खरीप भात अवस्था - पूर्वतयारी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.
अवस्था - फलधारणा (पक्वता) काढणीयोग्य फळांची काढणी ‘नूतन’ झेल्याच्या साहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह करावी. काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर त्वरीत करावी. यामुळे फळामधील साक्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. आंब्यावरील काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेचच फळे ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरुगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पकिंग करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले “रक्षक फळमाशी सापळा” प्रति हेक्टरी ४ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर लावावेत. फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावीत. बागेत स्वच्छता ठेवावी. आंबा पिकाची काढणी झाल्यावर झाडावरची बांडगुळे व वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. मोठ्या फांद्यावरील बांडगुळे काढलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. काजू काजू बागेतील वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. फांद्या काढलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी.
बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने सुपारी बागेत ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. सुपारीचे कोळेरोग या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट करावेत. पानांचा बेचक्यात १ टक्का बोर्डोमिश्रणाच्या ३ ते ४ फवारण्या एका महिन्याच्या अंतराने कराव्यात. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने नारळ बागेत ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नारळावरील इरीओफाईड कोळीच्या नियंत्रणासाठी कडूनिंबयुक्त (ॲझाडीराक्टीन) कीटकनाशक ७.५ मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे एप्रिल ते मे महिन्यात द्यावे. वरील कीटकनाशक दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय नारळावर निमयुक्त कीटकनाशक ४ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेले फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावा. उन्हाळी भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.३ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही)०.६ मि. लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने फळबाग रोपवाटिकेस, नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला पिकास नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)