खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान

गुलाब लागवड
गुलाब लागवड

गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासाठी होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात. अलीकडे गुलाब फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे. 

 • परदेशात गुलाब फुलांचा उपयोग लांब दांड्याचे फूल (कटफ्लावर) म्हणून करतात. 
 • जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीत एकट्या गुलाबाचा वाटा ३५ ते ४० टक्के आहे. 
 • हवामान :  तापमान : 

 • पिकाच्या वाढीसाठी आणि बहरासाठी १५ ते ३० अंश  सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते. असे तापमान नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथे असल्याने या भागात वर्षभर गुलाबास फुले येतात. 
 • बहरासाठी हिवाळी हंगाम उत्तम असतो. नोव्हेंबर ते  फेब्रुवारी या कालावधीत उत्तम प्रतीची भरपूर फुले मिळतात. उत्तम प्रतीच्या फुलासाठी रात्रीचे तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस असावे लागते. हे तापमान कमी-जास्त झाले तर त्याचा थेट परिणाम फुलांच्या रंगावर, गुणवत्तेवर व उत्पादनावर होतो.
 • उन्हाळ्यात उष्ण व कोरड्या हवेमुळे गुलाबाची वाढ खुंटते, बहर कमी येतो, त्याची गुणवत्ताही चांगली नसते. 
 • पावसाळ्यातील अति पावसामुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो. पावसाळ्यातील ढगाळ हवामान आणि जास्त आर्द्रता यांचा परिणाम फुलांच्या गुणवत्तेवर होतो.
 • प्रकाश : 

 • फुलाच्या चांगल्या वाढीसाठी स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते. कमी प्रकाशात अथवा सावलीत गुलाब झाडाची वाढ नीट होत नाही, फुलेही कमी लागतात.
 • आर्द्रता : 

 • पावसाळी हवामानातील ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता झाडाच्या वाढीस हानीकारक ठरते. आर्द्रता जास्त झाल्यास रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढतो.  
 • हवेतील सरासरी ६० ते ६५ टक्के आर्द्रता पीक वाढीसाठी चांगली असते. यापेक्षा कमी अथवा जास्त आर्द्रता गुलाबास हानिकारक ठरते.
 • कर्ब वायू : 

 • वातावरणात ०.०३ टक्के कर्बवायूचे प्रमाण असते; परंतु हे कर्बवायूचे प्रमाण ०.०८ - ०.१ टक्‍क्‍यापर्यंत वाढल्यास गुलाबाची वाढ चांगली होते. त्याचबरोबर उच्च गुणवत्ता असलेल्या फुलांचे उत्पादनही मिळते. 
 • प्लॅस्टिकच्या बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त हरितगृहात कर्बवायू नियंत्रित करता येतो. उघड्यावरील  शेतीमध्ये कर्बवायूचे आपण योग्य प्रमाण ठेऊ शकत नाही. परंतु उघड्यावरील शेतात प्लॅस्टिकची अर्धबंदिस्त हरितगृहे उभारून या घटकावर काही प्रमाणात नियंत्रण करून गुणवत्तापूर्ण फुलांचे उत्पादन घेणे शक्‍य आहे.
 • जमीन : 

 • हे झुडूपवर्गीय बहुवर्षायू पीक असल्याने एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत ते पाच-सहा वर्षे राहते. त्यामुळे खुल्या शेतीतील (ओपन) गुलाब लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करावी. 
 • या पिकाची वाढ सातत्याने होत असते.  त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाण्यापेक्षा आडवी जास्त पसरतात. त्यामुळे गुलाब लागवडीसाठी ४० ते ४५ सें.मी. खोलीची जमीन निवडावी. निवडलेली जमीन ही सकस आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. 
 • अतिशय हलकी किंवा भारी जमिनी अयोग्य असतात. भारी, चोपण, पाणथळ, खडकाळ जमिनीतही हे पीक चांगले येत नाही.
 • लागवडीस  मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सामू ६ ते  ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन निवडावी.
 • परदेशात दर्जेदार उत्पादनासाठी रॉकवूल या सच्छिद्र माध्यमामध्ये गुलाबाची लागवड करतात.
 • जमिनीची आखणी : 

 • जमिनीची योग्य मशागत करून लव्हाळी, हरळीसारख्या बहुवर्षायू तणांचे नियंत्रण करावे.जमीन उभी-आडवी नांगरून उन्हामध्ये चांगली तापू द्यावी. जमिनीचे सपाटीकरण करावे. त्यामुळे पाणी देणे सोपे होते. 
 • तयार केलेल्या जमिनीत चर किंवा खड्डा पद्धतीने लागवड करावी. 
 • एकेरी ओळ पद्धतीने लागवड करताना ४५ सें.मी. × ४५ सें.मी. × ४५ सें.मी. आकाराचा खड्डा खणावा. दोन खड्ड्यांतील अंतर ७५ सें.मी. ठेवावे. दोन ओळींतील ७५ ते १०० सें.मी. अंतर ठेवावे. दोन ओळींतील अंतर ठेवताना आंतरमशागत सुलभपणे कशी करता येईल या गोष्टीचा विचार करावा. 
 • चर पद्धतीने लागवड  करताना ६० सें.मी. रुंद आणि  ४५ सें.मी. खोल चर काढावा. दोन चरांतील अंतर १.५ मी. ठेवावे. चरामध्ये लागवड करण्यासाठी दोन झाडांतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे. चरामध्ये लागवड करताना शक्‍यतो त्रिकोण पद्धतीचा अवलंब करावा. 
 • लागवडीसाठी  काढलेले खड्डे व चर लागवडीपूर्वी खत व माती मिश्रणाने भरून घ्यावेत. हेक्‍टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत, एक टन सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक वापरावे.
 • लागवड वर्षभर केव्हाही करता येत असली तरी पावसाळी हंगामातील लागवड यशस्वी होते.
 • लागवडीसाठी उन्हाळ्यात खत-मातीने खड्डे/चर भरून पावसाळ्याच्या सुरवातीला जून-जुलै महिन्यात लागवड करावी. जेथे पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी ऑक्‍टोबर किंवा फेब्रुवारीत लागवड करावी.
 • कलमांची निवड : 

 • लागवडीसाठी स्वतः तयार केलेली कलमे निवडावीत किंवा प्रमाणित रोपवाटिकेतून खात्रीशीर, निरोगी हव्या त्या जातीच्या कलमांची निवड करावी. 
 • ज्या कलमांचा जोड चांगला जमला आहे, जोमदार वाढ असणारे निरोगी कलम निवडावे.  
 • निवडलेले कलम हे ४ ते ६ महिने वयाचे असावे. 
 • कलमांची लागवड : 

 • लागवड करण्यासाठी खड्ड्यामध्ये अथवा चरावर कलमांच्या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या आकाराचा खड्डा घ्यावा. कलमे लावताना प्लॅस्टिकची पिशवी कलमांची हुंडी न फोडता अलगद वेगळी करावी. 
 • कलम खड्ड्यात लावताना कलमांचा जोड जमिनीपासून १० ते १५ सें.मी. वर राहील याची काळजी घ्यावी.
 • कलम लावताना मूळ खुंटाची फूट काढूनच कलम खड्ड्यात लावावे. कलम लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. 
 • पाऊस नसेल तर  कलमांची वाढ सुरू होईपर्यंत दररोज हलके पाणी द्यावे. कलमाला फुले आली असल्यास ती तोडून काढावीत. कलमांची जोमदार वाढ होईपर्यंत आणि ते दर्जेदार उत्पादन देण्यास योग्य वाढीचे होईपर्यंत येणारी फुले काढून टाकावीत.
 • जाती : 

 • गुलाबाच्या २० हजारांहून जास्त जाती लागवडीखाली असल्या तरी योग्य जात निवडावी. आपल्या  हवामानात आणि जमिनीत  चांगली वाढणारी, आकर्षक, टपोरी, विविध रंगी व सुवासिक फुले असणारी आणि दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवडावी. 
 • बाजारात मुख्यत्वे करून ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्‍स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्‍चन डायर, ओक्‍लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस इत्यादी जातींना मागणी आहे.
 • जातींची विभागणी  बागेत लावण्यासाठी :  जास्त फुले देण्याची क्षमता असलेल्या फ्लोरीबंडा, मिनिएचर व हायब्रीड टी प्रकारातील काही जातींची निवड करावी. बागेत लागवडीसाठी जोमदार वाढणाऱ्या, आकर्षक रंगाची जास्त फुले असलेल्या, जास्त काळापर्यंत फुलणाऱ्या व रोग-किडीस प्रतिकारक्षम जाती निवडाव्यात. उदा. पास्ता, कोरोना, डॅनिश गोल्ड, रॉबिनसन, ऑल गोल्ड, युरोपिआना, इत्यादी. फुलदाणी, गुच्छ व सजावटीसाठी : पाकळ्यांची विशिष्ट ठेवण असलेल्या फुलांचा आकर्षक आकार, रंग व सुवास असलेल्या, पाने तजेलदार व दांडा लांब असलेल्या जाती निवडाव्यात. त्याची व्यापारी तत्त्वावर लागवडही करतात. उदा. ग्लॅडिएटर, सोनिया, रक्तगंधा, अर्जुन, डबल डिलाईट, लॅडोरा, टिकाने, सुपरस्टार, इलोनी, मर्सडिस, पापा मिलन, लेडी एक्‍स, ब्लू मून इत्यादी. प्रदर्शनासाठी : ज्या फुलांचा आकार मोठा, फुलाचा दांडा भक्कम व लांब, दांड्यावर तजेलदार पाने, अनेक पाकळ्यांची उत्तम ठेवण, आकर्षक अशा जातीची प्रदर्शनासाठी निवड करतात.

  फुलांचे प्रकार :  झाडाची वाढ, पाकळ्यांची संख्या, फुलांची संख्या, रंग-सुगंध, दांडाची ठेवण इत्यादी वैशिष्ट्यांवरून गुलाबाचे प्रमुख सहा प्रकार पडतात.  १) हायब्रिड टी : 

 • लांब दांड्याच्या फुलासाठी लागवडीस योग्य प्रकार आहे. प्रत्येक फांदीवर १ ते ३ लांब दांड्याची फुले येतात. झाड मध्यम ते जोमदार वाढते.
 • फुले मोठी, आकर्षक,  एकेरी अथवा दुहेरी रंगाची असतात. काही जाती सुगंधी आहेत.
 • या प्रकारात गॅडिएटर, सुपरस्टार, डबल डिलाईट, पीस, ॲम्बेसॅडर, ब्लू मून, फस्ट प्राईज, पापा मिलन, समर सनशाईन, लॅंडोरा, डॉ. होमी भाभा, स्नो गर्ल,जॉन एफ. केनडी इत्यादी जातींचा समावेश होतो.
 • २) फ्लोरीबंडा : 

 • या प्रकाराची फुले मध्यम आकाराची, टिकाऊ आणि झुपक्‍यात येतात. त्यामुळे बागेत ताटव्यासाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो.
 • फुले हायब्रीड टीपेक्षा आकाराने लहान असतात. काही जातींना लांब दांड्याची फुले येतात. 
 • या प्रकारात बंजारन, ऑल गोल्ड, चंद्रमा, डिअरेस्ट, दिल्ली प्रिन्सेस, सिटी ऑफ लखनौ, इन्डीपेन्डन्स, समर स्नो, नीलांबरी, प्रेमा, हिमांगिनी, पावडर पफ, डिव्होशन, सी पर्स, शोला  या जाती आहेत.
 • ३) पॉलिएन्या  : 

 • मध्यम उंचीच्या झाडाला एकेरी लहान, पसरट पण झुपक्‍याने फुले लागतात. 
 • कुंडीत, परसबागेत, कुंपणासाठी लागवड करण्यास हा प्रकार उपयोगी असतो. 
 • उदा. पिंक शॉवर, एको, बेबीरेड, बेबीव्हाईट, प्रीती.
 • ४) मिनिएचर्स : 

 • यास छोटा गुलाब असे म्हणतात. लहान झाडाची पानेही लहान असतात. 
 • याला लहान फुले झुपक्‍याने येतात. याची झाडे काटक असतात. कमी जागेत किंवा कुंड्यात लागवडीसाठी उपयुक्त. 
 • या प्रकारात  पिक्‍सी, बेबी गोल्डस्टार, रोझ मरीन, किंग यलो डोल, स्वीट फेअर, ड्‌वार्फ किंग इत्यादी जाती आहेत.
 • ५) वेली गुलाब : 

 • हा गुलाब वेलासारखा जोमाने वाढतो. कुंपण, भिंत, मांडव आणि कमानीवर चढवण्यासाठी याचा उपयोग होतो. 
 • वेल गुलाबाच्या कॅसिनो, कॉकटेल, फाउंटन, गोल्डन शॉवर, मेरी गोल्ड, रॉयल गोल्ड, स्नो गर्ल, क्‍लाइम्बिंग पिस, इत्यादी जाती आहेत.
 • ६) सुवासिक गुलाब :

 • या गुलाबाची फुले सुवासिक असतात. फुलांना मनमोहक मंद सुवास येतो. 
 • फुलांचा उपयोग गुलाबपाणी, गुलकंद, अत्तर व सुवासिक तेल तयार करण्यासाठी करतात. 
 • जाती :  ॲव्हान, ब्लू मून, कॉन्फिडन्स, क्रिमसन ग्लोरी, एफेल टॉवर, डबल डिलाईट, नूरजहान, मधुरा, परफ्युम डिलाईट, गार्डन पार्टी, ऐंजलफेस या जाती वापरतात. 
 • परंतु मुख्यतः दमास्का गुलाब, एडवर्ड गुलाब, सेंटिफोलिया गुलाब आणि मोस्वाटा गुलाब या चार प्रकारातील गुलाब प्रामुख्याने प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात.
 • अभिवृद्धी : 

 • अभिवृद्धी बी, फाटे, कलम व लेअरिंग याद्वारे होते. व्यापारी दृष्टिकोनातून ‘T` पद्धतीने डोळे भरण्याची पद्धत महत्त्वाची आहे. 
 •  डोळे भरण्यासाठी मात्र मुळखुंट म्हणून पूना ब्रायर, रोझा इंडिका, व्हरायटी ओडोराटा, रोझा मल्टीफ्लोरा (महाबळेश्‍वरी) यांचा वापर करावा. 
 • कलम करण्यासाठी सुधारित पॉली बॅग पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी प्रथमतः मुळखुंटाचे पक्व ३ ते ४ डोळे असलेले, १५ ते २० सें.मी. लांबीचे छाटे मातीमिश्रणाने भरलेल्या पॉलीबॅगमध्ये लावावेत. 
 • छाट्यांना लवकर व भरपूर मुळ्या फुटण्यासाठी शिफारस केलेल्या संजिवकाची प्रक्रिया करावी.
 • कलमे करण्यासाठी जोमदार वाढीचे मुळखुट निवडावे. छाट्यांना फुटलेल्या फांदीची जाडी  पेन्सिलच्या आकाराची झाली की त्यावर ‘T` पद्धतीने डोळे भरावेत.
 • डोळे भरण्यासाठी खुंटावर २ ते ३ सें.मी. लांबीचा उभा काप घेऊन त्यावर पुन्हा आडवा काप घ्यावा. साल अलगद खोडापासून वेगळी करावी. या कापामध्ये तेवढ्याच आकाराचा हव्या त्या जातीचा २ ते ३ सें.मी. लांब ढालीच्या  आकाराचा डोळा काढून बरोबर खोड व साल यांच्यामध्ये  बसवून प्लॅस्टिकच्या पट्टीच्या साह्याने गुंडाळून घट्ट बांधावे. डोळा बांधताना डोळा उघडा राहील याची खबरदारी घ्यावी. 
 • कलम केलेले झाड ताबडतोब सावलीत किंवा नेटहाऊसमध्ये ठेवावे. त्याचे योग्य संगोपन केल्यास ५ ते ६ महिन्यांत कलमे लागवडीस तयार होतात. 
 • कलमे करण्याचे काम फेब्रुवारी महिन्यात करावे.
 • रंगानुसार जातीचे वर्गीकरण :
 • लाल : ग्लॅडिएटर, ख्रिश्‍चन डायर, रक्तगंधा, रेड मास्टर पीस, ओन्ली लव्ह, इत्यादी.
 • गुलाबी : फ्रेंडशिप, फर्स्ट प्राईज, मारिया क्‍लास इत्यादी
 • पिवळा : लॅंडोरा, समर सनशाईन, गोल्डन टाइम्स, माबेल्ला इत्यादी
 • निळा/जांभळा : लेडी एक्‍स, ब्लू मून, पॅराडाईज इत्यादी
 • केशरी : समर हॉलिडे, सुपरस्टार, प्रिन्सेस इत्यादी 
 • पांढरा : ऑनर, व्हिर्गो, जॉन एफ. केनेडी, मॅटर हार्न इत्यादी
 • दुरंगी : लव्ह, हार्टसमन
 • बहुरंगी : डबल डिलाईट, पीस, अभिसारिका
 • आंतरमशागत :

 • लागवडीनंतर प्रत्येक रोपावर लक्ष द्यावे. मुळखुंटाला जमिनीतून येणारी अथवा कलमांच्या खालील भागावरील काडीवरील फूट वारंवार काढावी. शेत तणमुक्त ठेवावे. 
 • पावसाळ्यात शेतात पाणी साठू नये म्हणून चर काढून पाणी काढून टाकावे. सुरवातीच्या काळात कलमावर येणाऱ्या कळ्या काढून टाकाव्यात म्हणजे कलमांची शाकीय वाढ जोमदार होते.
 • पाणी नियोजन : 

 • कलमांची सुरवातीच्या काळात काळजी घ्यावी. पाण्याचा ताण पडू देऊ नये. त्यासाठी वेळोवेळी पाणी द्यावे. 
 • कलम रुजेपर्यंत थोडे-थोडे वारंवार पाणी द्यावे. नंतर मात्र आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाणी झाल्यास गुलाबाला मूळकुजव्या रोग होतो. 
 • गुलाबाला ठिबक सिंचन करावे.
 •   खत व्यवस्थापन : 

 • उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीनंतर कलमास १५ दिवसांनी १० ग्रॅम युरिया, एक महिन्यानंतर १० ग्रॅम डी.ए.पी. आणि दोन महिन्यानंतर २ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. 
 • दुसऱ्या वर्षापासून बागेस हेक्‍टरी ५० टन शेणखत, १२०० किलो युरिया, २४०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६५० किलो  सल्फेट ऑफ पोटॅश द्यावे. 
 • जून महिन्यात संपूर्ण स्फुरद, अर्धे शेणखत तसेच १/४ नत्र आणि १/४ पालाश या खताची मात्रा द्यावी. राहिलेली  अर्धी शेणखताची मात्रा ऑक्‍टोबर छाटणीनंतर द्यावी. सोबत १/४ नत्र व अर्धी पालाशची मात्रा द्यावी, तर राहिलेली १/४ नत्र व १/४ पालाश खत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि पुन्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विभागून द्यावे.
 • छाटणी : 

 • कलमांना नवीन येणाऱ्या धुमाऱ्यांना किंवा फांद्यांना फुले येतात. या अंगभूत गुणामुळे छाटणी करणे गरजेचे असते. गुलाबाच्या जुन्या फांदीवर फुले येत नाहीत. त्यामुळे गुलाबाला नव्या फांद्या येऊन फुले लागावीत म्हणून गुलाबाची छाटणी करणे आवश्‍यक असते. 
 • छाटणीपासून ४० ते ४५ दिवसांनी गुलाबाची फुले काढणीस तयार होतात. त्यामुळे बाजारभाव लक्षात घेऊन फुलांचे नियमन छाटणीने करता येते. 
 • वर्षातून दोनदा छाटणी करून फुलांचा बहर धरता येतो. एक छाटणी पावसाळा संपताना सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये, तर दुसरी हिवाळा संपताना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करता येते. 
 • गुलाबाचे मोठे क्षेत्र असल्यास बाजाराचे नियमन करण्याच्या दृष्टीने एकदम एकाच वेळी सर्व क्षेत्राची छाटणी न करता टप्प्याटप्प्याने करावी. 
 • छाटणी करताना झाडाच्या मुख्य फांद्या तशाच ठेवून त्यांच्या उपफांद्यांची छाटणी करावी. छाटणी धारदार कात्रीने करावी. 
 • छाटणीअगोदर १० ते १५ दिवस बागेस पाण्याचा ताण द्यावा. छाटणी करताना जोमदार, निरोगी व सजीव फांद्या ठेवून बाकीच्या कमजोर, रोगट, वाळलेल्या फांद्या कापाव्यात.
 • छाटणी करताना कात्री बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावी म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. छाटलेल्या भागावर बोर्डोपेस्ट ताबडतोब लावावी. ही काळजी घेतल्यास रोगाचा प्रसार थांबतो. छाटलेल्या फांद्या जाळून नष्ट कराव्यात. 
 • अनावश्‍यक फांद्यांची गर्दी झाल्यास झाडाचा आकार बिघडतो. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो म्हणून कलमांची प्रमाणशीर छाटणी करावी. छाटणी करताना झाडाच्या मध्यापर्यंत सूर्यप्रकाश पोचेल अशी छाटणी करावी. 
 • छाटणीचे प्रकार : 

  सौम्य छाटणी :  या छाटणीच्या प्रकारात फांदीच्या शेंड्याकडील टोके अथवा काही भाग थोड्या प्रमाणावर छाटला जातो. या छाटणीमुळे भरपूर फुले लागतात; परंतु त्यांचा आकार लहान राहतो. विशेषतः मिनिएचर्स गुलाबामध्ये अशी छाटणी करतात. मध्यम छाटणी :  या छाटणीमध्ये उपफांद्या मध्यम उंचीवर म्हणजे ७ ते ८ डोळे ठेवून उरलेला सर्व भाग कापला जातो. इतर दोन्ही छाटणीपेक्षा ही छाटणी चांगली असते. कारण, या छाटणीमुळे झाडांची उंची मध्यम राहून ती डौलदार वाढतात. फुलांना लांब दांडे मिळतात, दर्जेदार उत्पादन मिळते. कडक छाटणी :  या छाटणीला भारी छाटणी म्हणतात. या छाटणीत झाडाच्या मूळ बुंध्यापासून १५ ते २० सें.मी. अंतर ठेवून बाकीचा सर्व भाग कापतात. ही छाटणी झाडाचे नूतनीकरण करण्यास उपयुक्त ठरते. छाटणीनंतर फुलांचे उत्पादन कमी येते; परंतु फुलांचा दर्जा सुधारतो.

  काढणी : 

 • जवळच्या बाजारपेठेसाठी फुले किंचित उमलू लागल्यावर म्हणजे एक-दोन पाकळ्या उमलत असताना काढणी करावी. 
 • बाजारपेठ लांबची असेल तर कळी घट्ट असलेल्या अवस्थेत मात्र ती कळी नंतर उमलू शकेल अशा अवस्थेत काढावी.
 • फुलांची काढणी सूर्योदयापूर्वी धारदार कात्रीने करावी. फुलांची काढणी करताना जास्तीत जास्त लांब दांडा मिळेल अशा प्रकारे करावी.
 • काढणी केलेले दांडे पाण्यात राहतील इतके पाणी बादलीत असावे. काढणी झाल्यावर काढलेल्या दांड्यांना खालून पुन्हा दोन सें.मी. अंतरावर कट घ्यावा. 
 • फुले लगेच बाजारपेठेत पाठवावयाची नसतील तर ती ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते १२ तास शीतगृहात साठवावीत.
 • प्रतवारी : 

 • फुलांची प्रतवारी करताना रंग, आकार, जात, उमलण्याची अवस्था आणि दांड्याच्या लांबीनुसार करावी. 
 • प्रतवारी केलेल्या फुलदांड्याच्या १ ते २ डझनाच्या जुड्या बांधाव्यात. अशा जुड्या वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी पुन्हा सहा तास २ अंश सेल्सिअस तापमानाला साठवाव्यात. नंतर कागदी पुठ्ठ्याच्या खोक्‍यात व्यवस्थित फुलदांड्याची मांडणी करून खोकी बंद करून लेबल लावून बाजारात पाठवावेत. 
 • परदेशी बाजारपेठेसाठी फुलदांड्याची लांबीनुसार प्रतवारी करावी. ५०-५५ सें.मी., ५५-६० सें.मी. आणि ६०-६५ सें.मी. लांबीच्या फुलदांड्याचे वेगवेगळे गट करून २० फुलदांड्याची एक गड्डी तयार करून योग्य पॅकिंगसहित शीतगृहात साठवून शीतवाहनामार्फत  फुलदांडे परदेशी बाजारपेठेत पाठवले जातात. 
 • उत्पादन :  प्रत्येक झाडापासून पहिल्या वर्षी सरासरी २० ते २५ फुले, दुसऱ्या वर्षी ३० ते ३५ फुले, तर तिसऱ्या वर्षापासून ५० ते ६५ फुलांचे उत्पादन मिळते.

  पीक संरक्षण :    भुरी, करपा, खोडकूज, पानेकूज, काळे ठिपके हे या पिकावरील प्रमुख रोग आहेत.

 • भुरी :  भुरी रोगामुळे पानांवर बुरशीचा पांढरा थर निर्माण होतो. तो पुढे कळ्या व फुलांवर पसरतो. दिवसा जास्त तापमान व रात्री खूप थंडी तसेच धुके यामुळे रोगाचा प्रसार होतो. नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. 
 • करपा :  रोगाचा पावसाळ्यात प्रादुर्भाव होतो. गुलाबाच्या पानावर प्रथमतः छोटे-छोटे काळे ठिपके पडतात. पुढे ते वाढत जाऊन पाने पिवळी पडून गळून जातात. 
 • नियंत्रण : 

 • प्रतिबंधक उपाय म्हणून बाग स्वच्छ ठेवावी.
 • प्रादुर्भावाची लक्षणे तपासून शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
 • किडींचा प्रादुर्भाव :  प्रामुख्याने लाल कोळी, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, पाने खाणारी अळी, कळी पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो.  नियंत्रण : 

 • एकात्मिक कीड नियंत्रण पद्धत अवलंबावी. 
 • एकाच कीटकनाशकाचा वारंवार उपयोग टाळावा. 
 • शिफारशीनुसार आंतप्रवाही आणि स्पर्शजन्य कीडनाशके गरजेनुसार आलटून पालटून वापरावीत.
 • संपर्क  : डॉ. सतीश जाधव, ०२०- २५६९३७५० (लेखक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com