Snail Control : शंखी गोगलगायींचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे?

Soybean Snail : मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील बऱ्याच भागात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
 Snail Control
Snail Control Agrowon

डॉ. पी. आर. झंवर, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. पी. एस. नेहरकर

Snail Management : मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील बऱ्याच भागात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकामध्ये रोपावस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होते. त्यावर सामूहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.


शंखी गोगलगाय (स्नेल) किंवा शेंबी हा प्राणी मोल्युस्का या मृद्‍काय गटातील आणि गॅस्ट्रोपोडा (म्हणजेच उदरपाद) वर्गात समाविष्ट आहे. मोल्युस्का हा कीटकानंतर संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा प्राणिवर्गीय गट आहे. मागील खरीप हंगामात आढळलेली शंखी गोगलगाय ही आफ्रिकन जॉइंट स्नेल (शास्त्रीय नाव अचेटीना फुलिका) आहे. जगात अंदाजे ३५ हजारांपेक्षा जास्त गोगलगायीच्या प्रजाती असून, भारतात १४५० प्रजातींची नोंद आहे. या किडीचे उगम स्थान पूर्व आफ्रिका असून, अठराव्या शतकात पूर्वेकडील देशात या किडीचा प्रसार झाला. भारतामध्ये गोगलगायींचा प्रसार सर्वप्रथम मॉरीशियस या देशातून १८४७ मध्ये पश्चिम बंगाल कोलकत्ता येथे झाला. तिथून तिचा प्रसार महाराष्ट्रासह एकूण १२ राज्यांमध्ये झाला. आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटना (IUCN) या संस्थेने गोगलगायीचा समावेश जगातील शंभर सर्वात जास्त उपद्रवी किडींच्या प्रजातींमध्ये केला आहे. अर्थात, ती मेलेली झाडे, पिकांचे अवशेष, वनस्पतींचे अवशेष इत्यादींची विल्हेवाट लावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. अन्य छोट्या प्राण्याचे उदा. बेडूक, सरडे, पक्षी आणि लहान सस्तन प्राणी यांचे महत्त्वाचे खाद्य आहे. शंखामध्ये ९३ ते ९७ टक्के कॅल्शिअम कार्बोनेट असून, गोगलगायी निसर्गाला कॅल्शिअम हे मूलद्रव्य निसर्गामध्ये पुरवतात.

 Snail Control
Snail Control : पहिल्याच पावसात करा शंखी गोगलगायीच्या नियंत्रणाचे नियोजन

ओळख ः शंखी गोगलगायीच्या पाठीवर ४ ते ५ इंच (१० ते १२ सेंमी) लांबीचे ७-९ चक्र असलेले गोलाकार टणक असे कवच (शंख) असते. सरासरी वजन ३२ ग्रॅमपेक्षा जास्त, बहुतांशी शंखी गर्द, करडा, फिक्कट किंवा हिरवा काळपट रंगाच्या असतात.

प्रजनन : शंखी गोगलगायी (अचेटिना फ्युलिका) उभयलिंगी असतात. एकाच आकाराच्या दोन गोगलगायींचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

जीवनक्रम : अंडी, पिले आणि प्रौढ अशा तीन अवस्था.
मिलनानंतर ८-२० दिवसांनी गोगलगाय २-३ सेंटिमीटर खोलीवर ओलसर जमिनीमध्ये पुंजक्यात सुमारे २०० अंडी देते. अशी एका वर्षात ५-६ पुंजके घालते. वयाच्या पहिल्या वर्षी एक गोगलगाय साधारणतः १००, तर दुसऱ्या वर्षांपासून ५०० पर्यंत अंडी घालते. अंडी ४.५ -५.५ मिमी व्यास, पांढरट भिजविलेल्या साबुदाण्यासारखी असतात. १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक (सर्वसाधारण तापमान २४-२८ से.) तापमान गेल्यावर एक-दोन आठवड्यांत लहान गोगलगायी बाहेर निघतात. ५-६ महिन्यांमध्ये प्रौढ होऊन मिलनास प्रारंभ करतात. त्यांचे आयुष्यमान ५ ते ६ वर्षे असते. प्रतिकूल वातावरणात या गोगलगायी ३ वर्षांपर्यंत जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहू शकतात.

 Snail Control
Soybean Snail Control : शंखी गोगलगायीला आत्तापासूनच कसं रोखायचं?

अधिवास व पोषक वातावरण : गोगलगायी साधारणतः निशाचर असल्या तरी ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणात दिवसाही सक्रिय असतात. ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात संख्या झपाट्याने वाढते. सूर्यप्रकाशापासून दूर झाडझाडोऱ्यांच्या आडोशाला सावलीत, पाण्याजवळ थंड व ओलसर जमिनीत गोगलगायींचा अधिवास असतो.

सुप्तावस्था : हिवाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुप्तावस्थेत जातात. अति थंड व अति उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्र्याने बंद करून झाडाला, कुंपणावर अथवा भिंतीला चिकटून राहतात.


खाद्य : शंखी गोगलगाय बहूभक्षी असून ५०० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. कोवळ्या वनस्पती, पपई, स्ट्रॉबेरी, उंबर, टोमॅटो, सोयाबीन, कापूस, फळझाडे, भाजीपाला, तुती आणि विविध प्रकारच्या वनस्पती, तसेच कुजलेल्या वनस्पतिजन्य पदार्थांवर उपजीविका करतात.

नुकसानीचा प्रकार : गोगलगाय पानांना, फुलांना अनियमित आकाराची छिद्र पाडून पानांच्या, फुलांच्या कडा खातात. त्या रोप अवस्थेतील झाडांची कोवळी शेंडे कुरतडतात. झाडांची शेंगा, फळे आणि कोवळ्या सालीही उपजीविका करतात. मुख्यतः गोगलगायी रोप अवस्थेतील पिकांवर उपजीविका करतात. परंतु फळझाडांच्या पाने व फळांवरही आढळल्या आहेत.

गोगलगायींचा मानवी आरोग्यावर परिणाम : गोगलगायी अँजिओस्ट्रोन्गयलूस कॅन्टोनेन्सिस (Angiostrongylus cantonensis) या मेंदूज्वर होण्यास कारणीभूत परोपजीवीच्या यजमान म्हणून काम करतात. गोगलगायींच्या सतत संपर्कातील व्यक्तीस मेंदूज्वरसारखा आजार होऊ शकतो.

प्रसार : शेतातील वापरात असलेली अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, जनावरे, वाहने या मार्फत गोगलगायीचा प्रसार होतो. रोपे, कुंड्या, बेणे इत्यादींमार्फत सुद्धा प्रसार होतो.

गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढण्यामागील कारणे :
सततचे ढगाळ, दमट, पावसाळी वातावरण प्रजननासाठी अनुकूल असल्याने प्रजनन जलद होऊन गोगलगायींची संख्या अनेक पटीने वाढते. त्यातच गेल्या दोन, तीन वर्षांत (२०२० व २०२१) पावसाचा कालावधी लांबल्याने (एकूण पाऊस पडलेले दिवस) शंखी गोगलगायीची दुसरी पिढीही सक्रिय झाली. पुढील डिसेंबर-जानेवारी महिन्यात अति थंड व अति उष्ण वातावरणात त्या सुप्तावस्थेत राहिल्या. त्यानंतर २०२२ च्या खरीप हंगामात लवकर पाऊस पडला. मागील वर्षीच्या सुप्तावस्थेतील दोन्हीही पिढ्या खरीप २०२२ मध्ये सक्रिय झाल्या. या काळात लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा व रेणापूर, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब व उमरगा व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी व केज तालुक्यातील काही गावात खरीप पिकांच्या पेरणीनंतर कमी-अधिक पाऊस सतत राहिला. त्यामुळे गोगलगायीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्याने रोपावस्थेतील पिकांचे मोठे नुकसान झाले.

एकात्मिक व्यवस्थापन :
१) प्रतिबंधात्मक उपाययोजना

- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केल्यास गोगलगायीच्या सुप्तावस्था उन्हात येऊन नष्ट होतील.
- बोर्ड, भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणाहून दिवसा लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करून नष्ट कराव्यात.
- मागील वर्षी प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये नदी, नाले, ओढे, ओहोळ, कालवा, पांदण किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी गोगलगायी सुप्तावस्थेत असतात. हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या मोहीम राबवून गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात. त्या शेतात येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी शेताच्या बांधाजवळून दोन्ही बाजूने १ ते २ फुटांचे चर काढावेत. बांध स्वच्छ ठेवावेत. बांधापासून आत तंबाखू भुकटी, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सें.मी. रुंदीचा पट्टा आखावा.
फळबागेमध्ये झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डो पेस्ट (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १० लिटर पाण्यात ) लावावी.
निंबोळी पावडर, निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतिजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर करावा.

नियंत्रणात्मक उपाययोजना
-सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड घट्ट बंद करावे.
-गोगलगायी जमा करताना हातमोजे व तोंडावर मास्क घालावा.
-शेतात ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून ठेवावेत. त्या ठिकाणी आश्रयाला आलेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात नष्ट करावीत. ओल्या गोणपाटावर कोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे.

-लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रति १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे.
-बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) इ. फवारण्या काही प्रमाणात परिणामकारक असल्या तरी त्याला गोगलगाय नियंत्रणासाठी लेबल क्लेम (नोंदणीकृत) नाहीत.
-जास्त तापमान व कमी आर्द्रता असलेल्या स्थितीमध्ये मेटाल्डिहाइड हे गोगलगायनाशक प्रभावी ठरते. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाइड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.
-आर्द्रता जास्त असताना मेटाल्डिहाइडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर २ किलो प्रति एकर या प्रमाणे आमिष म्हणून वापरता येते. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात आल्यास गोगलगायी उपाशी राहून मरतात. मात्र स्पिनोसॅड ४ मिलि प्रति २ किलो आयर्न फॉस्फेटमध्ये मिसळून वापरल्यास अधिक परिणामकारक ठरते. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित आहे.
- जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेत टाकावे.
दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात थायामेथोक्झाम (२५ टक्के) ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळून हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. या आमिषापासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. कोणत्याही गोगलगायनाशक अथवा आमिषाचा वापर हा प्लॅस्टिक हातमोजे घालून काळजीपूर्वक करावा.
-या व्यतिरिक्त अंड्यांच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख, तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर, यीस्ट पावडरचे द्रावण, साखरेचे द्रावण इ. वापर गोगलगायी व्यवस्थापनासाठी करता येतो.

मेटाल्डिहाइड या गोगलगायनाशकाचे दुष्परिणाम ः
मेटाल्डिहाइड कीडनाशक गोगलगायीनी खाल्ल्यानंतर त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन लकवा होतो. पर्यायाने गोगलगायी लगेच मरतात. मात्र मेटाल्डिहाइडच्या गोळ्या (कांड्या) ओलसर जमिनीमध्ये २ ते ३ दिवस तशाच राहतात. त्या अन्य पाळीव प्राण्यांच्या (उदा. कुत्रे, शेळी, पक्षी व जनावरे) आहारात आल्यास अपाय होऊन मृत्यू संभवू शकतो. त्यामुळे मेटाल्डिहाइड या गोगलगायनाशकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
----------------------------
डॉ. पी.आर. झंवर, ७५८८१५१२४४
डॉ. डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com