Fish Aquarium : शोभिवंत मत्स्यालयाचे सुशोभीकरण, मांडणी कशी कराल?

मत्स्यालय आकर्षक बनविण्यासाठी मत्स्यालयाची मांडणी योग्य प्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे. मांडणीसाठी वापरलेले साहित्य हे मत्स्यालयातील माशांना नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्यास मदत करते. त्यामुळे मासे लवकर त्या वातावरणासोबत जुळवून घेतात.
Aquarium Management
Aquarium ManagementAgrowon

जयंता टिपले, हिरा पाटील, वैष्णवी सोनवळे

शोभिवंत मत्स्यालय हे सर्वांनाच आकर्षित करते. या मत्स्यालयाची आकर्षकता ही विशेषतः त्यामधील सुशोभीकरणावर अवलंबून असते. त्यासाठी योग्यरितीने मत्स्यालय मांडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. मत्स्यालय मांडणी किंवा सुशोभीकरणासाठी विविध प्रकारची रंगीबेरंगी झाडे, पाने, खडक म्हणजेच दगड इत्यादी वापर केला जातो. जेणेकरून मत्स्यालय अधिक आकर्षक व चांगले दिसेल. तसेच माशांच्या वाढीसाठी योग्य आणि नैसर्गिक वातावरण निर्मिती होते.

सुशोभीकरणासाठी आवश्यक साहित्य

दगड

मत्स्यालयाच्या मांडणीमध्ये दगडांचा वापर केला जातो. वाळूच्या खालच्या भागाला दगड ठेवले जातात.

दगड हे मत्स्यालयाला नैसर्गिक स्वरूप प्राप्त करून देण्यास मदत करतात.

सिलिकॉन जेलीच्या मदतीने दगड एकमेकांना जोडून गुहादेखील तयार करता येते. ज्यामुळे माशांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होते.

शिंपले

मत्स्यालयाच्या आकर्षक करण्यासाठी शिंपल्यांचा वापर करता येतो. बाजारात विविध आकाराचे आणि रंगाचे शिंपले मिळतात.

Aquarium Management
Aquarium : मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार

वाळू

मत्स्यालय मांडणीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची वाळू वापरली जाते. त्यामुळे शोभिवंत मत्स्यालयामध्ये एक नैसर्गिक वातावरण निर्मिती होते. विविध जलीय वनस्पतींच्या मुळ्या या वाळूमध्ये रुतलेल्या असतात.

लाकडांचे तुकडे

विविध आकारांच्या लाकडांचे तुकडे मत्स्यालयातील मांडणीमध्ये वापरले जातात. या लाकडांचा उपयोग माशांना लपण्यासाठी होतो.

प्रकाशासाठी बल्ब

माशांचे आरोग्य, जलीय वनस्पतींच्या वाढीसाठी प्रकाश ऊर्जा आणि ऑक्सिजन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मत्स्यालयामधील माशांचे आणि वनस्पतींच्या निरोगी वाढीसाठी कृत्रिमरीत्या प्रकाशाची उपलब्धता करावी लागते. त्यासाठी शोभिवंत मत्स्यालय टाकीच्या वरील बाजूस प्रकाशासाठी बल्ब लावणे गरजेचे आहे.

जलीय वनस्पती

शोभिवंत मत्स्यालय सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी तसेच नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्यासाठी जलीय वनस्पती लावल्या जातात. मत्स्यालयाचे कोपऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या जलीय वनस्पती लावल्या जातात.

त्यांची मुळे हे वाळूमध्ये रुतलेले असतात. या वनस्पती लावल्यामुळे मत्स्यालयात माशांसाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती तयार होते.

या वनस्पती माशांसाठी एक प्रकारे निवारा म्हणून काम करतात. माशांना लपण्यासाठी जागा मिळते. मासे या वनस्पतींवर अंडी घालतात. लहान मासे याचा खाद्य म्हणून वापर करतात. तसेच मत्स्यालयाची आकर्षकता वाढवितात.

Aquarium Management
Aquarium Business: तंत्र शोभिवंत मत्स्यालय निर्मितीचे

पाण्याचे फिल्टर

मत्स्यालयातून घाण बाहेर काढण्यासाठी प्रामुख्याने फिल्टरचा उपयोग केला जातो. त्यामध्ये बायोलॉजिकल फिल्टर किंवा अंडरग्रावल फिल्टर यांचा वापर केला जातो.

मत्स्यालयात माशांची विष्ठा आणि खाद्यामुळे पाण्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. परिणामी, मस्त्यालयातील मासे बाधित होऊन मरतात. त्यामुळे मत्स्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी या फिल्टरचा उपयोग केला जातो.

हिटर

मत्स्यालयाच्या मांडणीमध्ये हिटर हे खूप महत्त्वाचे आहे. थंड प्रदेशात किंवा थंडीच्या काळात जेव्हा तापमान कमी झालेले असते, अशावेळी हिटरद्वारे पाण्याचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान नियंत्रित राहून माशांवर कोणताही परिणाम होत नाही. हिवाळ्यात हिटर लावणे अत्यंत गरजेचे आहे.

घ्यावयाची काळजी

मत्स्यालयामध्ये पाने आणि वनस्पती तसेच विविध वस्तूंची मांडणी करण्यासाठी चिमट्यांचा वापर केला जातो. मत्स्यालयात साहित्याची मांडणी करण्यापूर्वी लागणारे सर्व साहित्य एकवेळ स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यावे. जेणेकरून त्या साहित्यामधून मत्स्यालयात जीवजंतूंचा प्रसार होणार नाही आणि माशांना होणारी आजाराची बाधा टाळली जाईल.

मत्स्यालयाची मांडणी

मत्स्यालयात वाळू टाकण्यापूर्वी मत्स्यालयात वापरला जाणाऱ्या फिल्टरचे सर्व भाग जोडून तो तळावर ठेवावा.

त्यानंतर सजावटीसाठी वापरले जाणारे दगड हे स्वच्छ पाण्याने धुऊन मत्स्यालयात ठेवावेत.

वाळू स्वच्छ धुऊन टाकावी. तळावर ठेवलेला फिल्टर आणि दगड पूर्णपणे झाकले जातील अशा पद्धतीने वाळू पसरावी. वाळू पसरताना वाळूचा उतार हा मत्स्यालयाच्या दर्शनी भागाकडे राहील याची काळजी घ्यावी.

मत्स्यालयात जलीय वनस्पती लावताना योग्य काळजी घ्यावी. झाडे वाळूमध्ये व्यवस्थित रोवावीत. मत्स्यालयात पाणी भरल्यानंतर झाडे पाण्यावर येऊन तरंगणार नाहीत तसेच ती दगडाखाली चिरडली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

लाकडांच्या तुकड्यांची व्यवस्थित मांडणी करावी. जेणेकरून लाकडांच्या तुकड्यांच्या वापराने माशांना लपण्यासाठी जागा मिळेल.

सर्व प्रकारच्या सजावटींची मांडणी झाल्यानंतर त्यात वरून थेट पाणी ओतू नये. पाणी थेट ओतण्यामुळे सजावटीला धक्का पोहोचण्याची शक्यता असते. त्यासाठी सर्व सजावटीच्या साहित्याची मांडणी झाल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा पेपर अंथरूण नंतर हळूवारपणे पाणी ओतावे.

मत्स्यालय मांडणीचे उद्देश

मत्स्यालय आकर्षक बनवणे.

जलीय वनस्पती, वाळू आणि दगड यांचा वापर करून नैसर्गिक वातावरण निर्मिती करणे.

मत्स्यालयाची मांडणी ही आकर्षक आणि साफ जागेमध्ये करावी.

मत्स्यालय ठेवलेली जागा ही थेट सूर्यप्रकाशात येणारी नसावी.

मांडणी योग्य गुळगुळीत तळावर करावी. जेणेकरून तडा जाणार नाही किंवा भेगा पडणार नाहीत.

मासे सोडण्याच्या पद्धती

मत्स्यालयात प्रत्यक्ष मासे सोडण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या पिशवीमधून मासे आणलेले आहेत, ती पिशवी न उघडता जशीच्या तशी मत्स्यपेटीमध्ये सोडावी.

त्यामुळे मत्स्यपेटीतील पाण्याचे आणि पिशवीतील पाण्याचे तापमान समान होईल. आणि माशांना पाण्याचे अचानक तापमान बदलण्यामुळे त्रास होणार नाही. मत्स्यालयात पिशवी सोडल्यानंतर पिशवीचे तोंड हळुवार उघडावे.

पिशवीतील पाणी हळूहळू मत्स्यपेटीत सोडावे. मासे स्वतःहून पिशवीतील पाण्यातून बाहेर येण्याची वाट पाहावी. अशाप्रकारे सर्व मासे पूर्णपणे मत्स्यालयात सोडून द्यावेत.

- जयंता टिपले, ८७९३४७२९९४

(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com