मिरची लागवड तंत्रज्ञान

 मिरची लागवड तंत्रज्ञान
मिरची लागवड तंत्रज्ञान

मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो. 

मिरचीच्या जाती : 

 • सुधारित जाती : महात्मा फुले कृषी विद्यापिठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्‍शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. ह्या जाती उत्पादनास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत.
 • अग्निरेखा : ही जात दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. याची झाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरिप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे हेक्‍टरी १०० ते १२० क्विंटल तर वाळलेल्या मिरचीचे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते.
 • फुले ज्योती : फळे घोसात लागतात. प्रतिघोसात सरासरी ४-५ फळे असतात. फळांची लांबी ६ ते ७ सेंमी असते. फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर तो लाल होतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन १८० ते २२५ क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते. पश्‍चिम महाराष्टात खरीप हंगामासाठी शिफारस या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
 • फुले सई : या जातीची पश्‍चिम महाराष्टातील जिरायती क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी-१ आणि कमंडलू या दोन वाणांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. झाडे मध्यम उंचीची असतात. जिरायती क्षेत्रात १३ ते १६ क्विंटल प्रतिहेक्‍टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन मिळते. 
 • जमीन आणि हवामान :  मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खते घातल्यास चांगले पीक येऊ शकते. उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते. हिवाळी हंगामात २० ते २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते.

  लागवडीचा हंगाम : खरीप हंगाम : पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत.  बियाणे प्रमाण : हेक्‍टरी १.० ते १.२५ किलो बी पुरेसे होते. पेरणी करण्यापूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम चोळावे. रोपवाटिका :

 • मिरची लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपांवर अवलंबून असते. रोपे तयार करण्यासाठी तीन बाय दोन मीटर लांबी-रुंदीचे आणि २० सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफ्यावर चांगले कुजलेले दोन घमेले शेणखत, ३० ते ४० ग्रॅम मॅंकोझेब तसेच फोरेट (१० टक्के दाणेदार) १५ ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकावे आणि मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर दर १० सेंमी अंतरावर खुरप्याने २ ते ३ सें.मी. खोल ओळी कराव्यात. या ओळींत बियाण्यांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे. हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर ५ ते ६ दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर २० ते २५ दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया द्यावा.
 • जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात. रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी  योग्य प्रमाणात त्यांचा वापर फायद्याचा ठरतो. पेरणी केल्यापासून ४० ते ५० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.
 • रोपवाटिकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोपे उगवून आल्यापासून १० ते १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास २५ ते ३० ग्रॅम फोरेट दोन ओळींच्या मधून द्यावे.
 • रोपे ३ ते ४ आठवड्यांची असताना शिफारस केलेले कीटकनाशक आणि मॅंकोझेब २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे फुलकिडे, तुडतुडे आणि कोळी याचे नियंत्रण होऊन पर्णगुच्छ या रोगापासून संरक्षण होते.
 • रोपांची लागवड : 

 • मिरचीची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंची आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड ७५ बाय ६० किंवा ६० बाय ६० सें.मी. अंतरावर तर बुटक्‍या जातीची लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने तोडावीत.
 • जास्त उंचीची रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावीत. लागवडीपूर्वी रोपे विशेषत: पानांचा भाग पाच मिनिटे प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) १० ग्रॅम अधिक मॅंकोझेब २५ ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी. 
 • खत व्यवस्थापन :  लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्‍टरी जमिनीत मिसळावे. १००: ५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रती हेक्‍टरी द्यावे. अर्धा नत्राचा हप्ता लागवडीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी म्हणजे फूल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.

  आंतरमशागत :    आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे. जमिनीलगत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.

  पाणी व्यवस्थापन :  पाणी गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार वा मगदूर, पाऊसमान, तापमान व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

  काढणी आणि उत्पादन : पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून ६० ते ७० दिवसांनी सुरू होते. पुढे तीन-चार महिने तोडे सुरू राहतात. सर्वसाधारणपणे आठ ते १० तोडे मिळतात.

  पीकसंरक्षण :  किडींविषयी 

 • मिरचीवर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे पानांच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाळतात. पाने लहान होतात. यालाच स्थानिक भाषेत बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. कोळी कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लहान होतात.
 • चुरडा मुरडा होण्यास कोळी कीडही कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो. फळे पोखरणाऱ्या किडीची अळी फळाच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्वप्रकारच्या किडीमुळे १० ते ३० टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते.
 • नियंत्रण व्यवस्थापन : 

 • वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी. 
 • बियाण्यास कार्बोसल्फान ३० ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सुकल्यावर एक तासाने ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 
 • बीजप्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (दोन बाय एक मीटर) रोपे उगवल्यानंतर दोन ओळीत फोरेट दाणेदार २० ग्रॅम टाकावे. किंवा डायमिथोएट १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
 • लागवडीवेळी इमिडाक्‍लोप्रिड १० मिली किंवा कार्बोसल्फान ३० मिली अधिक ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी. 
 • लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी निंबोळी पेंड हेक्‍टरी ४००-५०० किलो या प्रमाणात टाकावी. 
 • पुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी सायपरमेथ्रीन ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्क चार टक्के याचीही फवारणी गरजेनुसार करावी. 
 • फवारणीसाठी आलटून-पालटून कीटकनाशकाचा वापर करावा. 
 • रोगांविषयी : मिरचीवरील महत्त्वाचे रोग म्हणजे फळ कुज, फांद्या वाळणे, भुरी आणि लीफ कर्ल व्हायरस हे होय. फळकूज आणि फांद्या वाळणे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळावर आणि पानांवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळांवर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात. फांद्या वाळणे या रोगाची सुरवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. पाने आणि फाद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा, तसेच मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्‍सी क्लोराईड यापैकी एक बुरशीनाशक २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १५ दिवसांनी फवारावे. साधारण ३-४ फवारण्या कराव्यात.

  भुरी  :  रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावार आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा कार्बेनन्डाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. नंतरच्या दोन-तीन फवारण्या दर १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

  लीफ कर्ल व्हायरस :   लीफ कर्ल व्हायरस (चुरडा-मुरडा) या रोगाचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, कोळी आणि विषाणूंमुळे होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते. रोगाच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर २५ दिवसांनी १० लिटर पाण्यात मॅंकोझेब २५ ग्रॅम अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १० मिली यांचे मिश्रण दर १५ दिवसांनी फवारावे. साधारणपणे चार ते पाच फवारण्या कराव्यात. रोपवाटिकेतही शिफारसीनुसार रोपे कीडनाशकांच्या द्रावणांत बुडवून लावावीत.

  - डॉ. भरत पाटील,  डॉ. मधुकर भालेकर, डॉ. कैलास शिंदे संपर्क : ०२४२६- २४३३४२   (लेखक अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.) 

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com