Sugarcane Management : ऊस पिकावर थंडीचा परिणाम, उपाययोजना

या वर्षी राज्यातील काही भागात ऊस पिकावर थंडीचा विपरीत परिणाम दिसत आहे. हवामान बदलामुळे येणारी ही एक शारीरिक विकृती आहे. यात पानांचा काही भाग पांढरा, हिरवट पिवळसर होतो. ही विकृती समस्याग्रस्त पानांपुरतीच मर्यादित राहते.
Sugarcane Management
Sugarcane ManagementAgrowon

डॉ. गणेश कोटगिरे, भरत पवार

Sugarcane Management हवामानातील अनुकूल अथवा प्रतिकूल बदलांचा पिकांची वाढ, उत्पन्न आणि प्रत यावर परिणाम होतो. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांचा (Climate Change) पिकांवर विपरीत परिणाम वारंवार दिसून येतो.

त्यासाठी वेगवेगळ्या हवामान परिस्थितीमध्ये पिकाचा हवामानास असणारा प्रतिसाद लक्षात घेऊन वेगवेगळी पीक पद्धती अंगीकारलेली असते.

हवामानातील बदलांमुळे पिकांवरील परिणाम जैविक किंवा अजैविक घटकांच्या माध्यमातून होतात. २००३ ते २००५ या काळात महाराष्ट्रात आणि संलग्न राज्यांमध्ये उसावर लोकरी माव्याचा (Sugarcane Pest) प्रादुर्भाव वाढला होता.

त्यामुळे ऊस उत्पादनात (Sugarcane Production) हेक्टरी २० ते २५ टन घट तर साखर उतारादेखील मोठ्या प्रमाणावर घटला होता. या वर्षी महाराष्ट्रातील काही भागांत ऊस पिकावर थंडीचा विपरीत परिणाम दिसत आहे.

याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने अभ्यासाद्वारे घेतलेली निरीक्षणे व अतिथंडीपासून पिकाच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती लेखात घेऊ.

अतिथंडीचा परिणाम

सर्व वयाच्या ऊस पिकावर अतिथंडीचा परिणाम हा वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आलेला आहे.

पिकाचा उगवण कालावधी वाढणे, कमी प्रमाणात उगवण, पाने पिवळी, जांभळी होणे, पाने टोकाकडून वाळत जाणे, पाने पूर्ण करपणे, मुळांची वाढ खुंटणे आणि त्यांची कार्यक्षमता घटणे इत्यादी परिणाम दिसून येतात.

उभ्या पिकाच्या पोग्यांतील पाने वाळतात. असे वाळलेले पोंगे सहजपणे निघून येतात. मात्र उसाच्या पोंग्यातील वाढणारा कोंब सुस्थितीत राहतो.

पानांवर पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे (बँडेड क्लोरॉसिस किंवा कोल्ड क्लोरॉसिस) दिसून येतात. ही विकृती कोणत्याही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नाही.

ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाऱ्यास अडथळा असलेल्या ठिकाणी पाने सुकण्याचे आणि वाळण्याचे प्रमाण कमी दिसून येते.

थंडीचा सर्वच ऊस जातींमध्ये कमी अधिक प्रमाणात परिणाम आढळून येतो. कोएम ०२६५ आणि को ८६०३२ या जातींच्या खोडवा पिकात इतर ऊस जातींच्या तुलनेत नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

पाचट आच्छादित पाण्याचा ताण दिलेल्या खोडवा पिकामध्ये पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे. ही समस्या पाचट ठेवलेल्या शेतापुरती मर्यादित नसून पाचट न ठेवलेल्या ऊस पिकात देखील आढळलेली आहे.

Sugarcane Management
Sugarcane Fertilizer Management : उसाला पहारीनं खत का द्यावीत?

वारंवार किंवा नुकतेच सिंचन केलेल्या पिकामध्ये थंडीचा परिणाम कमी प्रमाणात आहे. याउलट, पाण्याचा ताण दिलेल्या खोडवा पिकामध्ये पाने वाळण्याचे प्रमाण जास्त असते. पाटपाणी सिंचन पद्धती असलेल्या पिकांत या परिणामाची तीव्रता ठिबक सिंचनाखाली असलेल्या पिकाच्या तुलनेत कमी आढळते.

काही ठिकाणी नवीन लागण झालेल्या पिकाची पाने जांभळी होणे किंवा पानांची टोके वाळणे असे परिणाम दिसून येतात.

उंच आणि सखल भागातील ऊस लागवडीमध्ये थंडीचा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आला आहे. उंच भागात लागवड केलेल्या पिकामध्ये जास्त विपरीत परिणाम दिसून आले आहेत.

ऊस बेटांची उपटणी करून तपासणी केली असता बेटांमध्ये नवीन मुळे कमी प्रमाणात असली तरी जिवंत असल्याचे आढळून आले.

भारी जमिनीतील ऊस पिकात ही विकृती हलक्या जमिनीपेक्षा कमी प्रमाणात आढळली. चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत पाने वाळण्याचे प्रमाण जास्त आहे.

उपाययोजना

शेताभोवती शेवरी किंवा उंच वाढणाऱ्या गवताची लागण करावी. जेणेकरून थंड वाहणाऱ्या वाऱ्यास अडथळा निर्माण होईल.

अतिथंडीच्या कालावधीत उसाची कांडीद्वारे लागण टाळावी.

अतिथंडीमुळे कमी वयाचे खोडवा पीक पूर्णपणे करपले असल्यास त्वरित जमिनीलगत धारदार विळ्याने पिकाची कापणी करावी. कापलेल्या बुंध्यांवर कार्बेन्डाझीम १० ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ३ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

पिकास द्यावयाच्या नियमित खतमात्रे व्यतिरिक्त युरिया खताची एकरी १०० किलो अतिरिक्त मात्रा शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी.

Sugarcane Management
Sugarcane FRP : सव्वाशे साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी थकविली

खोडवा पिकात पाचट आच्छादित करून पाचटावर युरिया ५० किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो प्रति एकर प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून द्यावे. पाचट लवकर कुजण्यासाठी पाचट कुजविणारे जिवाणू (द्रवरूप स्वरूपातील १ लिटर किंवा घनरूप स्वरूपातील ४ किलो एकरी) शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पाचटावर टाकावे.

पिकास सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांच्या मात्रा माती परीक्षणावर आधारित शिफारशीप्रमाणे द्याव्यात. थंडीच्या काळात मुळांद्वारे अन्नग्रहण करण्याची क्रिया मंदावते. त्यासाठी पिकावर मुख्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतांची शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.

सिंचनासाठी नदीतील पाण्याऐवजी विहीर किंवा बोअरवेलमधील पाण्याचा वापर करावा.

चुनखडीयुक्त जमिनीत केवड्याची तसेच थंडीमुळे वाळण्याची समस्या जास्त प्रमाणात आढळते. ही समस्या टाळण्यासाठी झिंक, फेरस तसेच मँगेनीज ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात मिसळून जमिनीद्वारे किंवा फवारणीद्वारे द्यावीत. यासाठी व्हीएसआय निर्मित मल्टिमायक्रोन्यूट्रीयन्टचा वापर करावा.

पिकाची जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी व्हीएसआय निर्मित वसंत ऊर्जा या कायटोसानयुक्त उत्पादनाचा वापर ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणीद्वारे वापर करावा.

शास्त्रीय कारणमीमांसा

अति थंडी (तापमान ४ अंश सेल्सिअस पेक्षा कमी होणे) व त्याचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानांतील पेशी निर्जीव होतात. त्या निर्जीव भागात प्रकाश संश्लेषणाचे कार्य सुरळीत पार पडत नाही. परिणामी तो भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर पडतो. पोंग्यातील पानांचा निर्जीव झालेला भाग सडतो आणि नंतर वाळतो.

हवामान बदलामुळे झालेली ही शारिरिक विकृती आहे. ही विकृती समस्याग्रस्त पानांपुरतीच मर्यादित राहते. त्याचा संसर्ग इतर पानांवर होत नाही. तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या कमी होते.

काही वेळा ऊस वाढ्याच्या कोवळ्या (१, २ आणि ३ क्रमांकाच्या पानांवर) २ ते ३ इंच रुंदीचे आडवे पट्टे उसाच्या समान उंचीवर आढळून येतात. या विकृतीस ‘बँडेड क्लोरॉसिस किंवा कोल्ड क्लोरॉसिस किंवा कोल्ड इन्जुरी’ असे म्हणतात. या विकृतीमुळे किंवा समस्येमुळे पिकाचे अल्प प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

डॉ. गणेश कोटगिरे, ९९६०८३३३०१

भरत पवार, ९८९०४२२२७५, ८७८८५७४८२७

(कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विभाग,

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com