Weather Station : हवामान केंद्राच्या उभारणीला हवे प्राधान्य

Weather Update : हवामान केंद्र हे केवळ तापमान आणि पावसाचे प्रमाण सांगण्यासाठी कार्य करतात, हा एक समज शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र त्या पलीकडेही हवामान आधारित पिकांचे सल्ले हे महत्त्वाचे साधन असून, त्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.
Weather Station
Weather StationAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Weather Station Update : बहुतांश गावांमध्ये तरुण व सुशिक्षित सरपंच आहेत. गावेही ‘आदर्श’ झाली असून, तिथे प्रगतिशील शेतकरी व त्यांचे गट कार्यान्वित आहेत. यासह गावातील फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांनी स्थानिक हवामान केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या केंद्रामुळे संपूर्ण गावाची एक फवारणी जरी वाचली किंवा वेळेवर झाल्याने पीक वाचले तरी एक-दोन हंगामातच त्याचा खर्च वसूल होईल.

हवामान केंद्राची संरक्षित जागेत उभारणी करणे ही एक बाब आणि ते दीर्घकाळ कार्यान्वित ठेवणे ही दुसरी बाब. त्यासाठी त्याची नियमित देखभाल जबाबदारीने करावी लागते. देखभालीमध्ये त्यावरील धूळ पुसून किंवा धुऊन काढणे, पक्ष्यांची विष्ठा पडली असेल तर ती स्वच्छ करणे अशा साध्याच केवळ दहा-पंधरा मिनिटांत होणाऱ्या बाबींचा समावेश आहे.

मात्र ती नियमित करावी लागते. नोंदली जाणारी माहिती संगणकावर गोळा केल्यानंतर योग्य विश्‍लेषण करून त्यावर आधारित सल्ला देण्यासाठी योग्य सल्लागाराची गरज असते. आजकाल ऑनलाइन माहिती पाठवणे सोपे झाल्याने सल्लागार हा कितीही दूर असला तरी त्याचे मार्गदर्शन घेणे शक्य आहे.

या व्यतिरिक्त उपग्रह आधारित नोंदी या संगणक किंवा मोबाईल ॲपवरही काही किरकोळ शुल्कामध्ये उपलब्ध होतात. त्याचाही आधार काही शेतकरी घेऊ लागले आहेत. अशा कोणत्याही प्रकारे हवामानाच्या माहितीवर लक्ष ठेवून पिकांचे संरक्षण व गुणवत्ता साधल्यास सर्वांचाच फायदा आहे.

Weather Station
Weather Station : प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये का असावे हवामान केंद्र?

हवामान आधारित सल्ला

हवामान केंद्र उत्पादक काही कंपन्या या त्यांचे हवामान केंद्र बसविल्यानंतर पुढील सल्लासेवाही पुरवतात. काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर, तर काही ठिकाणी शेतकरी किंवा ग्रामपंचायतीने अशी केंद्रे उभारली आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यातही नगर व नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. नगर जिल्ह्यातील एकट्या राहता तालुक्यात ५० पेक्षा अधिक हवामान केंद्र कार्यरत असल्याची माहिती आहे.

नारायणगाव (जि. पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यांच्याकडे उभारलेल्या हवामान केंद्राच्या साह्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना पीक विषयक सल्ला दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान वाचले आहे.

हवामान आधारित सल्ल्यामध्ये संभाव्य पाऊस, तापमान, वारे, थंडी, वादळे यांची वेळीच माहिती देतानाच त्यामुळे पिकामध्ये निर्माण होणाऱ्या ताणामुळे रोग व अन्य समस्या निर्माण होतात. त्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या घटकांची (बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रियंट वा ताण कमी करणाऱ्या रसायनांची) फवारणीचा सल्ला वेळीच मोबाईल मेसेजद्वारे पोहोचवला जातो.

त्याचे प्रमाण दिलेले असल्यामुळे सामान्यातील सामान्य शेतकरीही सल्ल्यानुसार उपाययोजना करू शकतो. विनाकारण भीतीपोटी केल्या जाणाऱ्या फवारण्या टाळता येतात. परिणामी मोठा खर्च वाचतो.

काही करार शेती करणाऱ्या कंपन्या एकाच वेळी शेतकरी आणि वेगवेगळ्या मॉल्ससोबत करार करत आहेत. उत्तम दर्जाचा माल पुरविण्यासाठी त्यांच्याकडून त्या परिसरासाठी हवामान केंद्राची उभारणी करून सल्ला सेवा घेतली जाते. काही कंपन्यांची अशी स्वतःची केंद्रे आहेत, तर काही दुसऱ्यांकडून ही सेवा घेतात. मात्र त्याचा अंतिम फायदा तेथील शेतकऱ्यांनाही होत आहे.

नाशिक येथील शेतकऱ्यांची कंपनी असलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’

तर यापुढचे पाऊल टाकले आहे. त्यांनी स्वतःच हवामान केंद्र बनवले असून, त्याद्वारे जगभरातील वेधशाळांमधील हवामान अंदाजाचेही निरीक्षण केले जाते. त्याचा लाभ संभाव्य नुकसान टाळण्यासाठी होत आहे.

एकदा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे नाशिक परिसरात मोठ्या वादळाची शक्यता होती. त्याची सूचना चार दिवस आधीच मिळाल्यामुळे सह्याद्रीच्या सदस्य शेतकऱ्यांनी काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असलेले बहुतांश सर्व द्राक्षघडाची वेगाने काढणी करून घेतली.

द्राक्षांचे सर्व घड सुरक्षित जागी ठेवले. चौथ्या दिवशी खरोखरच प्रचंड गारपीट झाली. अन्य शेतकऱ्यांच्या बागेत प्रचंड नुकसान झालेले असताना या शेतकऱ्यांच्या एका मण्याचेही नुकसान झाले नव्हते. ही सर्व द्राक्ष निर्यातक्षम होती, हे लक्षात घेतल्यास कोट्यावधीचे नुकसान टळले होते.

पीकविमा व हवामान केंद्र :

पीकविमा साधारणपणे उत्पादनातील तफावत आणि आपत्तीतील नुकसान (पॅरामेट्रिक कव्हर) या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. यातील आपत्तीमधील पीक नुकसानीसंदर्भात स्थानिक हवामान केंद्र खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी पिकाला नुकसान करणारा पाऊस, तापमान (ऊन आणि थंडी दोन्हीही), वाऱ्याचा वेग (वादळे, चक्रीवादळे) यांचे निकष अनुभव आणि अभ्यासातून तज्ज्ञ ठरवितात.

एखाद्या आपत्तीमुळे झालेले नुकसान मोजण्यासाठी मान्यताप्राप्त स्थानिक हवामान केंद्रावरील नोंदी ग्राह्य धरल्या जातात. मात्र असे केंद्र नसल्यास तालुका किंवा मंडलातील (तीन ते चार गांव मिळून एक मंडळ) हवामान खात्याची आकडेवारी ग्राह्य धरतात. अर्थात, हा परीघ मोठा असल्यामुळे परिस्थितीत तफावत असण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे कंपनी आणि शेतकरी यामध्ये नुकसान भरपाईवरून वाद होतात. किंवा शंका घेतल्या जातात. यासाठी एक उदाहरण राहू. केळीच्या बागेचा उच्च वाऱ्यासाठी विमा काढून ठेवला आहे. एप्रिल, मेच्या वादळात फुलोरा अवस्थेत असलेल्या केळी बागेचे मोठे नुकसान झाल्यास विमा कंपन्या त्या परिसरातील वाऱ्याचा वेग तपासतात.

तो वेग ताशी ४५ किलोमीटरपेक्षा अधिक असल्यास त्या परिसरातील सर्व विमाधारक केळी बागायतदारांना विनासायास नुकसान भरपाई मिळते. अशा वेळी त्या गावात हवामान केंद्र असेल तर त्याच्या नोंदी ग्राह्य धरल्या जातात. असे केंद्र नसलेल्या ठिकाणी शासकीय हवामान खात्याने नोंदवलेल्या आकडेवारीचा संदर्भ घेतला जातो.

Weather Station
Climate Change : हवामान बदल अन् जलसंकट...

मात्र ज्या ठिकाणी शासकीय हवामान खात्याचे केंद्र आहे तिथे त्यांच्या नोंदीना अधिक प्राधान्य दिले जाते. हाच मुद्दा अतिवृष्टी, अवर्षण, थंडी, ऊन, आर्द्रता यातून होणाऱ्या नुकसानाबाबतही लागू होतो. हवामान केंद्राचे विम्याशी असलेले हे नाते लक्षात घेतल्यास प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व नक्की पटेल.

शक्यतो मॉन्सूनपूर्वीच गावात व्यक्तिगत, गटाने, गावाने एकत्रित असे हवामान केंद्र उभारण्यास प्राधान्य द्यावे. या हंगामापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही.

हवामान केंद्रातील उपकरणे

स्थानिक हवामान केंद्रामध्ये नेमकी कोणती सयंत्रे असावीत आणि त्यासोबत आपल्या शेतामध्ये कोणती संयंत्रे असली पाहिजेत, याचा एक ढोबळ आढावा आपण मागील भागामध्ये घेतला.

त्यामध्ये प्रामुख्याने वाऱ्याची दिशा, वेग व दाब मोजणारी यंत्रे, प्रकाशाची तीव्रता, पर्जन्यमापी, हवेतील आर्द्रता व तापमान मोजणाऱ्या उपकरणांबरोबरच शेतामध्ये मुळांच्या परीक्षेत्रातील ओल, झाडाच्या पानांवरील ओलावा, जमिनीचे तापमान यांचे मापन करणारी सयंत्रे यांचा समावेश असतो.

जमिनीतील ओलावा (आर्द्रता) :

झाडांच्या मुळाभोवती वाफसा अवस्था म्हणजेच ५०% माती व खत, २५% पाणी, २५%हवा ही स्थिती जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी सिंचनाचे नियोजन करताना जमिनीतील ओलाव्याचे मापन उपयोगी ठरते. जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी सोटमूळ व तंतुमूळ या दोन्ही भोवती सेन्सर्स दिलेले असतात.

त्यांच्या माहितीचा उपयोग करून काटेकोर सिंचन करण्यासाठी ‘फुले इरिगेशन ॲप’ हे मोबाईल उपयोगी ठरते. अर्थात, यात स्थानिक हवामान केंद्रातून उपलब्ध झालेली माहिती उपयोगी ठरते. या आधारे केलेल्या काटेकोर सिंचनामुळे पाट पद्धतीच्या तुलनेत ७५ ते ८०% इतकी पाण्याची व सोबतच खतांचीही बचत होते. उत्पादनात ३० ते ४०% वाढ होते.

हवेची आर्द्रता :

हवेचा दाब, तापमान आणि हवेची आर्द्रता हे वातावरणातील महत्त्वाचे घटक असून, त्यावरच पिकावरील बुरशीजन्य रोग व किडीच्या प्रादुर्भाव अवलंबून असतो. द्राक्ष, डाळिंब या नगदी फळपिकांसोबतच बहुतेक सर्व पिकांवरील रोग व त्यापासूनच्या संरक्षणामध्ये हवेतील आर्द्रता महत्त्वाची भूमिका निभावते.

पानांवरील आर्द्रता :

पानांवरील आर्द्रता किती वेळ टिकून राहिली, यावर रोगांचे प्रकार व तीव्रता ठरते. म्हणून पानावरील आर्द्रतेच्या नोंदी वेळीच उपलब्ध झाल्यास प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन करता येते. त्यामुळे कमी खर्चात भविष्यातील मोठा प्रादुर्भाव टाळता येतो.

प्रकाशाची तीव्रता

ही सामान्यतः लक्स मीटरमध्ये मोजतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता व त्याची उपलब्धता यांचा संबंध थेट फुलोरा व फलधारणा यांच्याशी असतो. त्यामुळे त्याच्या नोंदी महत्त्वाच्या ठरतात.

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com