मका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका पिकाचा हिरवा चारा दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने दुधाचे प्रमाण वाढते. मध्यम ते भारी परंतु चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत महिनाअखेरपर्यंत या पिकाची लागवड पूर्ण करावी.
मका हिरवा चारा व मुरघास म्हणून वापरता येतो. त्याच्यापासून अधिकाधिक चारा मिळण्यासाठी खालीलप्रमाणे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
लागवड तंत्रज्ञान : जमीन : मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. काळी कसदार, गाळाची व नदीकाठची जमीन अत्यंत उपयुक्त असते.
मशागत : पेरणीपूर्वी एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. लागवडीसाठी सपाट वाफे अथवा सऱ्या सोडाव्यात. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. पेरणी : चारापीक म्हणून रब्बी हंगामात डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पेरणी करावी. पेरणी ३० सेंमी अंतरावर करावी.
बियाणेप्रमाण व बीजप्रक्रिया : पेरणीसाठी प्रतिहेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बीजप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. सुधारित जाती : आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझीट, विजय, गंगा, सफेद-२, गंगा सफेद-५, डेक्कन डबल हायब्रीड
आंतरमशागत : पेरणीपासून महिनाभर पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार एक-दोन वेळा खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. एक महिन्यानंतर कोळपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रणही होते तसेच मुळांना हवा मिळून पिकाची वाढही होते.
खत व्यवस्थापन : पूर्वमशागत करताना प्रतिहेक्टरी साधारणपणे ३ टन (१०-१२ बैलगाड्या) चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. प्रतिहेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो व पालाश ५० किलो अशी खतमात्रा द्यावी. पेरणीवेळी नत्र ५० किलो, स्फुरद ५० किलो व पालाश ५० किलो द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन : रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
पीक संरक्षण :
कापणी : हिरव्या व सकस चाऱ्यासाठी मक्याचे पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर म्हणजे पेरणीनंतर अंदाजे ६५ ते ७० दिवसांनी कापणी करावी. अनेक शेतकरी मका पूर्ण पक्व झाल्यावर जनावरांना खाऊ घालतात. त्याऐवजी ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना जनावरांना चारा द्यावा. या वेळी चारा अधिक सकस असतो.
फुलोऱ्यातील मका पिकातील अन्नघटक
प्रथिने | ५ टक्के |
स्निग्ध पदार्थ | ४.३ टक्के |
खनिजे | ६ टक्के |
पिष्टमय पदार्थ | ५२.८ टक्के |
संपर्क : प्रवीण सरवळे, ९७६७८३८१६५ (कृषी महाविद्यालय, बारामती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.