सिलिकॉनयुक्त खताने वाढते उत्पादनक्षमता

उत्पादन वाढीसोबत जमिनीचे आरोग्य, रोग व किडींना प्रतिबंध, वनस्पतींतील ताण तणाव नियंत्रण, गुणवत्तापूर्ण उत्पादन यासाठी सिलिकॉन हे अन्नद्रव्य सर्व पिकांमध्ये महत्त्वाचे आहे. खरीप पिकातील सिलिकॉन वापराची माहिती घेऊ.
सिलिकॉनयुक्त खताने वाढते उत्पादनक्षमता
सिलिकॉनयुक्त खताने वाढते उत्पादनक्षमता
Published on
Updated on

उत्पादन वाढीसोबत जमिनीचे आरोग्य, रोग व किडींना प्रतिबंध, वनस्पतींतील ताण तणाव नियंत्रण, गुणवत्तापूर्ण उत्पादन यासाठी सिलिकॉन हे अन्नद्रव्य सर्व पिकांमध्ये महत्त्वाचे आहे. खरीप पिकातील सिलिकॉन वापराची माहिती घेऊ. पिकांच्या वाढीसाठी सिलिकॉन हे अन्नद्रव्यही गरजेचे असल्याचे इ.स. १८४० मध्ये सर्वप्रथम जर्मन शास्त्रज्ञ जस्टिस लीबेग यांनी सप्रमाण सिद्ध केले. जमिनीमध्ये सिलीकॉनचा ३ ते २६ टक्क्यांपर्यंत साठा असतो. मात्र, ते पिकांना उपलब्ध स्वरूपात असत नाही. परिणामी पिकांसाठी त्याचा बाहेरून पुरवठा करणे गरजेचे असते. यामुळे उत्पादन वाढीसोबत जमिनीचे आरोग्य, रोग व किडींना प्रतिबंध, वनस्पतींतील ताण तणाव नियंत्रण, गुणवत्तापूर्ण उत्पादन इ. बाबींवर अनुकूल परिणाम दिसून येतात. जमिनीमध्ये जलधारणाशक्ती वाढणे व पानांमधून होणारे बाष्पीभवन कमी होणे या क्रियांमध्येही सिलिकॉन महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे कोरडवाहू पिकांसाठी सिलिकॉन वापर अत्यंत गरजेचा आहे. खरिपातील भात, मका, कापूस, सोयाबीन, कांदा इ. महत्त्वाच्या पिकांसाठी सिलिकॉनचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ. भात  भात हे जागतिक पातळीवरील प्रमुख अन्नधान्य पीक असून, आशियाई देशातील लोकांचे भात हे प्रमुख अन्न आहे. तृणधान्य वर्गातील सर्वच पिकांना सिलिकॉनची गरज ही जवळपास नायट्रोजन एवढीच असल्याचे अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. भातासाठी हेक्टरी १८० ते २०० किलो सिलिकॉनची गरज असते. भातावरील तांबेरा हा रोग सिलिकॉनच्या वापराने नियंत्रित होत असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ओनोडेरा यांनी १९१७ साली सिद्ध केले आहे. चीन येथील शास्त्रज्ञ जीआन मा आणि ताकाशाही याच्या संशोधनानुसार १०० किलो भाताच्या उत्पादनासाठी २० किलो सिलिकॉनचे जमिनीतून शोषण केले जाते. सिलिकॉनमुळे भाताचे उत्पादनात १० ते ३५ टक्क्यांने वाढल्याचे अनेक देशातील प्रयोगामधून दिसून आले आहे. भातावरील खोडकीड, तुडतुडे, लष्करी अळी इ. कीडी आणि तांबेरा, शेंडेमर, मानकुज इ. रोगांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. परदेशातील प्रयोग 

  • भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलीपाईन्स इ. आशियाई देशात सिलिकॉन वापराला प्राधान्य दिले जात आहे.
  • द. कोरिया सारख्या देशात सिलिकॉन वापरासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाते.
  • इंडोनेशियात सिलीकॉनचा वापर करून हेक्टरी ११ मे. टन असे उच्चांकी उत्पादन मिळवण्यात यश आले आहे.
  • -महाराष्ट्रात डॉ. नारायण सावंत यांनीही सिलिकॉन वापरावर सखोल संशोधन केले आहे. आपल्या चारसूत्री लागवड नियोजनामध्ये भातासाठी सिलिकॉन उपलब्धतेसाठी प्रयत्न केले आहे.
  • दापोली येथील कृषी विद्यापीठात झालेल्या प्रयोगामध्ये सिलिकॉनयुक्त खताचा हेक्टरी ३०० किलो वापर केला असता उत्पादनात १५ टक्क्याने वाढीबरोबरच रोग व किडींना प्रतिबंध झाल्याचे दिसून आले.
  • बंगलोर, बनारस, आणंद (गुजरात), तिरूअनंतपुरम, कटक (केरळ), चेन्नई येथील कृषी विद्यापीठांनी भातासाठी सिलिकॉन वापरण्याची शिफारस केली आहे.
  • वापर ः कोकणासह विदर्भातील शेतकऱ्यांनी सिलिकॉन भाताच्या तुसाची पांढरी राख व रासायनिक खतांद्वारे देण्याचे नियोजन करावे. रोप वाटिकेस प्रतिगुंठा ३ ते ४ किलो तर मुख्य पिकासाठी ८० ते १०० किलो प्रति एकर लागवडीचे वेळी वापरावे. मका मका हे भात व गव्हानंतरचे हे अन्नधान्याचे तिसरे महत्त्वाचे पीक आहे. या तृणधान्यवर्गीय पिकासाठी सिलिकॉनची गरज मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या अमेरिकेत जगातील एकूण उत्पादनापैकी ३५ टक्के मका उत्पादन होते. अमेरिकेचे सरासरी हेक्टरी उत्पादन ९.६१ मे.टन प्रतिहेक्टर असून, जागतिक सरासरी ४.९३ मे.टन प्रतिहेक्टर आहे. मात्र, भारताचे सरासरी उत्पादन केवळ २.४३ मे.टन एवढेच आहे. अन्य व्यवस्थापनासोबत मक्यासाठी सिलिकॉनचा वापर केल्यास जागतिक सरासरी आपण नक्की गाठू शकू. भारतात ३० टक्के मक्याचे क्षेत्र बागायती असून, ७० टक्के जिरायत क्षेत्रावर घेतले जाते. जिरायतीसाठी सिलिकॉनचा वापर केल्यास जमिनीची जलधारणाशक्ती वाढून, कमी पाण्याच्या ताणामुळे होणारे नुकसान कमी करता येईल. मका पिकावर लष्करी अळी, खोडकीड इ. किडी व तांबेरा, करपा इ. रोग यामुळे उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत घट येते. सिलिकॉनच्या वापराने अनेक किडींना रस शोषणास अटकाव केला जातो. रोगांसाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. परिणामी उत्पादनात वाढ व खर्चात बचत शक्य होईल. परदेशी प्रयोग ः चीन येथील शास्त्रज्ञ झिमींग झी व फेंगबीन संग यांनी हेक्टरी १५० किलो व २२५ किलो सिलिकॉन वापरण्याचे प्रयोग केले. त्यात प्रकाशसंश्‍लेषण, पर्णछिद्रांची कार्यक्षमता, कर्बग्रहण क्रिया व बाष्पोत्सर्जन इ. बाबत अनुकूल परिणाम मिळाले. सुमारे १५ ते २२ टक्के उत्पादनवाढ झाल्याचे दिसून आले. फैसलबाद (पाकिस्तान) येथील कृषी विद्यापीठातील संशोधनानुसार सिलिकॉनच्या वापरामुळे पिकाची उंची, जाडीस कणसाची लांबी तसेच कणसातील दाण्यांची संख्या व १०० ग्रॅम दाण्याचे वजन यात लक्षणीय फरक जाणवला. उत्पादनात २६ टक्के वाढ झाली. वापर ः शेतकऱ्यांनी ८० ते १२० किलो सिलिकॉनयुक्त खताचा वापर बागायतीसाठी, तर ६० ते ८० किलो जिरायतीसाठी वापर करणे फायदेशीर आहे. फवारणीद्वारे केओलीन किंवा सिलिसिक ॲसीडचा वापर करणे गरजेचे आहे. कापूस ः जगात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र भारतात असून, उत्पादनात मात्र अमेरिका व चीननंतर तिसरा क्रमांक लागतो. भारताची सरासरी कापूस उत्पादकता ३०७ किलो प्रतिहेक्टर असून अमेरिकेची ७३१ किलो, पाकिस्तानची ७५६ किलो तर इजिप्तची ८१६ किलो प्रतिहेक्टर एवढी आहे. कमी उत्पादकतेमागील कारणांचा विचार केला असता, आपल्याकडे कापसाचे सुमारे ६५ टक्के क्षेत्र जिरायती असून अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी असणे, पीक संरक्षण, अवेळी पाऊस इ. कारणे दिसून येतात. सिलिकॉनयुक्त खतांचा वापर केल्यास जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये उष्णता वाढल्याने पिकांची पाण्याची गरज वाढते. अशावेळी सिलिकॉनमुळे पर्णछिद्रांमधून होणारे बाष्पोत्सर्जन कमी केले जाते. पाणी पेशींमध्येच साठविले जाते. परिणामी पेशीद्रवाचे तापमान हे बाहेरील वातावरणातील तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी राहते. याचवेळी बोंडे पोसण्याची अवस्था असते. या बोंडांना व्यवस्थित पोषण व पाणी मिळाल्यामुळे मोठ्या आकाराची होतात व त्यांची गळ कमी होते. उत्पादकता वाढवण्यास वाव आहे. सिलिकॉन वापरामुळे नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची उपलब्धता २० ते ४० टक्क्यांने वाढते. व्यवस्थित पीक पोषण झाल्याने बोंडांची संख्या वाढणे, पातेगळ कमी होणे, बोंडांचे आकारमान वाढणे इ. फायदे होतात. पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असल्याने तांबेरा, करपा, मर इ. रोगांना प्रतिबंध होतो. सिलीकॉनमुळे पेशीभित्तिकेभोवती संरक्षण कवच तयार होत असल्याने बोंडअळी, फुलकिडे, तुडतुडे इ. किडींना काही प्रमाणात अटकाव होतो. पीक संरक्षण खर्चात बचत साधते. वापर ः शेतकऱ्यांनी जमिनीतून ८० ते १२० किलो सिलिकॉनयुक्त खताचा वापर करावा. तसेच केओलिनचा वापर फवारणीद्वारे केल्यास अपेक्षित परिणाम मिळतात. शिवाय फवारण्यादेखील कमी होतात. सोयाबीन  सोयाबीन हे प्रमुख अन्नधान्य व गळीतधान्य असे दुहेरी महत्त्वाचे पीक आहे. देशातील ६० टक्के उत्पादन एकट्या मध्यप्रदेशात होते. भारताची सरासरी उत्पादकता एकरी १०५४ किलो एवढीच आहे. चाचण्यांमध्ये या पिकाची उत्पादनक्षमता ३० ते ३५ क्विंटल प्रतिएकरपर्यंत आहे. या पिकासाठी स्फुरदाची जास्त गरज असल्याने हेक्टरी ५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश ही मात्रा शिफारशीत केलेली आहे. दिलेल्या स्फुरदापैकी ८० टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होतो. त्याची पिकांना कमी उपलब्ध होतो. यामुळे शेंग कमी लागणे, दाण्यांचे वजन, तेलाचे प्रमाण व प्रोटीनचे प्रमाण कमी होण्यासोबतच एकूणच उत्पादनक्षमता घटते. सिलिकॉनच्‍या वापराने स्फुरदाचे स्थिरीकरण कमी केले जाऊन, उपलब्धता ४० ते ६० टक्क्याने वाढते. हे पीक जिरायत क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिलिकॉनमुळे जमिनीतील पाणीधारण क्षमता वाढते. तसेच पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन कमी केले जाते. सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळी, खोडमाशी या कीडी व तांबेरा आणि भुरी या रोगांना सिलिकॉन वापरामुळे अटकाव होतो. प्रयोगाचे निष्कर्ष ः

  • बंगलोर कृषी विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये फवारणीद्वारे पेरणीनंतर २१, ३६ व ५१ दिवसांना सिलिसिक ॲसिडची फवारणी २ मिली प्रति लीटर या प्रमाणात केली असता उत्पादनात २१ टक्के वाढ झाली. प्रोटीन उत्पादन हेक्टरी ३ क्विंटलने वाढले, तर तेलाचे उत्पादन २.२ क्विंटल प्रति हेक्टरने वाढले. कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी झाला.
  • जपानी शास्त्रज्ञ इइची ताकाशाही यांनी ओकायामा (जपान) येथील कृषी विद्यापीठातील प्रयोगात दिसून आले आहेत.
  • ब्राझील येथील प्रयोगातही सिलिकॉनचा फवारणीद्वारे वापर केला असता १८ टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ झाल्याचे दिसून आले.
  • अशा प्रकारे केवळ खरीपच नव्हे, तर सर्व पिकांना सिलिकॉनची गरज असल्याचे अनेक देशातील प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे.
  • शिवाजी थोरात, ९८५००८५८११ (सदस्य, इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन अॅग्रीकल्चरल रिसर्च.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com