
डॉ. दत्तात्रय गावडे, दिगांबर पटाईत
राज्यात कापूस पिकाखालोखाल सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. रोगाच्या जास्त प्रादुर्भावामुळे काही भागांत संपूर्ण पीक उपटून टाकण्याची वेळ आली होती. या रोगाची कडधान्यवर्गीय पिके आणि तणे ही यजमान आहेत.
सध्या काही भागांतील सोयाबीन पिकाची लागवड होऊन १ ते दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. काही ठिकाणी पिकावर यंदाही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून उत्पादनात होणारी घट टाळली जाईल.
लक्षणे ः
- झाडांची पाने आकाराने लहान होतात. पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो.
- पानांच्या शिराजवळ पिवळ्या रंगांचे डाग दिसतात.
- प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.
- पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड होतात.
- लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास, संपूर्ण झाड पिवळे पडतात. अशा झाडांना फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
प्रसार ः
रोगाचा प्राथमिक प्रसार बियाण्यांमार्फत, तर दुय्यम प्रसार रसशोषक किडींमार्फत होतो. त्यात प्रामुख्याने पांढरी माशी व मावा या किडींचा समावेश आहे.
एकात्मिक व्यवस्थापन ः
- रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी.
- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त पाने वेळोवेळी काढून नष्ट करावीत. जेणेकडून निरोगी झाडांवर होणारा रोगाचा प्रसार टाळला जाईल.
- आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास रोगाचे प्रमाण कमी करणे शक्य होते.
- बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी. जेणेकडून किडीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात होणारा रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल.
- लागवडीनंतर सुरुवातीचे ४५ दिवस पीक तणविरहित ठेवावे.
रोगवाहक किडींचे नियंत्रण ः
-रोगवाहक किडींच्या प्रतिबंधासाठी शेतामध्ये निळे व पिवळे सापळे एकरी २५ या प्रमाणे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.
- उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा
अझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या (अर्थात गरजेनुसार) घ्याव्यात.
रासायनिक फवारणी (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी- नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण)
- थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि किंवा
- बीटा सायफ्लुथ्रीन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के डब्ल्यू ओडी) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिलि किंवा
- ॲसिटामिप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ ग्रॅम.
- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०
- दिगंबर पटाईत, ७५८८०८२०४०
(डॉ. गावडे हे कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव पुणे येथे पीक संरक्षण विभागात, तर
पटाईत हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.