परतीच्या पावसामुळे राज्यभरात खरीप पिकांचे (Kharif Crop) मोठे नुकसान झाले, शिवाय रब्बी पिकांची (Rabbi Crop) लागवडही रखडली. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साठल्यामुळे आणि वाफसा नसल्यामुळे हरभरा (Chana), करडई (Safflower), ज्वारी (Jowar) या रब्बी पिकांची लागवड खोळंबली आहे. अशा परिस्थितीत हरभरा लागवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हरभरा पैदासकार डॉ. अर्चना थोरात यांनी पुढील माहिती दिली आहे.
- हरभऱ्याची पेरणी साधारणपने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत केली जाते. त्यामुळे हरभरा पेरणीचा कालावधी उलटलेला नाही. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते परंतु पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रावर ही वेळ साधता आलेली नाही. अशा ठिकाणी कमी कालावधीच्या हरभरा जातींची निवड करावी. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे त्याचा फायदा कोरडवाहू लागवडीसाठी होऊ शकतो.
३० नोव्हेंबर पर्यंत पेरणी करायची असल्यास म्हणजेच उशीरा पेऱणीसाठी राजविजय २०२ व २०४ या जातींची निवड करावी. या दोन जाती कमी कालावधीच्या आणि बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही क्षेत्रासाठी महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आल्या आहेत.
कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभऱ्यासाठी विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०४, जाकी, साकी, आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, बीडीएनजी-७९७, फुले विक्रांत, विश्वराज या देशी किंवा सुधारित वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
ओलिताखालील काबुली हरभऱ्यासाठी विराट, आयसीसीव्ही-२, पीकेव्ही काक-२, पिकेव्ही काबुली-४, फुले कृपा, बीडीएनके- ७९८ या टपोऱ्या दाण्यांच्या वाणांची शिफारस केलेली आहे.
अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साठलेले आहे. वाफसा येण्यासाठी शेतातील पाण्याचा निचरा करणे अत्यंत महत्वाचे आहे. पूर्ण पाण्याचा निचरा झाल्याशिवाय पेरणी करु नये. कारण शेतात जास्त पाणी साठल्यामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
पेरणी जास्त उशीराही होणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीस जास्त उशीर झाल्यास आणि किमान तापमान खूपच कमी झाल्यास उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. परिणामी उत्पादनात घट येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.