Rose Disease : हरितगृहातील गुलाबावरील डाऊनी मिल्ड्यू व्यवस्थापन

भारतीय आणि जागतिक फूल व्यापारामध्ये लांब दांड्याचे गुलाब (कट फ्लॉवर) हे प्रमुख आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या अशा गुलाब पिकाचे प्रामुख्याने नियंत्रित पद्धतीने हरितगृहामध्ये उत्पादन घेतले जाते.
Greenhouse Rose Pest
Greenhouse Rose PestAgrowon
Published on
Updated on

भारतीय आणि जागतिक फूल व्यापारामध्ये (Global Flower Market) लांब दांड्याचे गुलाब (Rose Flower) (कट फ्लॉवर) हे प्रमुख आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या अशा गुलाब पिकाचे (Rose Crop) प्रामुख्याने नियंत्रित पद्धतीने हरितगृहामध्ये उत्पादन (Greenhouse Rose Production) घेतले जाते. या पिकाच्या अनेक जाती या रोगांसाठी कमी अधिक प्रमाणात संवेदनशील आहेत. त्यात डाऊनी मिल्ड्यू या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने, फुलकळ्या किंवा देठांचे मोठे नुकसान होते. एकूणच उत्पादित फुले गुणवत्ता मानकांवर न उतरल्यामुळे दरही अत्यंत कमी होतो. फुले नाकारली जाण्याचे प्रमाण वाढते.

भारतात बेंगलोर आणि पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाळ्यात जून ते सप्टेंबर आणि हिवाळ्यातील नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. हरितगृहासारख्या नियंत्रित शेतीमध्येही या रोगाचे बीजाणू योग्य परिस्थिती मिळताच वेगाने वाढतात. त्यांचा उद्रेक होऊ शकतो. गुलाबांच्या जातीनुसार त्यांच्या संवेदनशीलता कमी अधिक असू शकते. मात्र, या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पर्णसंभारावर विपरीत परिणाम होतो. पानांच्या संख्या कमी झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण व त्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नसाठ्यांचे प्रमाण घटते. त्याचा परिणाम फुलांचा दर्जा आणि उत्पादनावर होतो.

गुलाबावरील डाऊनी मिल्ड्यू शास्त्रीय नाव : पेरोनोस्पोरा स्पार्सा

पेरोनोस्पोरा स्पार्सा ही ओमिसीट म्हणजे कमी प्रकाशामध्ये वाढणारी अप्रकाश संश्लेषीय बुरशी आहे. वातावरण ढगाळ असल्यास हरितगृहामध्ये आर्द्रयुक्त, कमी प्रकाशयुक्त वातावरण राहिल्यास बुरशी वेगाने वाढते. पेरोनोस्पोरा स्पार्सा कोवळी पाने, देठ, अंकुराची टोके, फुलांच्या पाकळ्या, हिरवे सेपल्स यावर वेगाने वाढते. या रोगाच्या पहिल्या लक्षणामध्ये पानांवर टोकदार, जांभळ्या-लाल ठिपके दिसतात.

पुढे त्याचे रुपांतर गडद तपकिरी जखमांमध्ये होते. बुरशीमुळे प्रभावित भागाचे विघटन होते. संक्रमित फुले, कळ्या आणि देठांवर जांभळ्या तपकिरी रंगाचे डाग सामान्यपणे दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या वाढीचा जोम कमी होतो. फुलांचा आकार कमी राहून योग्य दर्जा मिळत नाही. याव्यतिरिक्त, प्रसार सामग्रीद्वारे रोगजनक पसरण्याची शक्यता असते. गरम किंवा उष्ण वातावरणामध्ये या रोगाचा तितका प्रादुर्भाव होत नाही.

अनुकूल वातावरण :

दीर्घकाळापर्यंत पाने ओली राहिल्यास थंड दमट वातावरणात डाऊनी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच्या बीजाणूची वाढ २ अंश ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत जास्त होते. प्रादुर्भाव झालेल्या पानांच्या खालील बाजूला किमान १ दिवसांपासून ते ३ दिवस अनुकूल परिस्थितीत जिवंत राहतात. साधारणतः पोषक वातावरणात डाऊनी बुरशीचे बीजाणू १ महिन्यापर्यंत कार्यरत राहतात.

डाऊनी मिल्ड्यूचे स्वरूप :

डाऊनी मिल्ड्यू बुरशीचे जीवनचक्र किचकट आहे. मात्र तापमान १० ते २० अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असताना या बुरशीचे बीजाणू अंकुरित होतात. बुरशीचे तंतू (मायसेलियम) हे पानांच्या पेशींमध्ये शिरकाव करतात. त्याद्वारे त्यांचा झाडामध्ये प्रसार होतो.

१. अंकुरित उतीचे तंतू पानांच्या खालील पृष्ठभागावर तयार होतात.

२. बुरशीचे तंतू पर्णरंध्रातून बाहेर पडतात. द्राक्षाच्या गुच्छासारखे दिसतात.

३. बुरशीचे बीजाणू वारा आणि पाण्यांच्या थेंबाद्वारे एका झाडाहून दुसऱ्या झाडावर पसरतात.

Greenhouse Rose Pest
‘व्हॅलेंटाइन डे’साठी फुलला गुलाब

४. ओल्या पानांवर व जास्त आर्द्रता असलेल्या स्थितीमध्ये बीजाणू पानांच्या पृष्ठभागावर येऊन चिकटतात. योग्य वातावरणामध्ये अंकुरीत होतात. त्यातून प्रसार वाढत जातो.

५. या जीवनचक्रासाठी अनुकूल हवामानात चार दिवस लागतात. अन्य सामान्य स्थितीमध्ये ७-१(० दिवसात पूर्ण होते.

लक्षणे :

अनेक वेळा डाऊनी मिल्ड्यूची पहिली प्रथम लक्षणे दिसण्यापूर्वीच संपूर्ण हरितगृहामध्ये रोगाचा प्रसार झालेला असू शकतो. ९० ते १०० टक्के आर्द्रता आणि तुलनेने कमी तापमान यात रोगाचा विकास होतो.

गुलाब पानांवर डाऊनीमुळे जांभळे, लाल ते गडद तपकिरी रंगाचे अनियमित ठिपके तयार होतात. सुरुवातीला लहान असलेले ठिपके आकाराने वाढतात. प्रादुर्भाव वाढत जाताना पानांच्या शिरा मर्यादित राहतात, त्यामुळे डाग स्पष्ट दिसतात. शेवटी पाने गळतात.

Greenhouse Rose Pest
कशी करावी गुलाब लागवड ?

सामान्यतः नवीन पानावर प्रथम लक्षणे दिसतात. मात्र पानांचा देठ, फुलांना आधार देणारा देठ (पेड्यूंकल) आणि फुलांच्या पाकळ्या यावरही लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी वाढत असलेल्या नवीन कोवळ्या फुटींमध्ये रोगाचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारे संपूर्ण झाडांमध्ये रोगाचा प्रसार होतो. वातावरण अनुकूल राहिल्यास विशेषतः ओली पाने, उच्च आर्द्रता, हळूहळू वाहणारा वारा यामुळे बीजाण एक झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत असे एका रात्रीमध्ये संपूर्ण हरितगृहामध्ये प्रसार होऊ शकतो. रात्रीच्या वेळी बीजाणूंची निर्मिती वेगाने होत राहते.

सकाळी सूर्य वर आल्यानंतर सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे पाने सुकू लागतात. त्यावेळी बीजाणू बाहेर पडून वाहणाऱ्या वाऱ्यासोबत पसरतात. दुपारपूर्वीच नवी पाने संक्रमित होतात. तसेच खेळत्या हवेमुळे झाडाची पाने वेगाने कोरडी होते, तसेच सापेक्ष आर्द्रताही कमी होते. त्यामुळे काही प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. यामुळेच हरितगृहाच्या बाजूच्या झडपा ( कर्टन) उघडे ठेवण्याची शिफारस केली जाते. हरितगृहातील आर्द्रता कमी राखण्यासाठी सकाळी लवकर सिंचन करून घ्यावे.

प्रादुर्भाव कसा तपासावा?

डाऊनी मिल्ड्यूची शंका आल्यास विशेषतः पानावरील बाजूला लाल, तपकिरी डाग दिसल्यास पानांची खालील बाजू तपासून पाहावी. खालील बाजूला पांढऱ्या ते राखाडी रंगाचे बुरशीचे तंतू वाढलेले दिसतात. विशेषत उलटे पान डोळ्याच्या समांतर घेऊन पाहिल्यास हे तंतू स्पष्ट दिसतात.

डाऊनी मिल्ड्यू नियंत्रणासाठी उपाययोजना :

१. स्थानिक हवामानानुसार रोग प्रतिकारक्षम गुलाब जातींची निवड करणे.

२. या रोगाच्या बीजाणूची हालचाल सामान्यतः सकाळी वेगाने होते. दुपारच्या वेळी रोगाचा प्रसार कमी असतो.

३. रोग व्यवस्थापनासाठी स्वच्छता महत्वाची आहे.

४. वनस्पतीच्या वाळलेल्या काड्या कट करून झाडांच्या मुळात हवा खेळती ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

५. रोगग्रस्त झाडे सापडल्यास त्वरीत नियंत्रणाचे उपाय करावे. तेवढ्या झाडापुरती तरी बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी. शक्य असल्यास असे झाड त्वरीत काढून टाकावे. रोगग्रस्त झाडांवर अनेक वेळा बुरशी बीजाणू पुनरुत्पादित होत राहतात.

६. हरितगृहातील स्वच्छता आणि कमी आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी कर्टन उघडणे वगैरे उपायांनी वायूविजन सुधारा. यामुळे लागवडीवेळीच दोन रोपांतील अंतर योग्य ठेवले पाहिजे.

७. वातावरण पाहून प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन करावे.

८. डाऊनी मिल्ड्यू बुरशी वर नियंत्रणाचा एकमेव मार्ग म्हणजे बुरशीची ओळख लवकर पटवणे. त्यासाठी अनुकूल वातावरणामध्ये किमान एक दिवसाआड सर्व झाडांचे निरीक्षण करावे. अन्य कामे करताना निरीक्षण कसे करायचे, हे मजूरांनाही शिकवावे. अनुकूल वातावरण नसताना आठवड्यातून किमान एकदा तरी स्वतः सर्व झाडांचे निरीक्षण करावे.

९. संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असते. विशेषतः नत्राचे प्रमाण अधिक असल्यास डाऊनी मिल्ड्यू बुरशीचा अधिक प्रादुर्भाव होतो.

१०. वनस्पतीमध्ये ऊतींचे बळकटीकरणासाठी सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर उपयोगी ठरतो.

११. तीन दिवसांसाठी हरितगृहाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल असे नियोजन करावे. परदेशामध्ये हरितगृहामध्ये गरम पाण्याच्या नळ्या फिरवलेल्या असतात. त्याचा अशा वेळी फायदा होतो.

१२. वातावरण अनुकूल असताना केवळ ठिबक सिंचनाचा वापर करा. पाणी मारणे (शॉवरिंग), फॉगिंग, स्प्रिंकलर सुरू करणे टाळावे.

दशरथ पुजारी, ९८२३१७७८४४/९८८१०९७८४४

(लेखक हरितगृह फूल उत्पादन खासगी कंपनीत कार्यरत आहेत. )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com