Crop Research : सोयाबीन, गहू, द्राक्ष संशोधनात आघारकर संशोधन संस्थेचे योगदान

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. देशातील कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान विस्तारामध्ये या संशोधन संस्थेचा मोठा वाटा आहे.
Crop Research
Crop ResearchAgrowon

डॉ. मनोज ओक, डॉ.अजित चव्हाण

महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये डॉ.गो.बा. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९५४ साली प्रथमच भारतीय गव्हाच्या आंतरप्रजाती आणि आंतरजेनेरिक संकरण या विषयासंबंधी संशोधन (Crop Research) सुरू झाले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अर्थसहाय्याने संस्थेत १९६८ मध्ये सोयाबीन (Soybean), १९७०मध्ये द्राक्ष आणि १९७४ मध्ये गहू पिकांसाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प सुरू झाला. या संशोधनाचा शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढीसाठी चांगला फायदा झाला आहे.

Crop Research
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

गहू पिकातील संशोधन ः

१) संस्थेमध्ये सरबती, बन्सी आणि खपली या तीन गव्हाच्या प्रजातींचे बागायती, मर्यादित सिंचन आणि उशिरा पेरणीसाठी उपयुक्त जाती तयार करण्याचे कार्य चालू आहे. संस्थेने आतापर्यंत गव्हाच्या १५ सुधारित जाती विकसित केल्या आहेत.

२) १९७८ ते २००८ या काळात एमएसीएस ९, एमएसीएस १९६७, एमएसीएस २४९६, एमएसीएस २६९४, एमएसीएस२८४६, एमएसीएस ३१२५ आणि एमएसीएस ६१४५ या जाती विकसित केल्या आहेत.

यापैकी एमएसीएस २४९६ ही जात १९९४ ते १९९८ या कालावधीत सलग ५ वर्षे राज्यस्तरीय उत्पन्न स्पर्धेत प्रथम क्रमांकावर होती. ही जात दोन दशकांपेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होती.

३) २००९ ते २०२२ या काळात एमएसीएस २९७१, एमएसीएस ६२२२, एमएसीएस ६४७८, एमएसीएस ३९४९, एमएसीएस ४०२८, एमएसीएस ४०५८ या जाती विकसित करण्यात आल्या. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये एमएसीएस ६२२२ या जातीचा चांगला प्रसार झाला आहे. या जातीची ६ ते ७ टन प्रति हेक्‍टरी उत्पादनाची क्षमता आहे. ही जात तांबेरा आणि हवामानातील बदलांना प्रतिकारक आहे.

४) एमएसीएस ४०२८ आणि एमएसीएस ४०५८ या जातीमध्ये अधिक प्रमाणात प्रथिने, जस्त व लोह असल्यामुळे या जाती बायोफॉर्टीफाइड म्हणून ओळखल्या जातात. या जाती ‘कुपोषण मुक्त भारत' अभियानांतर्गत देशातील जनतेची सूक्ष्मअन्नद्रव्यांची गरज भागविण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. गेल्या पाच वर्षात एमएसीएस ६४७८, एमएसीएस६२२२, एमएसीएस ३९४९, एमएसीएस ३१२५ आणि एमएसीएस २९७१ या जाती बीजोत्पादनात आहेत. अधिक उत्पादनक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, उत्तम गुणवत्तेमुळे या जातींच्या लागवडीखालील क्षेत्र अंदाजे २ ते २.५ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

Crop Research
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

सोयाबीनमधील संशोधन ः

१) सोयाबीन सुधार प्रकल्पामध्ये तेलाचे प्रमाण अधिक, रोगप्रतिकारक, उच्च उत्पादन देणाऱ्या आणि शेंगा फुटण्यास प्रतिकारक जाती विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. संस्थेने आतापर्यंत सोयाबीनच्या १२ सुधारित जाती विकसित केल्या आहेत.

२) १९७८ ते १९९८ च्या काळात सोयाबीनच्या मोनेटा, एमएसीएस १३, एमएसीएस ५७, एमएसीएस ५८, एमएसीएस१२४ आणि एमएसीएस ४५० या जाती विकसित करून लागवडीसाठी प्रसारित करण्यात आल्या.

३) महाराष्ट्रात सोयाबीन लागवड क्षेत्र वाढीमध्ये एमएसीएस १२४ या जातीचा मोठा वाटा आहे. या जातीस भारतातील ‘लँड मार्क जात’ म्हणून ‘इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग, नवी दिल्ली’ द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.

४) २०१२ मध्ये एमएसीएस ११८८ आणि सन २०१६ मध्ये एमएसीएस १२८१ या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झाल्या. या जातींची उत्पादन क्षमता ३२ ते ३९ क्विंटल प्रति हेक्टर आहे, त्यामुळे या दोन्ही जाती बियाणे उत्पादनात आघाडीवर आहेत.

५) एमएसीएस १४०७, एमएसीएस १४६० आणि एमएसीएस १५२० या जाती जानेवारी २०२१ मध्ये देशातील उत्तर-पूर्व क्षेत्र, दक्षिण क्षेत्र, पूर्व आणि मध्य क्षेत्र या विविध कृषी हवामान क्षेत्रांमध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आल्या. या जाती देशातील विविध हवामानास अनुकूल असून, त्यापासून सरासरी २१ ते ३२ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीची उगवण क्षमता चांगली असून विविध कीड, रोगास प्रतिकारक आहेत.

Crop Research
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

६) भविष्यातील हवामानातील बदल, जैविक व अजैविक घटक यांना पूरक जातींची निर्मिती आणि उत्तम पोषकता, गुणवत्ता साधण्यासाठी पीक सुधार प्रकल्पात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. संस्थेद्वारे दक्षिण भारतात लागवडीसाठी कुनिट्झ ट्रिप्सिन इनहिबिटर विरहित सोयाबीनची एमएसीएसएनआरसी १६६७ ही जात २०२१ मध्ये प्रसारित झाली.

या जातीमध्ये प्रथिनांची जैव उपलब्धता अधिक आहे. म्हणून ही जात सोयाआधारित खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. सध्या संस्थेमध्ये जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने विविध जनुकांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग भविष्यातील आव्हानांना पूरक जाती तयार करण्यासाठी केला जात आहे.

द्राक्षातील संशोधन ः

१) संस्थेच्या प्रक्षेत्रावर द्राक्ष सुधार प्रकल्पांतर्गत देशभरातून द्राक्षाच्या सुमारे ८० प्रजातींचे संकलन व संवर्धन करण्यात आले आहे. सन १९७८ पासून संकरीकरणातून नवीन जाती विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. विकसित झालेले संकर त्यांचे उत्पादन,चव तसेच रोग प्रतिकारक क्षमतेच्या दृष्टीने तपासून पाहण्यात आले. यातूनच एआरआय ५१६, एआरआय २७ यासारख्या संकरित जाती तसेच बीन बियांची अनाबेशाही- ओएम ३०२ या जाती सरस ठरल्याचे आढळून आले आहे.

२) संस्थेने विकसित केलेली एआरआय-५१६-१ ही जात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जात प्रसार प्रणालीद्वारे अधिसूचित करून लागवडीसाठी प्रसारित केलेली देशातील पहिली जात आहे. ही जात पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तमिळनाडू या चार राज्यांमध्ये लागवडीसाठी प्रसारित आणि अधिसूचित केली आहे. ही जात ज्यूस, वाइन आणि मनुका तयार करण्यासाठी उत्तम असून अधिक उत्पादन, कमी लागवड खर्च, अप्रतिम चव आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे लागवड क्षेत्र वाढत आहे.

Crop Research
5 G India : 5G मुळे गावागावांत क्रांती होणार ः नरेंद्र मोदी

प्रजनक बियाणे आणि माहितीचा प्रसार ः

संस्थेने विकसित केलेल्या गहू व सोयबीन पिकाच्या विविध जातींचे दरवर्षी सुमारे ३०० ते ५०० क्विंटल प्रजनक बियाणे देशातील सरकारी बीज गुणन यंत्रणा, नीम सरकारी बीज गुणन यंत्रणा, सहकार क्षेत्रातील संस्था, कृषी विज्ञान केंद्र, इत्यादींना वितरित केले जाते.

संस्थेद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर पीक प्रात्यक्षिक, चर्चासत्रे, शेतकरी मेळावे, विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक प्रकाशने व सोशल मीडिया इत्यादींद्वारे पिकांबद्दल अद्ययावत माहिती पुरविली जाते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैव तंत्रज्ञान विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत संस्थेस संशोधनासाठी अर्थसाहाय्य केले जाते. ही संस्था देशातील आणि परदेशातील अनेक संशोधन संस्थांबरोबर सोयाबीन, गहू आणि द्राक्ष पिकांच्या समग्र वृद्धीसाठी संशोधन करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com