व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे मत्स्यबीज

कार्प जातींचा मत्स्यपालन उत्पादनात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. महाराष्ट्रात शासकीय तसेच खासगी कार्प हॅचरी आहेत, जे मत्स्यबीज तयार करून मत्स्य शेतकऱ्यांना पुरवठा करतात. बाजारात असलेली मासळीची मागणी व योग्य बाजार भाव मिळवून देणारे बीज तलावात संचयन करावे.
Fish Seeds
Fish SeedsAgrowon

भारतातील सुमारे ७० टक्के मत्स्य उत्पादन हे अंतर्देशीय पाण्यापासून होते, त्यापैकी जवळपास ६५ टक्के मत्स्यपालनातून येते. एकूण अंतर्देशीय मत्स्यपालन उत्पादनापैकी, भारतीय प्रमुख कार्प्स हे सर्वांत जास्त संवर्धित गोड्या पाण्यातील मासे आहेत. त्यानंतर विदेशी कार्प, मायनर कार्प, कॅटफिश आणि ट्राउट या प्रकारांतील मत्स्य जाती आहेत. महाराष्ट्रात शासकीय तसेच खासगी कार्प हॅचरी आहेत, जे मत्स्यबीज तयार करून मत्स्य शेतकऱ्यांना पुरवठा करतात.

कार्प मासे :

१) कार्प हे भारतातील मत्स्यपालन पद्धतींचा मुख्य आधार आहेत. यांचा मत्स्यपालन उत्पादनात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. भारतीय प्रदेशात उपलब्ध असलेल्या २६६ कार्प प्रजातींपैकी सुमारे ३४ कार्प प्रजाती किफायतशीर आहेत. त्या प्रामुख्याने कॅप्चर फिशरीमधून तयार केल्या जातात. १० पेक्षा कमी कार्प प्रजाती संवर्धन व कॅप्चर फिशरीमधून तयार होतात. भारताला ‘कार्प कंट्री’ असे म्हटले जाते. कारण भारतात प्राचीन काळापासून कार्प जातींचे संवर्धन केले जात आहेत. भारतातील सिंधू-गंगा नदी प्रणाली/इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशातील मूळ कार्प्सना गंगेटिक कार्प्स/भारतीय प्रमुख कार्प असे संबोधले जाते. यामध्ये कटला, रोहू आणि मृगल यांचा समावेश होतो. एकूण कार्प्स उत्पादनात यांचा ६० टक्के वाटा आहे.

२) इतर देशांतून आपल्या पाण्यात सोडण्यात आलेल्या कार्प्स जाती, जसे की सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प आणि कॉमन कार्प यांना विदेशी कार्प्स म्हणून संबोधले जाते.

३) प्रमुख कार्प्स व्यतिरिक्त, लहान कार्प्सदेखील आहेत. ज्यांना सहसा मायनर कार्प्स म्हणून संबोधले जाते. यामध्ये रेबा (सिर्हिनस रेबा), बाटा (लाबेओ बाटा), फ्रिंज-लिप्ड कार्प (लॅबिओ फिम्ब्रियाटस), कॅलबासू (लाबेओ कॅल्बासू), व्हाइट कार्प (सिर्रीनस सिरोसस) आणि कावेरी कार्प (लाबेओ कोन्टियस) यांचा समावेश होतो.

व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रमुख कार्प आणि इतर मत्स्य जातीः

भारतीय प्रमुख कार्प

१) कटला (कटला- कटला)

२) रोहू (लेबिओ रोहिता)

३) मृगळ (सिरीनस मिरगला)

इतर कार्प/एक्झॉटिक कार्प

४) कॉमन कार्प (सायप्रिनस)

५) अमुर सायप्रिनस कार्प

६) गवत्या मासा (ग्रास कार्प)

७) चंदेरा मासा (सिल्वर कार्प)

कॅटफिश

१) देसी मागूर (कॅल्यारिअस बॅक्टारयाक्स)

२) सिंघी मासा

३) गोड्या पाण्यातील शार्क (व्हल्यागो अटू)

४) पाबदा (ओमप्याक पाबदा)

५) पंग्यासियश मासा (पंकज)

फेदरबॅक मासे

१) चितल (चिताला)

२) सवळा (नोटोपेटरस मासा)

स्नेक हेड (सापासारखे तोंड)

१) मरळ मासा (चन्ना स्ट्रेटा)

२) स्पोटेड मरळ (चन्ना पंक्टयाटा)

तिलापिया मासे

१) नाईल तिलापिया

२) गिफ्ट तिलापिया

३) रेड तिलापिया

उपरोक्त गोड्या पाण्यातील मासे महाराष्ट्रात व्यावसायिकदृष्ट्या संवर्धन योग्य आहेत. मत्स्यपालन करताना सर्वप्रथम माशांसाठी आजची बाजार स्थिती काय आहे? स्थानिक बाजारातील व बाहेरील बाजारातील मागणी किती आहे किंवा आपले एक पिकाचा कालावधी होईपर्यंत काय बाजारभाव असू शकेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. काही माशांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे (चव, कमी काटे, एकच काटा इत्यादींमुळे) त्यांचा बाजारभाव हा स्थिर असतो.

शेततलावात मत्स्यपालन संवर्धन करण्यापूर्वीचे नियोजन

  • तलावातील वातावरण तसेच भौगोलिक वातावरणाचा अभ्यास करून त्या बीजास पोषक वातावरण मिळेल आणि सदर वातावरणात बीजांची वाढ होणारे बीज सोडावे.

  • बाजारात असलेली मासळीची मागणी व योग्य बाजार भाव मिळवून देणारे बीज तलावात संचयन करावे.

  • मासळीचे बीजांचे प्रकार हे जलद वाढ आणि मोठा आकार होणारे पाळावेत.

  • मासळीच्या जाती एकमेकांशी स्पर्धा व अनिष्ट परिणाम न करणाऱ्या असाव्यात.

  • पाण्याच्या वेगवेगळ्या थरातील व सर्व प्रकारच्या उपलब्ध अन्नाचा वापर करू शकणाऱ्या असाव्यात.

  • मासळीची जात मत्स्यभक्षक नसावी.

  • ज्या मत्स्यबीज प्रजाती संवर्धनासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे ती परवानगी अगोदर घ्यावी.

  • प्रतिबंधित शासनाने बंदी घातलेल्या मत्स्यबीज /मासळी संवर्धन करू नये.

  • पर्यावरणीय मापदंडाचे पालन करावे.

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com