डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. भीमराव कांबळे
Nutrient Management : पहिल्या भागात आपण समस्याग्रस्त जमिनींचे प्रकार, त्यांचे गुणधर्म व त्यांचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली. या भागात चुनखडीयुक्त जमिनींची सुधारणा व अन्नद्रव्ये व्यवस्थापन याविषयीची माहिती घेऊया.
चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्म
-जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो.
-जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमिनीची घडण कठीण बनते. त्यामुळे बियांची उगवण
क्षमता कमी होते.
-पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.
-जमिनीतील मातीचा सामू विम्लधर्मीय (सामू ८.० पेक्षा जास्त), तर क्षारांचे प्रमाण कमी
असते.
-मातीत मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असते. हेच प्रमाण १५ टकक्यांपेक्षा जास्त
असल्यास पिकांना वा फळपिकांना हानिकारक ठरते.
-उपलब्ध मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.
-लोहाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात. त्यास इंग्रजीमध्ये लाइन इन्डूस्ड क्लोरोसिस किंवा केवडा असे म्हणतात.
-चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने वाळवी, हुमणी,
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
चुनखडीयुक्त जमिनींचे सुधारणा व्यवस्थापन
-जमिनीची खोलवर नांगरट करावी.
-जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी वापरावीत. त्यांचा अपुरा पुरवठा
असल्यास हिरवळीची पिके (ताग, धैंचा, चवळी आदी) पेरून ती ४५ ते ५० दिवसांत जमिनीत गाडावीत.
-रासायनिक खते पृष्ठाभागावर फोकून न देता दोन चाडयाच्या पाभरीने पेरून द्यावीत किंवा मातीआड करावीत.
-नगदी भाजीपाला किंवा फळपिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये खते कुजलेल्या शेणखतात आठवडाभर मुरवून द्यावीत किंवा जिवामृतातून वाफशावर उभ्या पिकांना द्यावीत.
-स्फुरद विरघळविणाऱ्या जैविक खतांचा वापर बीजप्रक्रियेद्वारे अथवा शेणखतात मिसळून
करावा.
-रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे नत्र हे अमोनिअम सल्फेटद्वारे द्यावे. स्फुरद अन्नद्रव्य डीएपीद्वारे द्यावे. पालाश अन्नद्रव्ये शक्यतो सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे पिकांना द्यावीत.
-जमिनीत मॅग्नेशिअम सल्फेट एकरी १० ते १५ किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे.
-सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्टरी २५ किलो, झिंक कमतरतेसाठी झिंक सल्फेट हेक्टरी २० किलो, बोरॉनसाठी बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी किंवा सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड क्र. १ हेक्टरी २५ किलो जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.
-पिकांवर कमतरतेची लक्षणे (उदा. शेंड्याकडील पाने पिवळी पडणे, लहान आकाराची
दिसणे, शेंडा जळणे) दिसून येताच सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड क्र. २ ची फवारणी आठ दिवसांच्या
अंतराने दोन वेळा करावी. किंवा चिलेटेड स्वरूपात लोह, जस्त यांच्या ०.१ ते ०.२ टक्का याप्रमाणे फवारण्या कराव्यात.
-चुनखडीयुक्त जमिनीत सिंचनाची सोय ठिबकद्वारे करावी. नगदी वा फळपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा.
-चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. कापूस, गहू, ऊस,
सोयाबीन, बाजरी, सूर्यफूल, तूर, भुईमूग, सीताफळ, अंजीर, आवळा, बोर, चिंच आदी.
-अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी मळी
कंपोस्टचा वापर हेक्टरी ५ टन उन्हाळ्यामध्ये नांगरटीपूर्वी जमिनीत करावा.
कोकण विभागातील आम्ल जमिनी
कोकण म्हणजे जास्त पावसाच्या जांभ्या जमिनीचा प्रदेश आहे. येथे जास्त पावसामुळे बेसॉल्ट खडकाचे
जांभ्या खडकात रूपांतर होऊन सर्व कॅटायन (धनभारीत Ca २+ , Mg २+ etc.) पावसाने वाहून गेले आहेत. आणि लोह व ॲल्युमिना ऑक्साइड फक्त शिल्लक राहिल्याने तयार होणारी माती लाल
रंगाची झाली आहे. या प्रक्रियेला लॅटरायझेशन म्हणतात. या लाल रंगाच्या जमिनीची पाणी व
अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. सामू आम्ल असल्याने (६.५ पेक्षा कमी) भूसुधारक
म्हणून चुनखडीचा (लाइन) सामूनुसार शेणखतात मिसळून जमिनीत वापर करावा लागतो.
त्यामुळे जमिनीचा सामू सुधारता येतो. तो ७ पर्यंत आणता येतो. या जमिनीत दुय्यम
अन्नद्रव्यांचा वापर केल्यास जमिनीची घडण सुधारते. स्फुरदयुक्त सेंद्रिय खताचा (प्रॉम) वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. भातपिकास हिरवळीच्या पिकाचा म्हणजे गिरिपुष्पाचा एकरी २ टन पाला चिखलणीच्या वेळेस टाकावा. आम्ल जमिनीत जस्त व बोरॉनयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा सेंद्रिय खतात मुरवून वापर करावा.
जमीन व अन्नद्रव्ये व्यवस्थापन- महत्त्वाच्या टिप्स
-जमिनीला विश्रांती देणे गरजेचे आहे. जमीन चांगली उन्हात तापल्यास ती वाफशावर चांगली येते. त्यामुळे बऱ्याच किडी- रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
-दरवर्षी शेवटच्या कुळवाच्या आधी चांगले कुजलेले व शिफारशीनुसार हेक्टरी पाच ते दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. ज्या शेतकऱ्यांकडे ही खते उपलब्ध नसतील त्यांनी
धैंचा किंवा ताग घेऊन ४५ दिवसांत जमिनीत गाडावा. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
-पेरणीवेळी बियाण्यास वा रोपास जैविक खतांची प्रक्रिया करावी. हीच खते शेणखतात मिसळून जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ करावी. म्हणजे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल.
-ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स एकरी ३ ते ४ किलो शेणखतात मिसळून पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. म्हणजे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होऊन मर रोग होणार नाही.
-भारी काळया खोल जमिनीत तसेच चोपण जमिनीत रोटाव्हेटरचा वापर करू नये. त्याऐवजी सब सॉयलरचा वापर करावा म्हणजे जमिनी तळी धरणार नाही व त्यानंतर पिकाची वाढ खुंटणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.