उपलब्ध होतील आणि बाहेरून किती द्यावी लागतील अशी गणिते कशी करू शकतो? माती परीक्षण अहवालात फक्‍त मातीत अन्नद्रव्ये देणे या पहिल्‍या पायरीबाबत सांगितले जाते. स्‍थिरीकरणाबाबत कोणतीही सूचना नसते. सेंद्रिय कर्बाची टक्‍केवारी व त्‍याचा अन्नद्रव्य व्यवस्‍थापनाशी असणारा संबंध या संबंधी आरोग्य कार्डात प्राथमिक माहितीही नसते, कार्यक्षम रासायनिक खत वापरासाठी हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे वाटते.

४) अलीकडे अन्नद्रव्य व्यवस्‍थापनात विद्राव्य खते असा नवीन प्रकार उदयाला आला आहे. आज मोठ्या प्रमाणात यांचा व्यापार चालू आहे. वापरल्‍यानंतर जलद परिणाम दिसतात. म्‍हणून शेतकरी वर्ग तिकडे आकर्षित होत आहे, पारंपरिक रासायनिक खते व विद्राव्य खते व्यवस्‍थापन यातील मुख्य फरक शेतकऱ्यांना इथे शिकविणे गरजेचे आहे. पारंपरिक खते म्‍हणजे सर्व प्रकारचा कच्चा माल आणून घरात गरजेप्रमाणे जेवण तयार करून खाणे. यासाठी संबंधित सर्व कच्चा माल तयार करणारा व ऊर्जास्रोत असे सर्व लागते. विद्राव्य खत म्‍हणजे हॉटेलातून तयार खाद्य पदार्थ आणून खाणे, इथे कच्चा माल गोळा करणे, शिजविणारी ऊर्जा वेळ व श्रम यांची काही गरज नाही. यामुळे अशी खते महाग आहेत. जमीन व्यवस्‍थापन जर व्यवस्‍थित सांभाळले तर पारंपरिक खत व्यवस्‍थापनातूनही आपण चांगले उत्‍पादन मिळवू शकतो.

५) विद्राव्य खते वापरण्यापूर्वी त्‍या अन्नद्रव्याची आयुष्यभरातील दैनंदिन गरजेचा पूर्ण अभ्यास करून त्‍याप्रमाणे त्‍यांचा वापर करणे गरजेचे असते, आपल्याकडे असा अभ्यास न करता ढोबळ मानाने, २ किलो ४ किलो सोडा रोज, एक दिवस आड, अगर आठवड्यातून एकदा असा अशास्‍त्रीय पद्धतीने वापर केला जातो. या खत व्यवस्‍थापनात स्‍थिरीकरण- उपलब्धीकरण या पायऱ्या अगर सूक्ष्मजीवांच्या कामकाजाला मूठमाती मिळते. तरीही माती माध्यमातून यांचा वापर केला जातो. त्याच वेळी शिल्‍लक भाग स्‍थिरीकरण -उपलब्धीकरण या मार्गानेच वाटचाल करतो. अर्धवट ज्ञानाने वापर करू नका. तसेच स्‍वस्‍त पर्यायाचा शोध हे काम डावलू नका, तरच शेती किफायतशीर होईल.

--------------------------------------

संपर्क ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com