दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरण्यास योग्य असावा लागतो.
पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही काठांवर खडक आढळतो अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविणे यासाठी करता येतो. दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेत जमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे. जास्त उतार असलेल्या वरच्या व हलक्या जमिनीस समतापळी रेषेवर चरी खोदण्यात येतात. चरातील माती खालच्या बाजूला टाकतात. पावसाचे वहात येणारे पाणी याच चऱ्यांमध्ये साठते. त्यामुळे झाडांच्या मुळांना ओलावा मिळतो. हे चर ४ ते ५ मीटर लांब, ४० ते ५० सें.मी. रुंद व ४० ते ६० सें.मी. खोल, सलग किंवा एक सोडून एक अशा खोदतात. फळझाडे किंवा वनवृक्षांची लागवड चऱ्यांच्या काठावर केल्यामुळे झाडांना सतत ओलावा मिळतो. त्यांनी चांगली वाढ होते. या चरांमुळे वाहत्या पाण्याचा वेग अतिशय कमी होतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर कमी करता येते. नाल्याच्या पात्रात आडवे मातीचे बांध घालतात यालाच नाला बंडिंग म्हणतात. नाल्याच्या पात्रातून वाहत येणारे पावसाचे पाणी या बांधाला अडते व तेथे बराच काळ साठून राहते. हे पाणी हळूहळू जमिनीत झिरपत असते. या बांधामुळे सभोवतालच्या क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. खालच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढते. पाझर तलाव पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला आणि पाणलोट क्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून तो जास्तीत जास्त दिवस साठवून, तो जमिनीत मुरवून त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वाढविणारा बंधारा. जर अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात आला तर पाणलोटक्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन त्या क्षेत्रातील भूजल पुनर्भरणाकरिता त्याचा वापर होऊ शकतो. पाझर तलावांमुळे पाण्याबरोबर वाहून जाणारी सुपीक मातीदेखील अडविली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दुष्काळी प्रदेशात पाझर तलावाचे बांधकाम करतात. हे करताना पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते. ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरण्यास योग्य असावा लागतो.
पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तालव हा सच्छिद्र भूभागावर बांधला तरच त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणून पाझर तलाव हा एखाद्या भारी जमिनीवर बांधू नये की ज्यामुळे पाझर तलावाच्या मुख्य कार्यालाच बाधा होईल. पाझर तालाव अशा ठिकाणी बांधावा की तेथील जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालचा कमीत कमी तीन मिटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीत भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो. पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन माेठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. अशा मोठ्या प्रमाणातील शेतजमीन असल्याने पाझर तलावाचा जास्तीत जास्त उपयोग करून शक्य होते. या भागात अनेक विहिरी असणे अथवा नवीन विहिरी खोदण्यालायक क्षेत्र असणे गरजेचे आहे , जेणेकरून त्या भागाला सिंचनाखाली आणणे शक्य होईल. पाझर तलावामध्ये जास्त होणारे पाणी काढून टाकण्यासाठी सांडव्याची साधीसोपी, परवडणारी आणि कार्यक्षम व्यवस्था करता येणे भौगोलिकदृष्ट्या शक्य असावे. पुरेशा सच्छिद्र भूस्तरावर पाझर तलाव बांधताना तो एखाद्या खोल दरीसारख्या भागात बांधावा जेणेकरून खोल तळे तयार होईल व पाणी कमीत कमी क्षेत्रावर पसरेल. उथळ तळ्यापेक्षा असे खोल तळे तयार केल्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ऊन, वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते, कमीत कमी जमीन पाण्याखाली बुडते. दुसरा फायदा म्हणजे तलावातील पाणी अडविण्याकरिता निवडलेले क्षेत्र जर पुरेसे सच्छिद्र नसेल तर त्याचे साठवणक्षेत्र वाढवावे ज्या योगे अधिक पाणी मुरू शकेल. ज्या पाणलोट क्षेत्रामधून पाझर तलावामध्ये पाणी येणार आहे त्यात योग्य प्रमाणात झाडीझुडपे व गवत असावे की ज्यामुळे मातीची धूप होणार नाही. जर अशा प्रकारची व्यवस्था नसेल तर त्या पाणलोट क्षेत्रात मृदसंधारणाची कामे करावीत, अन्यथा वाहून आलेली माती पाझर तलावात साठून त्याची साठवणक्षमता कमी होऊ शकते. पाझर तलावाचा भराव तयार करण्याकरिता माती, बांधकामसाहित्य त्या क्षेत्रातच उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. बाहेरुन साहित्य वाहून आणून भराव तयार करण्यामुळे खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते. - डॉ. मदन पेंडके ः ९८९०४३३८०३ (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)