लीक लागवड तंत्रज्ञान

  लीक लागवड तंत्रज्ञान
लीक लागवड तंत्रज्ञान

लीक हे कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव ‘अलियम पोरम’ आहे. रोपाचा खाली असलेला पांढरा भाग आणि हिरवी गडद रंगाची पाने खाण्यासाठी वापरतात. पाने बारीक कापून सॅलेडमध्ये वापरतात. ज्या लोकांना ओल्या पातीच्या कांद्याचा किंवा साध्या कांद्याचा उग्र वास आवडत नाही, त्यांना लीकमधून अल्हादकारक स्वाद व चव मिळू शकते. लीक हे युरोपमधील मुख्य भाजी आहे. भारतात जम्मू-काश्‍मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, दक्षिणेकडील राज्यात या भाजीची लागवड होते.  महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांतील काही शेतकरी थोड्या थोड्या क्षेत्रावर या भाजीची लागवड करतात.  

पोषक द्रव्ये :  या भाजीमध्ये साखर, कार्बोहायड्रेट्‌स, स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे पुरेशा प्रमाणात असतात.

हवामान : 

  • राज्यातील  हवामानात वर्षभर या पिकाची लागवड करता येते.  
  • १० अंश सेल्सिअस खालील तापमानात बियाण्याची चांगली उगवण होत नाही.  १३ ते १८ अंश सेल्सिअस तापमानात बियाण्याची उगवण चांगली होते. बियाणे उगवणीसाठी ८ ते १२ दिवस लागतात.
  • हरितगृहामध्येसुद्धा या भाजीची लागवड फायदेशीर ठरते. पुणे, सातारा, सांगली, नगर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वर्षभर या भाजीची लागवड फायदेशीर ठरते. इतर जिल्ह्यात कडक उन्हाळा सोडून खरीप आणि रब्बी हंगामात या भाजीची लागवड करावी.
  • हरितगृहात रोपांची वाढ होत असताना रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअस व दिवसाचे तापमान २१ अंश सेल्सिअस नियंत्रित करावे. पांढऱ्या भागाची वाढ होण्यासाठी रात्रीच्या वेळेस तापमान १८ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी.
  • जमीन : 

  • हे पीक हलक्‍या ते मध्यम भारी जमिनीत चांगले येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी सेंद्रिय खतांनीयुक्त जमीन अतिशय चांगली असते. 
  • उभी-आडवी नांगरट करून कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीचा सामू ६ ते ६.५ ठेवावा.
  • पावसाळी हंगामात हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. दिवाळी, पुढील हंगामासाठी जमिनीत या पिकाची लागवड करावी.
  • जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी ६० सें.मी. रुंद, ३० सें.मी. उंच आणि अंदाजे १० मीटर लांब गादी वाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. 
  • पारंपारिक लागवड ३० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून करावी. 
  • रोपांची जोमदार वाढ आणि उत्कृष्ट प्रत मिळण्यासाठी गादी वाफ्यावर लागवड फायदेशीर ठरते.
  • हरितगृहातील लागवडीसाठी शिफारसीप्रमाणे खत-मातीचे मिश्रण तयार करावे. मिश्रण निर्जंतुक करून गादी वाफे लागवडीसाठी तयार ठेवावेत.
  • जातींची निवड :  संकरीत जातींच्या लागवडीपासून १५ ते २५ सें.मी. लांबीचे लीक मिळतात. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

    रोपे तयार करणे : 

  • गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावीत. एक मीटर रुंद, तीन मीटर लांब आणि ३० सें.मी. उंच आकाराचे गादीवाफे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. त्यानंतर वरील आकाराचे गादीवाफे तयार करावेत. 
  • प्रत्येक गादीवाफ्यामध्ये दहा किलो चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम कार्बेन्डाझिम पावडर मातीत मिसळावी.
  • वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोल रेषा आखून त्यात अतिशय पातळ प्रमाणात बिया पेरून बारीक शेणखताने झाकाव्यात.
  • झारीच्या साहाय्याने हलके पाणी द्यावे. पेरणी झालेले सर्व वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकावेत. 
  • एकरी संकरीत जातीचे १७५ ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बियांची उगवण सात दिवसांत होते. 
  • रोपवाटिकेत बियांच्या उगवणीच्या काळात रात्रीचे तापमान १८ ते २० अंश     सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस असावे, म्हणजे रोपांची उगवण आणि वाढ व्यवस्थित होईल. 
  • अंकूर दिसू लागल्यानंतर वाफ्यावर झाकलेला प्लॅस्टिक कागद काढून टाकावा. 
  • प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट माध्यम भरून बी टोकून रोपे तयार करता येतात. रोपांना पाणी देताना प्रत्येक वेळी १.५  ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट आणि २ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रती लिटर पाण्यात मिसळून द्यावे.  त्याचप्रमाणे रोपांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर १०-१२ दिवसांचे अंतराने शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी. 
  • २५ ते २८ दिवसांत रोपे पुनर्लागवडीस तयार होतात.
  • रोपांची पुनर्लागवड : 

  • गादी वाफ्यावर दोन ओळीत ३० सें.मी. व प्रत्येक रोपांमध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून रोपांची पुनर्लागवड दुपारनंतर करावी. लागवड करण्यापूर्वी गादीवाफे आदल्या दिवशी पाण्याने ओलवून दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर रोपांची लागवड करावी.
  • एकरी ५९ हजार रोपांची लागवड होते. गादी वाफ्यावर लागवड केल्यास रोपांना ठिपकसिंचन द्वारा पाणी आणि खतांच्या मात्रा देणे सोईस्कर होते.
  • पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर ३० सें.मी. अंतरावर सऱ्या वरंबे तयार करून रोपांची लागवड सरीच्या वरच्या बाजूवर दोन रोपांमध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून करावी.
  • रोपाच्या खालील बाजूस असलेल्या पांढऱ्या कांद्याच्या वरील भाग जास्त उंचीपर्यंत पांढरा व तंतूविरहित राहण्यासाठी लागवड पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. 
  • गादीवाफ्यावर दोन ओळींत ३० सें.मी. अंतर ठेवून सरळ ८ ते १० सें.मी. खोलीचे चर तयार घ्यावेत. या चरामध्ये १५ सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. जसे जसे रोप उंच वाढेल त्या प्रमाणात चरामध्ये माती टाकावी. वाफ्याच्या वर रोपांची वाढ झाल्यावर शिल्लक राहिलेली चरातील जागेत  माती टाकून चर बुजवून घ्यावेत. या प्रक्रियेस ब्लॅंचिंग म्हणतात. 
  • रोपाच्या खोडाला जास्त उंचीपर्यंत माती असल्यामुळे या जागेवर सूर्यप्रकाश न पोचता खोड पांढरे रंगाचे राहते; अन्यथा ते हिरव्या रंगाचे  होते. जेवढ्या उंचीचा कांद्यावरील खोडावरील भागाचा रंग पांढरा असेल त्या भाजीस चांगला दर मिळतो.
  • हरितगृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून वर्षभर लीक पिकाची लागवड करता येते.
  • पाणी व्यवस्थापन : 

  • रोपांच्या जोमदार वाढीसाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळणेसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांच्या मात्रा देता येतात.
  • पिकाला दररोज किती लिटर पाण्याची गरज आहे हे प्रथम निश्‍चित करून दररोज पाणी देण्याचे नियोजन करावे. 
  • पिकाच्या वाढीच्या काळात कोरडे हवामान किंवा पाण्याची कमतरता पडल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो.
  • पारंपरिक पद्धतीने केलेल्या लागवडीस जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळी हंगामातील लागवडीस ६ ते ७ दिवसांनी आणि पावसाळी हंगामातील लागवडीस पाऊस नसल्यास जरुरी प्रमाणे पाणी द्यावे.
  • खत व्यवस्थापन : 

  • पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी व उत्पादनासाठी खतांचा योग्य पुरवठा आणि योग्य वेळी वापर करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवसाच्या खतांच्या मात्रांचा तक्ता तयार करून ठेवावा.
  • निश्‍चित खतांच्या मात्रा देण्याची किती गरज आहे, याकरिता लागवडीच्या अगोदर तसेच लागवड झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी माती परिक्षण करावे.
  • पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि उत्पादनासाठी एकरी ६० किलो नत्र, स्फुरद ४०किलो आणि पालाश ४० किलो द्यावे. 
  • माती परीक्षणानुसार व पिकाच्या वाढीनुसार विभागून खतमात्रा द्यावी. खतांच्या मात्रा दिल्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.
  • विद्राव्य खतांचा वापर : 

  • बाहेरील क्षेत्रात आणि हरितगृहातील गादी वाफ्यावर लागवड केलेल्या रोपांना पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनातून विद्राव्य खताच्या मात्रा द्याव्यात.
  • विद्राव्य खते देताना खताच्या द्रावणाचा सामू ६ ते ६.५ च्या दरम्यान असावा. पाण्याची विद्युत वाहकता एकपेक्षा कमी असावी. याची दक्षता घ्यावी.
  • सामू कमी करण्यासाठी नायट्रीक आम्लाचा उपयोग करावा.
  • आंतरमशागत : 

  • गरजेनुसार खुरपणीकरून तण नियंत्रण करावे.
  • रोपांना खोडावर वेळोवेळी ठराविक उंचीपर्यंत मातीची भर लावावी. 
  • खालील बाजूने पांढरा शुभ्र रंग व वर गडद हिरव्या रंगाच्या पाती मिळण्यासाठी जमिनीपासून १० ते १२ सें.मी. पर्यंत टप्प्याटप्प्याने खोडाला मातीची भर द्यावी. त्यामुळे खोडाचा खालचा १० ते १२ सें.मी. पर्यंतचा भाग पांढरा शुभ्र व आकर्षक रंगाचा होतो. अशाच गुणधर्माच्या लीकला मागणी जास्त असते. 
  • लीक खोडास मातीची भर न लावल्यास पूर्ण खोडाचा भाग हिरव्या रंगाचा होऊन अशा लीकला मागणी कमी असते.
  • काढणी : 

  • काढणी ६० ते ६५ दिवसांपासून पुढे चालू होते. लीकच्या एका गड्ड्याचे वजन २०० ते ३०० ग्रॅमपर्यंत मिळते.
  • लीक नेहमी कोवळा असतानाच काढणी करावी. जून झाल्यास खोडाचा खालील पांढरा भाग तंतूमय होऊन प्रत समाधानकारक राहत नाही. 
  • लिक काढल्यानंतर स्वच्छ धुऊन प्रतवारी करावी. मागणीप्रमाणे ३, ४ खोडांचे एक प्रमाणे तीन जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवाव्यात.
  • उत्पादन  : 

  • उत्तम व्यवस्थापन आणि मशागत असल्यास एकरी सरासरी लागवड केलेल्या रोपांच्या ८० ते ८५ टक्के लीक विक्रीलायक मिळतात. 
  • एकरी सरासरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. 
  • पॅकिंग : 

  • काढणी झाल्यानंतर पॅकिंग हाऊसमध्ये खोडांच्या लांबीच्या पातांप्रमाणे व पांढऱ्या गड्ड्याच्या घेराप्रमाणे व कांद्यावरील खोडाच्या पांढऱ्या भागाची उंची या बाबी विचारात घेऊन प्रतवारी करावी. 
  • प्रतवारी करताना पातीची लांबी १५ ते २० सें.मी. ठेवावी. पांढऱ्या कांद्याखाली टोकावरील मुळे कापावीत.
  • स्वच्छ केल्यानंतर लीक खोडाच्या ३ किंवा ४ नगाच्या जुड्या बांधाव्यात. बॉक्‍समध्ये जुड्या पॅकिंग करण्यापूर्वी प्रत्येक जुडी टिश्‍यू पेपरमध्ये गुंडाळावी.
  • कोरूगेटेड बॉक्‍सेसमध्ये २० जुड्या ठेवून पॅकिंग करावे. 
  • साठवणूक : 

  • एक अंश सेल्सिअस ते तीन अंश सेल्सिअस आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आद्रतेमध्ये २ ते ३ आठवडे लीक सुरक्षित साठवून ठेवता येतात.
  • पीक संरक्षण :  कीड नियंत्रण :  फुलकिडे (थ्रीप्स) :   फुलकिडे  पातीच्या बेचक्‍यात दडून बसतात. रात्री किंवा अगदी सकाळी कोवळ्या पातीवरील हिरवा पृष्ठभाग खरवडतात. अशा जखमेतून पडणारा अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पातीवर बारीक मोठे पांढरे ठिपके पडतात. रोपांची वाढ खुंटते. पात वेडीवाकडी होते. खोड पोसत नाही. कोरड्या व उबदार हवामानात कीड झपाट्याने पसरते. फुलकिडे तणामध्ये व सभोवतालच्या पिकात लपून बसतात.  तांबडे कोळी (माइटस) :  कोळी पानांतून अन्नरस शोषतात. त्यामुळे रोपे पिवळसर रोगट दिसतात. कोरड्या हवेत या किडीचे प्रमाण वाढते.

    रोग नियंत्रण :  भुरी (पावडरी मिल्ड्यू) :   हा रोग ‘लाव्हेल्युला टाऊरिका’ बुरशीपासून होतो. पानांच्या दोन्ही बाजू पांढरी भुकटी टाकल्याप्रमाणे दिसते. या बुरशीमुळे रोपाची प्रत खराब होऊन वाढ खुंटते. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र झाल्यास पाने वाळून जातात. करपा (परपल ब्लॉच) :   हा रोग ‘अल्टरनेरिया पोरी’ या बुरशीमुळे होतो. पानांवर पांढुरके खोलगट चट्टे पडतात. मधला भाग काळपट जांभळा होतो. शेंड्याकडून पाने खाली वाळू लागतात. पाने, खोड दांड्यावर चट्टे दिसून येतात. दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पाने सुकून जातात. पिकाची वाढ खुटते. खरीप हंगामात रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. रब्बी हंगामात दमट हवामान झाल्यास फेब्रुवारी मध्यापासून ते एप्रिलपर्यंतसुद्धा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. पानांची टोळे पांढरी होणे (व्हाइट टीप) :   हा रोग ‘फायटोप्थोरा पोरी’ बुरशीपासून होतो. पानांचे शेंडे पिवळे पडून सुकतात. नंतर पांढऱ्या रंगाचे होतात. पानांच्या मध्य शिरामधील जागेमध्ये पानांवर पाणीयुक्त ठिपके दिसतात.

    संपर्क : डॉ. अरूण नाफडे,  ९८२२२६११३२. (लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com