Nutritious Jowar : ग्लुटेनयुक्त पौष्टिक ज्वारीचे महत्त्व...

तृणधान्यामध्ये मुख्य खाद्यपुरवठा करणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे एन्डोस्पर्म. यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. तृणधान्यांमधील लॅक्टिक ॲसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते.
Nutritious Jowar
Nutritious JowarAgroow

डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे, डॉ. आर. बी. घोराडे, डॉ. गोपाल ठाकरे

Jowar Crop : ज्वारीचे धान्य हे पौष्टिक, ग्लूटेन व आम्लता रहित असून, पचनाला हलके आहे. ज्वारीमधील साखर ही अतिशय सावकाश शरीरास उपलब्ध असल्याने मधुमेहींसाठी (Diabetes) महत्त्वाचे मानले जाते. ज्वारी धान्यामध्ये प्रथिने, खनिजे, अन्नगत तंतूमय पदार्थ (फायबर) व जीवनसत्वे आणि आवश्यक अमिनो आम्लांचे प्रमाण मुबलक आहे.

तृणधान्यांचा (Millet) उपयोग मनुष्यांच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यात आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चसाठी केला जातो. सजीवांना अन्य कोणत्याही पिकाच्या तुलनेत सर्वाधिक कर्बोदकांचा पुरवठा हा तृणधान्यांतून होतो.

तृणधान्याच्या बाहेरील आवरणामध्ये (कोंडा) अँटिऑक्सिडेट्स, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक प्रमाणात असतात. तृणधान्याच्या अंकुरामध्येेही विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी आढळून येते.

तृणधान्यामध्ये मुख्य खाद्यपुरवठा करणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे एन्डोस्पर्म. यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. तृणधान्यांमधील लॅक्टिक ॲसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते.

या जीवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. भात व गहू या पिकांच्या तुलनेत लहान तृणधान्यांमध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेड, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाणत अधिक असते.

तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हद्यविकार, मधुमेह, मोठ्या आतडयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. आयुर्मानही वाढते. यांचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी असतो. खनिजे, जीवनसत्त्वे व ॲंटिऑक्सिडंट्स यांत अधिक असून, शरीराची झीज भरून काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.

Nutritious Jowar
Crop Damage : ‘अवकाळी’मुळे गहू, ज्वारी पिके मातीमोल

भारत सरकारने ज्वारी, बाजरी सोबत अन्य सहा लहान आकाराच्या तृणधान्यांनाप्रोत्साहन देण्यासाठी २०१८ हे वर्ष ‘पौष्टिक तृणधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले होते.

भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघानेही २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावास ७२ देशांनी पाठिंबा दिला आहे.

सर्व हंगामासाठी जाती उपलब्ध

ज्वारी हे बहूआयामी पीक असून सर्व हंगामात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, कमी पाण्यात तसेच कमी निविष्ठामध्ये घेता येते. या पिकाचे साधारणतः खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन गटात वर्गीकरण करता येते.

ज्वारी पिकासाठी धान्य, चाऱ्यासाठी कडबा, कोवळ्या स्थितीमध्ये हुरडा मिळतो. याच्या कडब्यामध्ये शर्करेचेही प्रमाण असल्याने खास त्याच्या जाती विकसित केल्‍या गेल्या आहेत. गोड ज्वारीचे विविध वाण अल्कोहोल व अन्य मद्यर्काच्या निर्मितीसाठी उपयोगात येतात.

केवळ चाऱ्यासाठी लागवडीखाली असलेल्या खरीप ज्वारीचे एकेरी आणि दुहेरी कापणीसाठी वाण उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हिरवा व वाळलेला चारा वर्षभर उपलब्ध होऊ शकतो.

सोबतच खरीप हंगामाकरीता वाणी ज्वारीचे हूरड्यासाठी कमी कालावधीत येणारे आणि मळणीस सुलभ असणारे चवदार वाण मूल्यवर्धनासोबत अधिक नफा मिळविण्याकरिता उपयोगी ठरतात.

जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर रब्बी हंगामातील वाणापासून आॅक्टोबर महिन्यात पेरणी करून चांगले उत्पादन मिळते. त्याच्या धान्याची व कडब्याची प्रत उत्तम राहते. खरीप व रब्बी हंगामाव्यतिरिक्त ज्वारीची उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात लागवड केली जाते.

ज्वारीचे वाण आणि संशोधनन

भारतीय कृषी संशोधन परिषदेची हैदराबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च ही संस्था महत्त्वाचे कामकरत आहे. संस्थेच्या अधिक उत्पादनक्षम वाणांना देशाच्या विविध भागात मान्यता देण्यात आली आहे.

योग्य व्यवस्थापन केल्यास या तृणधान्यांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये ७० टक्क्यांपर्यत वाढ मिळू शकते. सोबतच त्यांचे पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. उदा. ‘एआरसीआरपी’ कार्यक्रमांतर्गत पिकांचे ‘जैविक संवर्धन’ अर्थात धान्यातील पौष्टिक गुण, पोषणमूल्यात जस्त, लोह या घटकांची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Nutritious Jowar
Dadar Jowar : दादर ज्वारीसह कडब्याला परराज्यापर्यंत उठाव

ज्वारी संशोधन केंद्र, अकोला द्वारे निर्मिती राष्ट्रीय व राज्यपातळीवर प्रसारीत विविध वाणांमध्ये प्रामुख्याने सी. एस. एच. १४, सी. एस. एच. ३५, एस. पी. एच. ३८८, एस. पी. एच.८४०, एस. पी. एच. १६३५, सी. एस. व्ही. ३४ आणि पी. के. व्ही. क्रांती या वाणांचा समावेश आहे.

खरीप ज्वारीचा सी. एस. एच. - १४ हा संकरीत वाण सर्वात कमी कालावधी म्हणजे १०० ते १०५ दिवसात तयार होतो. सी. एस. एच. - ३५ व एस. पी. एच. - १६३५ या वाणाची प्रति हेक्टर धान्य उत्पादकता ४५ ते ५० क्विंटल, तर कडबा उत्पादकता १२५ क्विंटल इतकी आहे. पी. डी. के. व्ही. कल्याणी हा शुध्द व सुधारीत वाण असून, त्याची उत्पादकता ३५ क्विंटल प्रति हेक्टरी असून कडब्याचे भरघोस १५५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. एस. पी. व्ही. - ६६९ या वाणाची भाकरी ही अन्य वाणांपेक्षा चवदार आहे.

-रब्बी हंगामाकरिता उपलब्ध वाणामध्ये पी.के.व्ही. क्रांती हा वाण सर्वोत्कृष्ट असून, धान्य व कडब्याची प्रत उत्तम आहे. सी.एस. एच ३९ आर, सी. एस. व्ही. २९ आर इ. या प्रमाणेच

- हुरड्याचे वाण : रब्बी ज्वारी हुरड्याचा नविन वाण टी. ऐ. के. पी. एस. ५ (ट्राम्बे अकोला सुरूची) हा नुकताच प्रसारीत झाला आहे. मळणीस सुलभ, हुरड्याची प्रत उत्तम, चवदार आहे. हुरड्याचे उत्पादन ४३ क्विंटल /हेक्टर असून, ११० क्विंटल हिरवा चारा मिळतो. खरीप हंगामासाठी हुरड्याच्या वाणामध्ये पीडीकेव्ही कार्तिकी आणि पीकेव्ही अश्विनी या वाणांची निर्मिती केली आहे.

- राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी यांनी प्रसारीत केलेले वाण ः फुले अनुराधा, फुले सुचित्रा, फुले वसुधा, फुले रेवती (रब्बी ज्वारी), फुले उत्तरा, फुले यशोदा, फुले माऊली, फुले चित्रा, सी. एस. व्ही - १८, सी. एस. एच- १५ तसेच हुरडा वाणामध्ये फुले मधुर व फुले उत्तरा इ.

- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी प्रसारीत केलेले वाण ः खरीपासाठी एस.पी.एच.१६४१, परभणी शक्ती, परभणी साईनाथ, परभणी श्वेता, पांचाली (खरीप वाण) तसेच रब्बी हंगामाकरिता परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी ज्योती, स्वाती, परभणी वसंत (हुरडा वाण) इ. महत्वाचे आहेत.

Nutritious Jowar
Unseasonal Rains: हिरवे स्वप्न एका रात्रीत भंगले; जयसिंगपुरात ज्वारी पीक आडवे

खारपाण पट्ट्यासाठीही महत्त्वाचे पीक

पश्चिम विदर्भामध्ये मोठा भूभाग खारपाणपट्ट्याचा आहे. ४ हजार ७०० चौ.कि.मी.म्हणून सुमारे ५० टक्के क्षेत्र खारपाणबाधीत असून, येथे पर्यायी पीक म्हणून अकोला विद्यापीठांतर्गत ज्वारी संशोधन केंद्राद्वारे ज्वारी या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे.

मागील तीन वर्षापासून या रब्बी हंगामापर्यंत, एकूण ३१५० प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यात हेक्टरी सरासरी २७.७५ ते ३६.२० क्विंटल इतकी ज्वारी उत्पादकता मिळाली आहे.

त्यातून धान्य आणि जनावरांसाठी कडबा यांची उपलब्धता होत असल्यामुळे अन्नसुरक्षेला चालना मिळते. अशा खारपाण आणि कोरडवाहू क्षेत्रात नवचैतन्य आणण्यासाठी ज्वारी हे पीक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

ज्वारीमधील पोषकतत्त्वे छ (ग्रॅम प्रति १०० ग्रॅम धान्यामध्ये)

कर्बोदके ७०.७, प्रथिने १०.४--- चरबी ३.२--- तंतुमय पदार्थ १.६--- खनिजे १.६ (ग्रॅम)

खनिजांचे नेमके प्रमाण (मि.ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम धान्यामध्ये)

कॅल्शिअम २५, लोह ५.८, फाॅस्फरस ३५२, मॅग्नेशिअम १७१, झिंक १.६, काॅपर ०.४६

जीवनसत्त्वे ः (मि.ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम धान्यामध्ये)

थायमिन ०.३८, रिबोप्लेव्हीन ०.१८, नायसिन ३.३

संपर्क : डॉ. गोपाल ठाकरे, ९४२२९३९०६५

(लेखक डॉ. शरद गडाख हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कुलगुरू असून, डॉ. विलास खर्चे हे संशोधन संचालक आहेत. तर डॉ. आर. बी. घोराडे हे ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख, तर डॉ. गोपाल ठाकरे हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com