Green Energy : पर्यावरण पूरक हरित ऊर्जा

पारंपरिक स्रोतांची सद्यःस्थिती पाहता भविष्यामध्ये हेच अपारंपरिक स्रोत आपल्याला अनिवार्य ठरणार आहेत. त्यामुळे त्यांचा विकास, जास्तीत जास्त वापरावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.
Green energy
Green energyAgrowon

ऊर्जा ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर तिची मागणीही वाढत आहे. काळाबरोबर संपत असणारे पारंपरिक ऊर्जा स्रोत (Traditional Energy Source) व त्यांचे भडकलेले भाव, वीजपुरवठ्यातील (Energy Supply) कपात व वाढते प्रदूषण (Pollution) यांमुळे अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अनिवार्य ठरत आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त ‘‘राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस’’ दरवर्षी २० ऑगष्ट रोजी देशात सर्व ठिकाणी साजरा करण्यात येतो.

Green energy
Solar Energy: शृंगारवाडी गावाचा सौरऊर्जा पॅटर्न

१) भारतात मुख्यत्वेकरून कोळशापासून (५२.३ टक्के) वीजनिर्मिती केली जाते. याव्यतिरिक्त ऊर्जानिर्मितीत जलविद्युत (१२.८ टक्के), नैसर्गिक वायू (६.२ टक्के), तेल (०.१ टक्का), अणू ऊर्जा (२ टक्के) यांचा वाटा आहे. सन २०३० पर्यंत ४५० गिगावॉट अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट आहे. भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा, सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलऊर्जा, जैवऊर्जा, समुद्राच्या लाटंपासून मिळणारी ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा या स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणात आढळते. पण यांचा काही प्रमाणात उपयोग होताना दिसतो.

२) सद्यपरिस्थितीत देशात ४,०३,७६० मे. वॉट इतकी अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. या अपारंपरिक ऊर्जेचा वाटा देशाच्या संपूर्ण ऊर्जानिर्मिती क्षमतेच्या अंदाजे ३० टक्के इतका आहे. देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौरऊर्जेद्वारे ऊर्जानिर्मितीचा मोठा वाटा आहे. (५७,७०६ मेगावॉट) त्याखालोखाल जलविद्युत ऊर्जा (४६,८५० मेगावॉट), पवनशक्ती (४०,७८८ मेगावॉट) आणि त्यानंतर बायोमास ऊर्जा (१०,२०६ मेगावॉट) ऊर्जेचा क्रमांक लागतो.

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती (टक्केवारी)

पवन ऊर्जा : २४.२७

सौर ऊर्जा : ३४.३५

जलविद्युत प्रकल्प : २७.८८

जैव ऊर्जा : १०.०७

लघुजलविद्युत प्रकल्प : २.९

घनकचरापासून ऊर्जा : ०.५३

अपारंपरिक स्रोत महत्त्वाचे ः

पारंपारिक स्त्रोतांची सद्यःस्थिती पाहता भविष्यामध्ये हेच अपारंपरिक स्रोत आपल्याला अनिवार्य ठरणार आहेत. त्यामुळे त्यांचा विकास, जास्तीत जास्त वापरावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. पर्यावरणामध्ये कमीत कमी कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन करण्यावर भर दिला पाहिजे. शक्य तेथे ऊर्जा बचत करणे आवश्यक आहे.

Green energy
Green Energy : मध्यप्रदेश सरकारचे २० हजार मेगावॉट हरित ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट

अपारंपरिक वीजनिर्मितीची सद्यःस्थिती (३१ मार्च अखेर)

राज्यातील एकूण स्थापित प्रकल्प : ९५८४.५७३ मेगावॉट

पवन ऊर्जा : ४९९८.२१ मेगावॉट

लघु जलविद्युत : ३७०.०२५ मेगावॉट

कृषी अवशेषांवर आधारित ऊर्जा : २१५.०० मेगावॉट

ऊस चिपडावर आधारित : २३०१.३० मेगावॉट

औद्यागिक कचरा आधारित : ३७.८३८ मेगावॉट

सौर औष्णिक व सौर फोटोव्होल्टाईक वीजनिर्मिती : १६६२.२० मेगावॉट

१) भारत सरकारच्या राष्ट्रीय सौर अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात २०२२ पर्यंत सौरऊर्जेपासून १,००,००० मेगावॉट विद्युत निर्मितीच्या उदिष्ट आहे. त्यापैकी ४०,००० मेगावॉट विद्युत निर्मिती छतावर उभारलेल्या सौर फोटोव्होल्टाइक प्रकल्पातून करावयाची आहे.

२) आंतरराष्ट्रीय सौर करार हा ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी पॅरिस येथे झाला. त्यामध्ये सौरऊर्जेचा वापर व त्यास प्रोत्साहन देऊन पृथ्वीच्या बदलत्या वातावरणावर चर्चा झाली. त्यामध्ये सहभागी असलेले देश सौरऊर्जेचा वापराकरिता एकमेकांस सहकार्य करतील असे ठरविण्यात आले.

३) पॅरिस करारामुळे सौरऊर्जा व हवेपासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या विकासात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. सन २०२२ पर्यंत याद्वारे १७५ गेगावॉट ऊर्जानिर्मितीचे लक्ष आहे.

४) पृथ्वीचे तापमान २ अंश सेल्सिअसने कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे या कराराद्वारे बंधनकारक आहे. तमिळनाडू, राजस्थान पवन ऊर्जा वापरून विद्युत निर्मिती करण्यात पुढे आहेत. भारतातील गावांमध्ये शाश्‍वत विद्युत पुरवठा करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोत महत्त्वाचा पर्याय आहे.

५) २०३० पर्यंत भारतात ३० टक्के विजेची निर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा साधने वापरून करावयाचे उद्दिष्ट आहे. भारतात सौर ऊर्जेपासून तयार होणारी वीज सात ते आठ वर्षांअगोदर १२ ते १५ रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध होती. आता दोन वर्षांपासून २.५ ते ३ रुपये इतक्या कमी खर्चात ही वीज उपलब्ध होत आहे. पवनऊर्जेपासून मिळणारी वीज ३.५ ते ४ रुपये प्रति युनिट दराने तयार होत आहे.

६) वीज संवर्धन योजना ही देशातील महत्त्वाच्या योजनांपैकी एक असून, २०२२ पर्यंत वीजनिर्मिती क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा असा या मागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. जेथे महावितरणाची वीज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सौरऊर्जेचा वार करून विजेचा प्रश्‍न सोडविण्यात येत आहे. सौर व पवन ऊर्जेपासून वीजनिर्मितीचे मोठे प्रकल्प उभारल्यास विद्युत निर्मिती खर्च बऱ्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

--------------------

संपर्क ः डॉ. सुरेंद्र काळबांडे, ७५८८७६३७८७

(प्राध्यापक व विभाग प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com