बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका पिकाची लागवड केली जाते. त्याचा उपयोग मुरघास करण्यासाठी देखील केला जातो. सध्या या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही शेतकरी या अळीच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. परंतू असा चारा जनावरांना खाऊ घातल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. तसेच दुधामध्ये देखील कीटकनाशकांचा अंश उतरण्याची शक्यता असते. चाऱ्यासाठी मका पिकाचे व्यवस्थापन काटेकोर व जागरूकपणे करणे गरजेचे आहे.
लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीची खोलवर नांगरट करून घ्यावी. जेणेकरून लष्करी अळीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशात तसेच कीटक खाणाऱ्या पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते. मका पिकासाठी जमीन तयार करताना एकरी २०० किलो निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी.
शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. बांधावर मित्रकिटकांना आकर्षित करण्यासाठी झेंडू, तीळ, सूर्यफूल, कोथिंबीर अशा फुले येणाऱ्या पिकांची लागवड करावी. लागवड वेळेवर तसेच एका प्रदेशात एकाच वेळी करावी. लागवडीसाठी सरी-वरंबा पद्धतीचा वापर करावा. रासायनिक खतांचा वापर कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसारच करावा. लागवडीवेळी सायअॅंट्रानिलीप्रोल १९.८ अधिक थायामेथोक्झाम १९.८ या संयुक्त कीटकनाशकाची सहा मिलि प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस दिवस किडीपासून नियंत्रण मिळते. मका पिका भोवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळींची सापळा पीक म्हणून लागवड करावी. त्याचसोबत चवळी सारख्या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड फायदेशीर ठरते. पिकामध्ये एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत. त्यामुळे पक्षांद्वारे अळीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. लागवड झाल्यानंतर सर्वेक्षणासाठी त्वरित एकरी चार कामगंध सापळे लावावेत. दररोज सापळ्यात सापडणाऱ्या पतंगांची संख्या मोजावी. शेतात योग्य स्वच्छता राखावी. त्याचसोबत काही पर्यायी यजमान वनस्पती शेतात आढळल्यास त्या काढून नष्ट कराव्यात. पिकात डोळ्यांनी दिसणारे अंडीपुंज किंवा मोठ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी लावलेल्या सापळ्यात एकापेक्षा अधिक पतंग प्रति दिवस प्रति सापळा सापडत असतील तर मास ट्रॅपिंगसाठी एकरी पंधरा कामगंध सापळे लावावेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी
चारा मका पिकाच्या पूर्ण आयुष्य साखळीत रासायनिक कीटकनाशकांची एकच फवारणी करावी. फवारणीचे द्रावण मक्याच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी. फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी. फवारणी करताना योग्य काळजी घ्यावी. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी कमीत कमी ३० दिवसांचा असावा. अळीचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्के दिसत असल्यास बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती या कीटकनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा मेटाऱ्हायझियम एनिसोप्ली (१ x १० ८ सीएफयु प्रति ग्रॅम) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक उपाय जर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. फवारणीचे द्रावण मक्याच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.
थायोमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी- ०.२५ मिलि/लिटर पाणी स्पिनेटोरम ११. ७ एस सी- ०.५ मिलि /लिटर पाणी क्लोरॲट्रानिलीप्रोल १८.५ एस सी- ०.४ मिलि/लिटर पाणी - डॉ. अंकुश चोरमुले, ८२७५३९१७३१
(लेखक कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ तसेच सिस्क्थ ग्रेन ग्लोबल या कंपनीत अॅग्रोनॉमीस्ट आहेत.)