कांदा पीक सल्ला

गादीवाफ्यावर सुधारित पद्धतीने कांदा रोपवाटिका
गादीवाफ्यावर सुधारित पद्धतीने कांदा रोपवाटिका
Published on
Updated on

मे महिन्यात खरीप कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करण्यासाठी पूर्वमशागत करण्याचा काळ आहे.  तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बीचा कांदा काढणीस आलेला आहे. अशा परिस्थितीत पुढील प्रकारे व्यवस्थापन करावे.

खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन :

  • खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे ०.०५ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी ५-७ किलो बियाणे लागते.
  • रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात.
  • वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडी कचरा, तण आणि दगड काढून टाकावे.
  • अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रति अर्धा टन कुजलेले शेणखतात मिसळून वापर करावा.
  • गादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत.
  • तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
  • मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम १-२ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • पेरणीपूर्वी नत्र ४ किलो, स्फुरद १ किलो, पालाश १ किलो प्रति ५०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी.
  • बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
  • रब्बी कांदा काढणी :

  • कांदा काढणीच्या १०-१५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.
  • पिकाची काढणी ५० टक्के पातींच्या माना पडल्यानंतर करावी.
  • डेंगळे आलेले कांदे आढळल्यास त्वरित काढून टाकावेत.
  • पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटताना तुटते; परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो. त्यामुळे खर्च वाढतो.
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशारीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील.
  • तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
  • टीप : कंपनीने बियाणे प्रक्रिया केली असल्यास पुन्हा वेगळी बियाणेप्रक्रिया करु नये.  

    संपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com