Animal Care : जनावरांमध्ये दिसतोय उष्णतेचा ताण

उन्हामुळे संप्रेरक कमी प्रमाणात स्रवतात, म्हणून जनावरे माजाची लक्षणे कमी दाखवतात, गाभण राहण्याचे प्रमाण घटते. दुधाच्या वेळी जनावरे जास्त पानवत नाहीत. हे लक्षात घेऊन उन्हाळ्याच्या काळात आहार, आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष ठेवावे.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. सी. व्ही. धांडोरे, डॉ. व्ही. आर. वाले

तापमान वाढल्याने जनावरांमध्ये जास्त ऊर्जा वापरली जाते, श्‍वसनदर वाढतो, भूक कमी होते, तहान वाढते, रवंथ कमी होतो, लाळ सुरू होते, तोंडाने श्‍वास सुरू होतो, कोठीपोटाचा सामू वाढतो, कोठीपोटात आम्लता वाढते, लघवीचा घट्टपणा वाढतो, दुधात घट होते, शेण घट्ट होते.

उन्हाळ्यात जनावरे माजचक्र बंद करतात, मुका माज दाखवितात. माजातील अंडे विकृत असते, अंडे सुटण्यात अडथळे येतात. गर्भधारणा प्रमाण घटते. भाकड काळ वाढतो. दोन वेतातील अंतर वाढते.

उन्हामुळे संप्रेरक कमी प्रमाणात स्रवतात, म्हणून माजाची लक्षणे कमी दाखवतात, गाभण राहण्याचे प्रमाण घटते. दुधाच्या वेळी जनावरे जास्त पानवत नाहीत. उष्णतेचा ताण असणारी जनावरे उभीच राहतात, कारण बसून श्‍वास गती वाढलेली असताना अधिक त्रास होतो. नाकावाटे होणारा रक्तस्राव उष्णतेचा तीव्र परिणाम दर्शवतो.

गोठा व्यवस्थापन :

गोठ्याचे छत जास्तीत जास्त उंच असावे. दोन जनावरांमध्ये योग्य ते अंतर ठेवावे.

- जनावरे रात्रीच्या वेळी मुक्‍त संचार पद्धतीने सांभाळावीत.

- जनावरांना मुक्तपणे गरजेनुसार थंड, स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे.

- उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी हवेच्या दिशेस थंड पाण्याने भिजवलेले पडदे बांधावेत. अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे ‘तडक्या’सारखे त्वचेचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे योग्य व्यवस्थापन करून उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते.

Animal Care
Animal Feed Management : चारा नियोजनाचा ‘दुष्काळ’

- दुपारच्या वेळी छत थंड करावे, म्हणजे गोठ्यातील तापमान चार ते पाच अंशांनी कमी होईल.

- गोठ्याच्या छतास सूर्यकिरण परावर्तित होण्यासाठी वरच्या बाजूस पांढरा रंग द्यावा.

- गोठ्याचे लोखंडी पत्रे, सिमेंट पत्रे, जाड पडदे, गवत पेंढ्यांनी झाकावेत.

- जनावराच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी त्याच्या अंगावर ओला कपडा, पोते टाकावे. अंग ओल्या कपड्याने पुसून घ्यावे.

- उष्णतेचा ताण अधिक असतो, म्हणून मुक्‍त संचार व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

- गोठ्याची जमीन दगड, फरशी, सिमेंट कोबा अशी असल्यास तापलेल्या जमिनीवर जनावरे बसत नाहीत म्हणून अशी जमीन टाळावी.

- थंडावा, निर्माण करण्यासाठी गोठ्यात पंखे, कुलर या खर्चिक उपायांपेक्षा तुषार सिंचन पद्धत अधिक उपयुक्‍त ठरते.

पाणी व्यवस्थापन :

- जनावरे थंड करण्यासाठी पाणीटंचाई लक्षात घेता बादलीभर पाणी अंगावर टाकावे.

- उन्हाळ्यात शरीरासाठी पाण्याची गरज ३० टक्के अधिक वाढते.

- पाण्याची साठवणूक लगेच तापणाऱ्या लोखंडी, प्लॅस्टिक टाकीत न करता मातीची रांजणे, सिमेंट पाइपद्वारे करावी.

- गढूळ, वास येणाऱ्या दूषित पाण्यातून बाधा होण्याची शक्‍यता असते.

- उन्हाळ्यात अचानक अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे सांसर्गिक आजार पसरू नयेत, यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

चारा व्यवस्थापन :

- जनावरांना सगळा आहार दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत पुरवावा.

- पशुखाद्यात प्रति जनावरास शरीर वजनानुसार २० ते ५० ग्रॅम

खाण्याचा सोडा द्यावा.

- शरीरातील घामावाटे सोडिअम व क्‍लोराइड क्षार कमी होत असल्याने, प्रति जनावर दररोज शरीर वजनानुसार २५ ते ५० ग्रॅम आयोडीनयुक्त मीठ द्यावे.

- शक्‍यतो ताक, गूळ, मीठ, क्षार मिश्रणे दररोज द्यावीत.

- जनावरांना ऊस, उसाचे वाडे, वाळलेला ऊस, उसाची पाने एकूण चाऱ्याच्या ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात देऊ नयेत. ऊस कुट्टी, उसाच्या पानावर एक टक्का चुन्याची निवळी शिंपडावी.

- युरिया प्रक्रिया केलेला चारा सहा महिन्यांखालील वासरांना देऊ नये, तर मोठ्या जनावरांत युरियाचे प्रमाण तीन ते चार टक्‍क्‍यांपेक्षा वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

- पशुखाद्य, चाराकुट्टी यांचे मिश्रण म्हणजे एकत्रित पशुआहार पद्धती उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्‍त ठरते.

Animal Care
Animal Feed Update : जनावरांच्या आहारात चिलेटेड खनिज मिश्रणांचा योग्य वापर

- उन्हाळ्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व वाळलेल्या चाऱ्यावर युरिया, मळीप्रक्रिया नेहमी फायद्याची ठरते.

- हायड्रोपेनिक्‍स चाऱ्याचा वापर करावा.

- शरीरातील ऊर्जेच्या पूर्ततेसाठी गुळाचा वापर करता येऊ शकतो, दुय्यम (काळा) गूळ दररोज वापरा.

- तूर, मूग, भुईमूग, हरभरा यांचे शेष, काड, तणस, पाला, उसाचे पाचट, रसवंतीत उरलेला चोथा युरिया प्रक्रिया करून वापरता येतो.

- सोयाबीन काड, गव्हाचा कोंडा, शेंगदाणा टरफले, भाताचा पेंढा, भुस्सा, कुटार, सरमाड यावर युरिया प्रक्रिया उपयुक्‍त ठरते.

- सर्व प्रकारचे डोंगरी गवत (पवना, कुसळी, मारवेल) जनावरांना चारा म्हणून वापरता येते.

- टरबूज- खरबूज साली, काकड्यांचा वापर पशुआहारात करता येतो. केळी, आंबे, संत्री या फळांच्या साली पशुआहारात वापराव्यात.

- एकावेळी किमान आठ ते दहा प्रकारचा झाडपाला, चारा ३० टक्के प्रमाणात वापरावा.

- झाडपाला, हिरवी कोवळी पाने, वृक्ष पाने चारा म्हणून वापरावीत. यात प्रामुख्याने गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया), अझोला, उंबर, पिंपळ, अंजन, बोर, कडुनिंब, आंबा, वड, बेल, जांभूळ, शमी, सुबाभूळ, शेवरी यांचा वापर करावा.

जंत निर्मूलन

- गरजेप्रमाणे गोठ्यातील व जनावरांच्या शरीरातील परजीवी नियंत्रण कटाक्षाने अवलंबावे.

- थकलेली, अशक्त, पाण्याचा अंश कमी झालेली जनावरे पशुवैद्यकांना दाखवावीत.

- अंगातील उष्णता कमी होण्यास मदत करणारी केसगळ दिसून न आल्यास म्हशी योग्यप्रकारे संपूर्ण भादरून घ्याव्यात.

उपाययोजना :

- उन्हाळ्यात शरीरताण कमी करणाऱ्या अश्‍वगंधा, शतावरी यांसह इतर औषधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्याव्यात.

- उन्हाळ्यात किमान १५ दिवसांनी पशूंची वैद्यकीय तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

- रवंथ क्रिया आणि कोठीपोटाचे कार्य सुरक्षित राहण्यासाठी जैवसंवर्धक विशेष औषधी उपाय (यीस्ट कल्चर, प्रोबायोटिक्‍स, कोठीपोट उत्तेजक औषधी) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावेत.

डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४, (पशुधन विकास अधिकारी, सांगोला, जि. सोलापूर)

डॉ. व्ही. आर. वाले, ८९९९१२८२५२, (पशुसंवर्धन विभाग, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com