Anand Karve : वनस्पतींना शिकविणे शक्य आहे का?

मला वाटले होते की या परिस्थितीत फुलांचे उमलणे आणि पाकळ्या मिटणे हे पुन्हा मूळपदावर येईल; पण तसे झाले नाही. मी त्यांच्यासाठी कृत्रिममरीत्या जे दिवस आणि रात्र निर्माण केले होते त्या बदललेल्या वेळेनुसारच त्या वनस्पती आपल्या पाकळ्यांची उघडमीट दाखवत राहिल्या.
Tree
Tree Agrowon

डॉ. आनंद कर्वे


शिकणे ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची असते. शिकणे या क्रियेवरील शास्त्रीय प्रयोग पहिल्याने पावलोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने केले.

त्याने निरीक्षण केले होते की खाऊ घालण्याच्या वेळी कुत्र्यांना लाळ सुटते. एका प्रयोगात त्याने कुत्र्यांना खाऊ घालताना दर वेळी घंटी वाजवली.

त्यामुळे त्या श्वानांच्या मेंदूत खाणे आणि घंटीचा आवाज यांची इतकी सांगड बसली की पुढे काहीही खायला न देता नुसती घंटी वाजवली तरी त्यांची लालापिंडे लाळ निर्माण करावयाची.

या प्रयोगात मुख्य संदेश असतो खाद्याचा आणि दुय्यम संदेश असतो घंटीच्या आवाजाचा; कारण येथे घंटी वाजवण्याऐवजी शिट्टी वाजवली असती तरी चालले असते.

आई आपल्या मुलाला बोलायला कसे शिकवते? ती मुलाला वेगवेगळ्या वस्तू दाखविते उदा. खुर्ची, झाड, चमचा, घड्याळ इ. आणि त्या वस्तूला काय म्हणतात ते तोंडाने सांगते.

मुलाच्या मेंदूत त्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूची आणि कानांना ऐकू येणाऱ्या शब्दाची अशा दोन संदेशांची सांगड घातली जाते.

आणि पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर ही सांगड त्याच्या स्मरणात राहते. पुढे त्याने केव्हाही तो शब्द ऐकला की त्याच्या मनःचक्षूंसमोर ती वस्तू उभी राहते किंवा त्याने ती वस्तू पाहिली की तिला काय म्हणतात तो शब्द त्याला आठवतो.

या उदाहरणात वस्तू हा मुख्य संदेश असतो कारण वस्तू बदलत नाही. तिला काय म्हणतात हा संदेश दुय्यम समजला जातो, कारण तो भाषेनुसार बदलतो.

वरील विवेचनातून एक मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल की शिकणाऱ्याच्या ठायी स्मरणशक्ती असेल तरच त्याला शिकता येते.

वनस्पतींमध्ये स्मरणशक्ती असते हे मला १९६०-६१ साली मी फुलांच्या पाकळ्यांच्या हालचालींवर केलेल्या संशोधनातून लक्षात आले.

पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीवमात्राला रोज सुमारे १२ तास उजेड आणि १२ तास अंधार अशा तालबद्ध परिस्थितीत रहावे लागते. त्यामुळे ह्या दैनंदिन तालबद्धतेची संवेदना प्रत्येक जीवमात्राच्या जनुकांमध्ये नोंदलेली असते.

प्रत्येक जीवमात्र ती या ना त्या स्वरुपात वापरतो. फुलांचे परागीकरण दिवाचर कीटकांकडून होते की निशाचर कीटकांकडून, यानुसार वनस्पती आपली फुले उमलण्याची वेळ साधतात.

मी ज्या वनस्पतीवर संशोधन करीत होतो तिची फुले सकाळी उमलत असत आणि संध्याकाळी त्या फुलांच्या पाकळ्या मिटत असत.

पाकळ्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी मी एक स्वयंचलित कॅमेरा वापरत असे, ज्याने त्या फुलांचे दर तीन-तीन तासांनी फोटो काढले जायचे.

या अभ्यासात माझ्या असे लक्षात आले की या फुलांची उमलण्याची क्रिया प्रत्यक्ष सूर्योदयापूर्वी पहाटेच सुरू होते आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीच त्यांच्या पाकळ्या मिटू लागतात. म्हणजे सूर्य उगविण्याची आणि तो मावळण्याची वेळ त्या वनस्पतींच्या लक्षात असते आणि त्या वेळेपूर्वीच फुले उमलण्याची किंवा मिटण्याची क्रिया त्या सुरू करतात.

ती वनस्पती पूर्ण अंधार केलेल्या खोलीत ठेवली तरीसुद्धा बाह्य निसर्गात जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा ती फुले पूर्णपणे उमललेली असतात आणि बाह्य निसर्गात सूर्य मावळण्याच्या सुमारास फुलांच्या पाकळ्या मिटतात. हा होता वनस्पतींच्या स्मरणशक्तीचा मला सापडलेला पुरावा.

वनस्पतींना स्मरणशक्ती असते, हे समजल्यावर मी त्या वनस्पतींना शिकविण्याचे प्रयोग केले. निसर्गात जरी रोज सकाळी सहा वाजता सूर्योदय आणि संध्याकाळी सहाला सूर्यास्त होत असला तरी माझ्या प्रयोगात मी त्या वनस्पतींना दुपारी १२ ते रात्री १२ उजेड आणि रात्री १२ ते दुपारी १२ अंधार अशा परिस्थितीत ठेवले.

चार-पाच दिवसांतच या वनस्पतींनी या नव्या वेळापत्रकानुसार आपली फुले उमलण्याच्या आणि मिटण्याच्या क्रिया दाखवायला सुरुवात केली. मग मी त्याच वनस्पतीच्या काही कुंड्या सततच्या अंधारात आणि काही सततच्या उजेडात ठेवल्या.

Tree
Dr. Anand Karve : यशस्वी सहकारी उद्योग कोणते?

मला वाटले होते की या परिस्थितीत फुलांचे उमलणे आणि पाकळ्या मिटणे हे पुन्हा मूळपदावर येईल; पण तसे झाले नाही. मी त्यांच्यासाठी कृत्रिममरीत्या जे दिवस आणि रात्र निर्माण केले होते त्या बदललेल्या वेळेनुसारच त्या वनस्पती आपल्या पाकळ्यांची उघडमीट दाखवत राहिल्या.

पुढे दुसऱ्या एका प्रयोगात मी त्या वनस्पतींना दिवसा अंधार आणि रात्री उजेड अशा परिस्थितीत ठेवून त्यांच्या फुले उमलण्याच्या आणि पाकळ्या मिटण्याच्या वेळांची संपूर्णपणे उलटापालट केली.

या वनस्पती मग सततच्या अंधारात किंवा सततच्या उजेडात ठेवल्या तेव्हा बाहेर दिवस असताना त्यांच्या पाकळ्या मिटलेल्या असत आणि बाहेर अंधार असताना त्यांची फुले उमललेली राहत.

थोडक्यात म्हणजे सर्कशीत जसे प्राण्यांना सायकल चालविणे किंवा घोड्यावर बसणे, अशा अनैसर्गिक क्रिया शिकवतात त्याचप्रमाणे मी त्या वनस्पतींनाही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र असे अनैसर्गिक वागायला शिकवू शकलो.

या प्रयोगाद्वारे मी हे सिद्ध करू शकलो की निदान ज्या क्रियांच्या बाबतीत वनस्पती स्मरणशक्तीचा वापर करतात त्या क्रिया आपण वनस्पतींना शिकवू शकतो; पण या प्रयोगातून उद्भवलेला एक प्रश्न असा होता, की येथे मुख्य संदेश कोणता आणि दुय्यम संदेश कोणता?

याचे उत्तर असे की वनस्पतींच्या डी.एन.ए. मधील अंतर्गत दैनंदिन तालसंवेदना हा मुख्य संदेश असतो, कारण ही तालसंवेदना कधी बदलत नाही. आणि प्रकाशाची वेळ हा दुय्यम संदेश असतो, कारण तो बदलू शकतो.

प्रयोगासाठी आपण प्रकाशाची वेळ कृत्रिमरीत्या बदलली होती, पण तसे नैसर्गिकरीत्या सुद्धा होऊ शकते.

समजा भारतात वाढलेली एखादी वनस्पती आपण अमेरिकेत नेली, तर तिथल्या नैसर्गिक परिस्थितीत तिच्या दिवस-रात्रीची उलटापालट होणार आणि तिला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नव्या वेळापत्रकाशी जुळते घ्यावेच लागणार.

विमानाने भारतातून अमेरिकेत गेलेल्या माणसांना सुद्धा जेट लॅग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच समस्येला तोंड द्यावे लागते.

मुळात ही तालबद्धता जीवमात्रांमध्ये निर्माण कशी झाली, यावरही मी संशोधन केले. त्यातून मला असे उमगले की जीवमात्रांचे शरीरव्यापार सुरळित चालावेत यासाठी त्यांच्या शरिरात अनेक स्वयंनियामक यंत्रणांचा वापर केला जातो.

स्वयंनियामक यंत्रणा नेहमीच तालबद्ध स्पंदने निर्माण करतात. हे निरीक्षण अशा प्रकारच्या यंत्रणा निर्माण करणाऱ्या इंजिनियर मंडळींनी सन १९३०च्या सुमारासच नमूद केले होते.

उदाहरणार्थ आपल्या घरातील फ्रिजमध्येही तापमाननियंत्रणासाठी एक स्वयंनियामक यंत्रणा असते. या यंत्रणेमुळेच त्यातला कॉम्प्रेसर काही काळ चालतो तर काही काळ तो बंद असतो.

स्वयंनियामक यंत्रणांद्वारे निर्माण होणाऱ्या स्पंदनांचा इंजिनियर लोकांनी १९३०च्या सुमारास अभ्यास करून जी गणितीय सूत्रे विकसित केली होती, त्यांचा मला माझ्या संशोधनात पुढे खूप उपयोग झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com