Bhujal Recharging : भूजल वाढविण्यासाठीच्या उपाययोजना

Groundwater :आपण आजवर अनेकदा दृश्य पाण्याच्या साठवण आणि संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतलेली आहे. मात्र भूजलाच्या वाढीसाठी नेमक्या उपाययोजना करता येतील, याची माहिती आता घेणार आहोत.
Bhujal Recharging
Bhujal Recharging Agrowon

सतीश खाडे

Water Conservation : आपण आजवर अनेकदा दृश्य पाण्याच्या साठवण (Storage) आणि संवर्धनासाठी (Conservation) करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेतलेली आहे. मात्र भूजलाच्या (Groundwater) वाढीसाठी नेमक्या उपाययोजना करता येतील, याची माहिती आता घेणार आहोत.


खडकातील जलरोधक तळी ः
मातीतील शेततळ्यांना जलरोधक (वॉटरप्रूफ) करण्यासाठी सामान्यतः प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केले जाते. मात्र खडकाळ किंवा मुरमाड जमिनीमध्ये त्यातील अणकुचीदार दगडांमुळे प्लॅस्टिक कागदांना छिद्रे पडतात. परिणामी, त्यांचा उपयोग करता येत नाही.

अशा ठिकाणी दगडामधील भेगा वॉटरप्रूफ मटेरियलने बुजविण्याचा उपायही काही ठिकाणी केला जातो. या घटकाची विश्‍वासार्हता व आयुष्य दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिक असते. त्याची किंमतही प्लॅस्टिक कागदाच्या किमतीच्या आसपास पडते. पुणे जिल्ह्यातील पिंगोरी (ता. पुरंदर) येथे रोटरी क्लबने सात वर्षांपूर्वी दोन मोठे तलाव खडकात खोदले.

गावातील लोकांना दोन दिवसांचे खास प्रशिक्षण देऊन खडकातील भेगा वॉटरप्रूफिंग घटकाने बुजवून घेतल्या. या दोन तलावांत मिळून साठणाऱ्या दोन कोटी लिटर पाण्यामुळे पिंगोरी गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण तर झालेच, पण शेतीलाही काही प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागले. याच पद्धतीने रायगडच्या पायथ्याशी पाचाडच्या माँसाहेब जिजाऊंच्या वाड्यातील हौदाची पाणी गळतीही थांबवली गेली आहे.

अशाच प्रकारचे जलरोधक घटक आणि कौशल्ये वापरून कोकणातील पागोळी विहिरींनाही जलरोधक करून वर्षभराचे पाणी साठवणे शक्य आहे. मोठमोठ्या धरणांची पाणी गळती थांबवण्याची कामे करणारी कंपनी चालविणारे एक गृहस्थ अशा शेततळ्यांसाठी, पागोळी विहिरींसाठी, तसेच वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या गळक्या टाक्यांच्या वॉटरप्रूफिंगसंदर्भात सेवाभावी वृत्तीने मार्गदर्शन करत असतात.

Bhujal Recharging
Atal Bhujal Yojana : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

भुंगरू तंत्र (रिचार्ज शाफ्ट)

भुंगरू म्हणजे बांबू. या तंत्रात जमिनीत खोलपर्यंत बांबू रोवल्यासारखे बोअर होल करून त्यात पाणथळ शेतातील, शेताशेजारून वाहणारे किंवा सतत साचून राहणारे पाणी गाळून खाली सोडले जाते. या पाण्याने खोलवरचा सच्छिद्र खडक भरून टाकतात. यामुळे तो जलधर (Aquifer) पाण्याने भरत जाऊन भूजल वाढते.

परिणामी, परिसरातील लोकांना त्याचा फायदा होतो. पावसाळ्यात वाहून जाणारे लाखो करोडो लिटर पाणी पुढे हवे तेव्हा वापरता येते. यासाठी ओढ्यात वा नदीत सच्छिद्र खडकापर्यंत बोअरहोल घेतले जाते. त्यावरील भागामध्ये तोंडाजवळ थोडे बांधकाम करून दगड वाळू भरली जाते. हे घटक एखाद्या गाळणीप्रमाणे कार्य करतात.

त्यातून मोठ्या प्रमाणात सच्छिद्र खडकामध्ये पाणी साठवले जाते. गुजरातसह महाराष्ट्रात मराठवाड्यातील काही भागांमध्येही या पद्धतीने भूजल वाढविले जात आहे. महाराष्ट्रात गावोगावी जमिनीवरचे पाणी अडविण्याचे व साठविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले.

पुढेही होत राहिले पाहिजे. मात्र त्या सोबतच जिथे शक्य तिथे जमिनीतील पाणी वाढविण्याची चळवळही पुढे न्यायला हवी. कारण तलाव, बंधारे यांचे साठलेले पाणी असो, की नदीचे वाहते पाणी त्याचा फायदा पाण्यालगतच्या शेतकऱ्यांना अधिक मिळतो. मात्र त्या तुलनेत जमिनीत जिरलेले पाणी दूरदूरपर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा देऊ शकते.

Bhujal Recharging
Atal Bhujal Yojana : अटल भूजल यंत्रणेची जिल्हास्तरीय कार्यशाळा

दगड वाळूच्या फिल्टरला पर्याय
आता तर फिल्टर मीडिया म्हणून दगड वाळू रचणे, त्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छ करणे या कटकटींच्या व जिकिरीचे काम सोपे करणारे तंत्रज्ञान व साधने उपलब्ध होत आहेत.

त्यासाठी बाजारात बोअरवेलच्या पाइपलाच उभे बसू शकणारे फिल्टर उपलब्ध होत आहेत. ते सहजासहजी बसवता व काढता येतात. हे फिल्टर्स फडक्याने व ब्रशने सहज साफ करता येतात. ते बोअरवेलच्या केसिंग पाइपला उभे बसवता येतात. अर्धा मीटर ते सात मीटर
उंचीपर्यंत ते उभारू शकतो.

त्यामुळे फिल्टर मीडियाच्या उभारणीला व स्वच्छतेसाठी लागणारा वेळ आणि कष्ट वाचतात. त्याच प्रमाणे कमी जागेत बसवता येते. उच्च प्रकारचे तंत्रज्ञान व धातू वापरलेले असल्यामुळे या फिल्टर्सचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षे राहू शकते. त्यामुळे त्याचा फायदा करून घेता येईल.

रिचार्ज वेल :
विदर्भात काही ठिकाणी ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये ३० ते ३५ फूट खोल विहिरी घेऊन रिचार्ज शाफ्टप्रमाणेच रिचार्ज वेल (विहिरी) घेण्यात आल्या आहेत. यामुळे पाणी जमिनीत मुरून काही किलोमीटरपर्यंत भूजल वाढत जाते.

या विहिरींचाही दरवर्षी गाळ काढणे किंवा तिची स्वच्छता करणे हे मात्र नियमितपणे केले जाते. आपल्याकडेही ओढे, नाले व नदीला पाणी आल्यानंतर अशा पद्धतीने रिचार्ज विहिरींमधून आजूबाजूच्या परिसरामध्ये भूजल वाढवणे शक्य आहे.

Bhujal Recharging
Atal Bhujal Yojana : ‘अटल भूजल’द्वारे जिरणार १६ कोटी लिटर पाणी

नदीचे पाणी पंपाने उपसून बोअरवेल वा विहिरीत सोडणे :
बहुतांश वेळा नदीचे वा तलावाचे पाणी शेत जमिनीच्या पातळीपेक्षा खालच्या पातळीवर असते. परिणामी, शेतजमिनीतील बोअरवेलचे वरचे तोंडही नदीच्या पाणीपातळीपेक्षा वर असते. अशा वेळी उताराने पाणी बोअरवेल किंवा विहिरीपर्यंत आणणे अशक्य किंवा अवघड असते.

त्यासाठी पहिली सोपी पद्धत म्हणजे पंप लावून पाणी बोअरवेलपर्यंत आणून ते गाळून बोअरवेलमध्ये सोडता येते.

कारण ओढ्याच्या व नदीच्या वाहत्या पाण्याने विहिरीला ज्या गतीने पाणी वाढू शकते, तितक्या गतीने बोअरवेलला वाढत नाही. त्याच प्रमाणे आणखी एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती धरण व बंधारे यामुळे नद्या मर्यादित काळापर्यंतच वाहत्या असतात.

सायफन प्रक्रियेने बोअरवेलचे पुनर्भरण ः
दुसरी एक सोपी आणि बिनखर्चाची पद्धत म्हणजे सायफन. वाहत्या पाण्यात पाइपचे एक तोंड बुडवून आणि दुसरे टोक बोअरच्या केसिंग पाइपला पाइपच्या व्यासाचे छिद्र पाडून जोडायचे. हा जोड एमसील व त्या प्रकारच्या घटकाने हवाबंद करायचा.

ही जोडणी झाली, की बोअरवेलमधील पंप अगदी काही काळासाठी सुरू करून बंद करायचा. यामुळे बोअरवेलमधील हवा खेचली जाऊन तिथे पोकळी निर्माण होते. ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण जोडलेल्या पाइपमधून पाणी खेचले जाते.

अशा प्रकारे सायफन प्रक्रियेने पाणी बोअरवेलमध्ये ओढले जाते. मात्र यासाठी वाहते पाणी गाळ विरहितच असणे गरजेचे आहे. गढूळ पाणी बोअरवेलमध्ये अजिबात सोडू नये. अगदीच पर्याय नसेल तर ते फिल्टरने गाळूनच बोअरमध्ये सोडावे.


आणखी एक सायफन पद्धती आहे. त्यासाठी फ्लॅप असलेला फूटव्हॉल्व्ह वापरावा लागतो. पाइपच्या एका टोकाला फ्लॅप असलेला फूटव्हॉल्व्ह लावून तो बोअरवेलमध्ये सोडायचा. सोडण्यापूर्वी त्याचे तोंड (फ्लॅप) बंद करायची. ही फ्लॅप उघड बंद जमिनीवरूनच करण्यासाठी तिला तार जोडून ठेवावी. पाइपचे दुसरे तोंड जलाशय व साठलेल्या पाण्यात बुडवायचे.

ते बुडविण्यापूर्वी हा पूर्ण पाइप पाण्याने गच्च भरून घ्यायचा. पाणी भरून झाले, की फूटव्हॉल्व्ह तारेला ढील देऊन उघडायचा. पाइपमधून पाणी वाहणे सुरू होऊन ते बोरमध्ये पडते. जलाशयातले पाणी पाइपमधून सायफन प्रक्रियेने वाहत येऊन बोर पुनर्भरण होत राहते.

कोणत्याही पुनर्भरणात सर्वांत महत्त्वाची काळजी घ्यायची असते, ती कोणत्याही परिस्थितीत गढूळ किंवा गाळयुक्त पाणी विहीर किंवा बोअरवेलमध्ये जाता कामा नये.

दगडाच्या खाणी पाण्याने भरणे
गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, घरे व अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात दगड खाणीतून काढण्यात आला आहे.

अशा खाणींचा वापर पाण्याच्या साठवणीसाठी करता येऊ शकतो. त्यात नदी, नाले यांच्या पुराचे किंवा शेतातील अतिरिक्त पाणी सोडता येईल.

भूजल साठवणीसाठी आपल्या विभागासाठी योग्य ठरतील, ते उपाय करण्यासाठी गाव, समूहाने आघाडी घेतली पाहिजे.

आता शेतकरी उत्पादक कंपन्या, पाणी वापर संस्थांनी पुढे आले पाहिजे. वैयक्तिक पातळीवरही आपली बोअरवेल किंवा विहीर पुनर्भरणासाठी वेगवेगळे शक्य ते उपाय केलेच पाहिजेत. कारण शेती सिंचनासाठी पाणी हा मुख्य कच्चा माल आहे.

तोही निसर्गातूनच मोफत उपलब्ध होतो. फक्त त्याच्या वहनाचा किंवा वाहतुकीचा नगण्य खर्च करण्याची आपली तयारी असली पाहिजे. सार्वजनिकरीत्या जमिनीच्या वर पाणी साठवण्याऐवजी जमिनीतील सच्छिद्र खडकामध्ये साठवणीला प्राधान्य द्यावे. कारण ते सर्वांनाच उपलब्ध राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com