हस्त बहर बागांचे व्यवस्थापन :
छाटलेल्या, रोगट फांद्या, फळे जाळून नष्ट कराव्यात. बागेला चांगल्या प्रतीचे ६ ते ८ सामू व १ डीसीएमचा वजा १ घातपेक्षा कमी विद्युतधारकता असणारे १७ ते १८ लिटर पाणी प्रतिझाड, प्रतिदिवस द्यावे. फळे पेरूच्या आकाराची असताना प्रतिझाड २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ०.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे क्लोरपायरीफॉस १० मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून हे द्रावण छिद्रामध्ये सोडावे आणि छिद्रे बंद करावीत. ढगाळ वातावरणात ८ ते १० दिवसांच्या अंतराने गरजेनुसार ब्रोमोपॉल (२ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १,३ डायोल) २५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फळे लिंबू ते पेरू आकाराची असतानाच ०.५ टक्का बोर्डो मिश्रणाची (५०० ग्रॅम अधिक ५०० मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी घ्यावी. बाग फुलोरा अवस्थेत असताना बोर्डो मिश्रणाची फवारणी टाळावी. बागेत जमिनीवर ४ टक्के कॉपर डस्ट ८ किलो किंवा ब्लिचिंग पावडर २०-२५ किलो प्रतिएकरी या प्रमाणात धुरळणी करावी किंवा बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रणाची (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) जमिनीवर फवारणी करावी. तापमान कमी असताना करावयाच्या उपाययोजना :
बागेला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे.बागेत योग्य तापमान राखण्यासाठी बागेभोवती काडीकचरा व गवत जाळून धूर करावा. सद्यस्थितीत उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. अशावेळी झाडांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी बागेच्या चोहोबाजूंनी शेडनेट किंवा उपलब्ध गोणपाटाचा वापर करुरून वारा प्रतिबंधक कुंपणाची उभारणी करावी. संपर्क :डॉ. सचिन हिरे , ७६९८५३६८७३ (डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, जि. नाशिक)