ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तसंच दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यामुळे द्राक्ष बागेत भुरी रोगाचा (Powder Mildew) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रात्रीच तापमान कमी होत असल्यामुळे आणि पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे बागेतील आर्द्रता वाढलीय. त्यामुळे द्राक्ष बागेत (Grape Vineyard) काही समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वातावरणात द्राक्ष बागेची कशी काळजी घ्यायची याविषयी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.
द्राक्ष वेलींना अचानक पाण्याची गरज वाढेल. पानांमधून बाष्पोत्सर्जन होऊन पाणी निघून जाण्याच प्रमाण वाढेल त्यामुळे बागेला अधिक पाण्याची गरज भासेल.
बागेत पाण्याची उपलब्धता अधिक असल्यास भुरीच्या संसर्गास अनुकूल हवामान तयार होऊ शकतं. ढगाळ स्थिती देखील भुरीच्या विकासास अनुकूल ठरते.
त्यामुळे बागेतील सोर्स सिंक चा समतोल देखील बिघडू शकते. ज्यामुळे घडावर नेक्रोसीसची दुसरी समस्या उद्भवते.
द्राक्ष मण्यांचा विकास होताना सिंचनाचं कोटेकर व्यवस्थापन खूप महत्त्वाच आहे. द्राक्ष काढणी करताना मण्यांमध्ये गोडी वाढवण्यासाठी बागेत पाण्याचे प्रमाण कमी असाव लागतं.
द्राक्ष बागांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्याव.
ठीबकच्या नळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर आणाव्यात. बागेमध्ये आच्छादन करावं. घडावरील नेक्रोसिस टाळण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सिंचनाचं काटेकोर व्यवस्थापन केल्यास चांगला फायदा होईल.
तापमान वाढत असल्यामुळे नवीन बागेमध्ये रिकट घेण्यास काही हरकत नाही. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागेत भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी घडांवर कागद गुंडाळल्यानंतरही भुरी रोगाची लक्षणे पानांवर सुद्धा दिसून येतात. पहाटे पडणाऱ्या दवामुळे बागेत आर्द्रतेच प्रमाण वाढत.
पानांवर व घडांमध्ये दव पडून जास्त वेळ ओलावा राहिल्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. अशावेळी रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करण आवश्यक आहे.
निर्यातक्षम बागांमध्ये द्राक्ष वाढीच्या अवस्थेत म्हणजेच छाटणीच्या ५० दिवसांनंतर रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीची शिफारस नसते.
फवारणी केल्यास द्राक्षामध्ये बुरशीनाशकांचे अंश सापडून नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळ निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करावा.
काढणीच्या अवस्थेतील द्राक्ष घडावर सल्फर (४० एससी) ३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
या फॉर्म्यूलेशनच्या वापरामुळे द्राक्षमण्यावर सल्फर फवारणीमुळे पडणारे पांढरे डाग कमी राहण्यास मदत होईल.
तसेच जैविक नियंत्रकांचा वापर केल्यास बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी होण्यास मदत होते. ॲम्पिलोमायसीस क्विसक्वॅलीस ५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
सोबतच पोटॅशिअम बायकार्बोनेट ५ ग्रॅम किंवा कायटोसॅन ३ ग्रॅम यांचा प्रतिलिटर पाण्यातून वापर करावा.
सध्या पडणाऱ्या थंडीमुळे बऱ्याचशा द्राक्ष बागांमध्ये पेपर रॅप केले आहे. या काळात घडामध्ये आर्द्रता वाढून भुरीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करण आवश्यक आहे.
उशिरा छाटणी झालेल्या बागांमध्ये भुरीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सल्फरची फवारणी करावी.
या फवारणीनंतर काढणीपर्यंतच्या काळात बॅसिलस सबटिलिस २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे दोन फवारण्या कराव्यात. यामुळे द्राक्षावरील बुरशीनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.