Organic farming: रसायनांचा वापर न करता शेती करणे शक्य आहे का?

वनस्पती मातीतून कोणते पोषक घटक घेतात आणि ते आपण कोणत्या विद्राव्य क्षारांद्वारे वनस्पतींना उपलब्ध करून देऊ शकतो हे सुमारे २०० वर्षापूर्वी जर्मन शास्त्रज्ञ यूस्टुस फॉन लीबिग याने शोधून काढले.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

- डॉ. आनंद कर्वे

वनस्पती (Tree) आपल्या मुळांवाटे पाणी (Water Management) आणि त्याबरोबरच मातीत (Soil) असणारे इतर सुमारे १७ खनिज घटकही घेतात. याबाबतीत वनस्पतिशास्त्राचा असा एक नियम आहे की मुळांवाटे शोषले जाणारे पदार्थ हे पाण्यात विरघळलेल्या अवस्थेतच असावे लागतात.

वनस्पती मातीतून कोणते पोषक घटक घेतात आणि ते आपण कोणत्या विद्राव्य क्षारांद्वारे वनस्पतींना उपलब्ध करून देऊ शकतो हे सुमारे २०० वर्षापूर्वी जर्मन शास्त्रज्ञ यूस्टुस फॉन लीबिग याने शोधून काढले. एकदा हे घटक कोणते हे माहिती झाल्यावर वनस्पतींना रासायनिक खते देण्याचा मार्ग मोकळा झाला.

वनस्पतींना बाहेरून दिल्या जाणाऱ्या खतांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे रासायनिक खतनिर्मितीतली सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असते ती हवेतल्या नायट्रोजनच्या स्थिरीकरणाची.

या प्रक्रियेत वातावरणातील नायट्रोजन आणि एखाद्या अन्य स्रोतापासून मिळविलेला हायड्रोजन यांचा ३०० बार दाबाखाली आणि ४०० अंश सेल्सिअस तापमानात संयोग घडवून अमोनिया तयार केला जातो. हाबर-बॉश् प्रक्रिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेचा शोध १९१३ साली जर्मनीत लावला गेला.

मात्र त्या काळी त्यातून निघालेल्या अमोनियाचे नायट्रेटमध्ये रूपांतर करून ते १९१४ ते १९१८ मधील महायुद्धात स्फोटकांमध्ये वापरले गेले. 

हाबर-बॉश प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात ऊर्जा तर लागतेच पण हायड्रोजनचा स्रोत या नात्याने पेट्रोलियम किंवा नैसर्गिक इंधनवायू हे पदार्थही लागतात. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या अमोनियापासून पुढे यूरिया, अमोनियम फॉस्फेट, इ. पदार्थ निर्माण केले जातात. 

सर्व वनस्पतींना मोठ्या प्रमाणात नायट्रोजन तर लागतोच पण काही प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम हे खनिज घटकही  लागतात. ही खनिजे बरेचदा बाहेरून आयात करावी लागतात. उदा. भारतात पोटॅशियम खनिजाचे साठे आहेत पण फॉस्फरसचे खनिज मात्र आयात करावे लागते.

रासायनिक खतनिर्मितीसाठी लागणारा भांडवली आणि चालू खर्च आणि खतनिर्मितीस लागणारा कच्चा माल आयात करण्यासाठी लागणारे परकीय चलन हे ज्या राष्ट्रांकडे आहे, अशी राष्ट्रेच रासायनिक खतनिर्मितीचे कारखाने चालवू शकतात. अन्य देश आपल्याला लागणारे रासायनिक खत आयात करतात किंवा आपली शेती संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करतात.

क्यूबा या देशातही एकेकाळी रासायनिक खते आयात केली जायची, पण अमेरिकेशी वैर धरल्याने अमेरिकेने क्यूबाची नाकेबंदी केली. त्यामुळे क्यूबाला कोणतेच रासायनिक खत आयात करता येईना म्हणून क्यूबाने सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला.

Organic Farming
Organic Farming: सेंद्रिय शेतीचे घोडे नेमके अडते कुठे?

रासायनिक शेतीच्या मानाने सेंद्रिय शेतीत उत्पन्न कमी येते असे सांगितले जाते. पण संपूर्णतया सेंद्रिय शेती करूनही आपल्या देशातल्या जनतेला पुरेसे अन्नधान्य क्यूबा कसे पुरवू शकतो याचा अनेकांनी अभ्यास करून त्यावर लेख आणि पुस्तकेही प्रसिद्ध केली आहेत.

 श्रीलंका या देशाला पर्यटनाद्वारे पुरेसे परकीय चलन मिळत असल्याने श्रीलंकेने रासायनिक खते आयात करण्याचा मार्ग निवडला होता  पण २०१९-२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या जागतिक साथीने श्रीलंकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांचा ओघ आटला.

त्यामुळे श्रीलंकेला मिळणाऱ्या परकीय चलनातही लक्षणीय घट झाली आणि रासायनिक खते आयात करणे श्रीलंकेला परवडेनासे झाले. त्यामुळे श्रीलंकेने रासायनिक खतांविना शेती करण्याचा निर्णय घेतला. रासायनिक शेतीला योग्य सेंद्रिय पर्याय कोणता याचा कोणताही पूर्वाभ्यास न करता अशा प्रकारचा निर्णय इतक्या तडकाफडकी घेणे हे चुकीचे होते.

एक तर तिथल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी कोणते सेंद्रिय खत किती प्रमाणात वापरावे हे त्यांना माहिती नव्हते.

शेजारच्याच भारत देशात जीवामृत आणि पंचगव्य या दोन सेंद्रिय कृषिपद्धतींवर गेल्या २५-३० वर्षांपासून संशोधन चालू आहे आणि आज भारतातले लक्षावधी शेतकरी या पद्धती वापरून यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. जर्मनीतही बायोडायनॅमिक शेती या नावाचा एक सेंद्रिय शेतीचा प्रकार प्रचलित आहे आणि तो वापरून चांगले उत्पन्न काढणारे अनेक शेतकरी तेथेही आहेत.

पण ह्या पद्धती कोणत्या, त्यांमध्ये वापरली जाणारी खते कशी निर्माण करावयाची, त्यांची किती मात्रा द्यावयाची, ती कधी आणि कशी द्यावयाची, हे श्रीलंकेतल्या शेतकऱ्यांना कोणी कधी शिकविलेच नव्हते.

श्रीलंका सरकारने तज्ज्ञांकडून ही माहिती घेऊन आपल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावयाला हवे होते. पण तेही त्या सरकारने केले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःला जे योग्य वाटेल ते केले, आणि त्यामुळे तिथल्या शेतीचे उत्पादन इतके घटले की तिथे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.

धान्य आयात करून जनतेला उपासमारीपासून वाचविण्यासाठी लागणारे परकीय चलनही श्रीलंकेच्या सरकारकडे नव्हते. कोरोनाची साथ ओसरल्यावर श्रीलंकेत पुन्हा दूरिस्ट येऊ लागतील आणि तेथली अर्थव्यवस्था पुन्हा सुधारेल या आशेवर आंतर्राष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेला अन्नधान्य आयात करण्यासाठी कर्ज दिले. भारतानेही बरीच मोठी मदत श्रीलंकेला केली आणि त्यामुळे तिथली उपासमार तरी टळली.

मी गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीवर संशोधन करीत आहे. जीवामृत, पंचगव्य आणि बायोडायनॅमिक या सर्व पद्धतींमध्ये शेण वापरले जाते आणि त्यावर काही विशिष्ट प्रक्रिया करून मग ते शेतात वाढणाऱ्या वनस्पतींना दिले जाते.

याचा सखोल अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की शेणातल्या बॅक्टीरियांमुळे वनस्पतींचे पोषण केले जाते. नास्ति मूलम् अनौषधम् (मुळांमध्ये औषधी गुण नाहीत अशी वनस्पती नाही) या सुभाषितातून मला एक नवा विचार सुचला. तो म्हणजे वनस्पती बॅक्टेरियांना मारून त्यांच्या पेशिकांमधून आपल्याला लागणारे पोषक पदार्थ मिळवितात.

मातीत नेहमीच बॅक्टेरिया आढळतात. मातीच्या प्रकारानुसार त्यांची संख्या आणि प्रकारही भिन्न असतात. माझ्या एका सहकारी संशोधिकेने १० प्रकारच्या मातींवर प्रयोग करून हे दाखवून दिले की मातीच्या या नमुन्यांमध्ये वनस्पती वाढविल्यास केवळ ४० दिवसांत मातीतल्या बॅक्टेरियांची संख्या सरासरीने ७१ टक्क्यांनी कमी होते.    

याच अनुषंगाने उद्भवणारा दुसरा मुद्दा म्हणजे रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरायचे असल्यास सेंद्रिय खत वापरून चांगले उत्पादन कोणत्या पिकातून आणि पिकाच्या कोणत्या वाणापासून मिळते ह्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे होता.

ज्या ज्या देशांमध्ये आज रासायनिक खते वापरली जातात तेथे वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण कृषितंत्राची निवड करतानासुद्धा रासायनिक खतेच वापरली जातात. त्यामुळे आपोआपच रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारी कृषिपद्धतीच निवडली जाते.

यात पिकांची वाणे, नांगरटीची पद्धत, पाणी देण्याची पद्धत, पीकसंरक्षक औषधे कोणती वापरावी, ती कधी आणि किती प्रमाणात वापरावी, अशा अनेक बाबींचा समावेश होतो. 

रासायनिक खतांसाठी विकसित केलेले कृषितंत्र वापरून सेंद्रिय शेती केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न मिळेलच अशी आपण काही हमी देऊ शकत नाही. त्यामुळे जर रासायनिक खते बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळायचे असेल तर त्याआधी सेंद्रिय खतांना चांगला प्रतिसाद देतील अशी वाणे आणि अशी कृषिपद्धती शोधून काढावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com