Orange Cultivation : कसं असावं संत्रा लागवडीचं नियोजन?

Orange Crop : इंडो- इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड फायदेशीर ठरते. यामुळे झाडांची वाढ जोमदार होते. फळधारणा लवकर सुरू होते. बागेची उत्पादकता वाढते. लागवडीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, प्रमाणीकरण केलेल्या मातृवृक्षापासून तयार केलेली कलमे निवडावीत.
Orange Cultivation
Orange CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. स्वप्नील देशमुख, डॉ. रमाकांत गजभिये

Orange Fruit crop : इंडो- इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड फायदेशीर ठरते. यामुळे झाडांची वाढ जोमदार होते. फळधारणा लवकर सुरू होते. बागेची उत्पादकता वाढते. लागवडीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, प्रमाणीकरण केलेल्या मातृवृक्षापासून तयार केलेली कलमे निवडावीत.

संत्रा लागवडीसाठी मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन, त्याखाली पाण्याचा निचरा होईल असा माती मिश्रित मुरूम किंवा वाळूमिश्रित मातीचा थर असलेली जमीन निवडावी. आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून, खाली चोपण मातीचा थर असतो, अशा जमिनीत पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असते. पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे अन्नद्रव्याचे वहन मंदावते, नवीन पालवी येत नाही, मुळ्या सडून पुढे झाडे वाळतात. तसेच बहर घेण्यासाठी पाण्याचा ताण सुद्धा बसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्रा लागवड करू नये.

लागवडीपूर्वी माती आणि पाणी परीक्षण करावे.
१) जमिनीचा मगदूर आणि उताराच्या प्रमाणाचे अवलोकन करून क्षेत्रामध्ये आणि बाजूने चर काढावेत. किती अंतरावर, किती प्रमाणात आणि किती चर काढावेत हे नीट समजून घ्यावे. उतारास समांतर, उतारास आडवे चर खोदून ते एकमेकांशी मिळतील आणि त्यातील पाण्याचा निचरा एका ठिकाणी जमा होईल या पद्धतीने चर काढावेत.
२) बागेभोवती कुंपण केल्याने हिवाळ्यातील थंडीची लाट आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे यांपासून बागेचे संरक्षण होते. बागेच्या दक्षिण- पश्‍चिम बाजूला जैविक कुंपण करावे, त्यामुळे वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येते.
३) कलम लागवडीसाठी ६ मीटर बाय ६ मीटर अंतरावर २×२×२ फूट आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे खोदताना वरील ३० सेंटिमीटर मातीचा थर एका बाजूला टाकावा. ही माती व चांगले कुजलेले शेणखत २:१ या प्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण तयार करून दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रायकोडर्मा यांच्या मिश्रणाने भरावेत. खड्ड्याच्या तळाशी १५ ते २० सेंटिमीटर जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यावा.

Orange Cultivation
Flower Farming Planning : फुलशेतीतून चांगलं उत्पन्न मिळतं; नियोजन कसं असावं?

कलमांची निवड ः
१) शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, जोमदार वाढणारी, प्रमाणीकरण केलेल्या मातृवृक्षापासून तयार केलेली कलमे निवडावीत. जम्बेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर २० ते ३० सेंमी. उंचीवर डोळे भरलेले असावेत.
२) कलम किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृवृक्षापासून तयार केलेले नसावे. कलमाची जाडी पेन्सिल आकाराची आणि उंची २.५ ते ३ फूट असावी.
३) जम्बेरी खुंटावर केलेले कलम लवकर तयार होते, जोमाने वाढते, तसेच फळधारणा लवकर होते. साखर व आंबटपणाचा सुरेख संगम झाल्यामुळे फळे चवीला उत्कृष्ट असतात.
४) रंगपूर लिंबूवर केलेल्या कलमाची वाढ जम्बेरीवर बांधलेल्या कलमाच्या तुलनेने थोडी हळू होते. पण फळ बट्टीदार, पातळ व घट्ट साली, आकर्षक रंग तसेच उत्तम प्रतीचे तयार होतात. कलमे सूत्रकृमी, कीटक आणि बुरशीजन्य रोगास कमी बळी पडतात.
५) कलमीकरण ८ ते ९ महिन्यांपूर्वी केलेले असावे. कलम सशक्त, रोगमुक्त व जातिवंत संत्र्याच्या मातृवृक्षापासून तयार केलेली असावीत. शक्यतो पिशवीतील कलमांना प्राधान्य द्यावे.
६) निवड केलेली कलमे मॉन्सूनचा ३ ते ४ वेळा पाऊस पडून गेल्यानंतर आणि जमिनीत योग्य ओल झाल्यावर लावावीत. पॅकिंग करताना कलमांच्या मुळांना इजा होऊ न देता ओल्या मातीत गुंडाळून सभोवती तरटाने घट्ट बांधून तो भाग पाण्याने ओला करावा. त्यानंतर लागवडीच्या जागी लवकरात लवकर कलमे आणावीत.

लागवड ः
१) कलमे लागवडीपूर्वी सावलीत ठेवावीत. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना आणि खड्ड्यात पुरेशी ओल असताना
लावावीत. कलमांचा डोळा पश्‍चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभव नसतो.
२) कलम खड्ड्यात ठेवल्यावर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्ड्यात टाकावी. माती हलक्या हाताने किंवा पायाचा अंगठा व बाजूचे बोट यांचा आधार घेऊन हळुवार दाबावी. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतुमुळे तुटण्याची दाट शक्यता असते.
३) कलम पन्हेरीतून काढताना काही मुळ्या तुटतात. त्यामुळे कलमावरील पानाचे शोषण होत नाही. अशा वेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाळण्याची शक्यता असते. म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत.
४) डोळा बांधलेला भाग जमिनीपासून ६ इंच वर ठेवावा. त्यामुळे सूत्रकृमी, कीटक आणि बुरशी यांचा प्रादुर्भाव होणार नाही. खुंटावर आलेली फूट जोमाने वाढते, म्हणून ती वरचेवर काढावी.
५) लागवड केल्यानंतर वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना काठीच्या साह्याने त्याला आधार द्यावा. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर प्रत्येक कलमाच्या चहूबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी. पाऊस नसल्यास दर तीन दिवसांनी कलमांना पाणी द्यावे.

इंडो- इस्राईल पद्धतीने लागवड ः
१) लागवड गादी वाफा (३ मी. रुंद खालचा तळ × १ मी. रुंद वरचा भाग × ५० सेंमी उंची) तयार करून ६ मी. × ३ मी. अंतरावर लागवड करावी. दुहेरी पद्धतीने ठिबक नळ्यांचा वापर करून सिंचनाचे नियोजन करावे. बागेभोवती चारही बाजूंनी १ × १ मी. रुंदीचे चर काढावेत.
फायदे ः
१) पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.
२) मुळांना लवकर हवा मिळण्यास मदत होते.
३) गादीवाफ्यावर नेहमी वाफसा राहतो.
४) झाडांच्या मुळापासून पाण्याचा निचरा लवकर होत असल्यामुळे मूळकूज आणि फायटोप्थोराचा प्रादुर्भाव कमी होते.
५) झाडांची वाढ जोमदार होते.
६) फळधारणा लवकर सुरू होते. बागेची उत्पादकता वाढते.
---------------------------------------
संपर्क ः डॉ. रमाकांत गजभिये, ८५३०४५२३८१
कृषी महाविद्यालय, मूल, जि. चंद्रपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com