सुधारित भेंडी लागवड तंत्रज्ञान

भेंडीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी. दोन बियांमध्ये ६ ते ७ इंच अंतर ठेवून लागवड करावी.
Improved okra cultivation technology
Improved okra cultivation technology
Published on
Updated on

भेंडीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी. सरी पद्धतीत हलक्या जमिनीत २.५ फूट किंवा भारी जमिनीत ३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन बियांमध्ये ६ ते ७ इंच अंतर ठेवून लागवड करावी. भेंडी हे निर्यातीसाठी वर्षभर मागणी असलेले, कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत भेंडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात भेंडीची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन सहजरित्या मोठ्या प्रमाणात घेता येते. भेंडीच्या उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. हवामान 

  • उष्ण व दमट हवामान पिकांस चांगले मानवते. भेंडीवर तापमानाचा विशेष प्रभाव होतो. त्यासाठी योग्य तापमानात पेरणी करणे गरजेचे असते.
  • १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो. तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते.
  • तापमान २० ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास, बियांची उगवण, झाडाची योग्य वाढ होऊन फूलगळ कमी होते.
  • समशितोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान पिकास उपयुक्त ठरते.
  • जास्त थंडी अधिक काळ असणाऱ्या ठिकाणी रब्बी हंगामात हे पीक घेता येत नाही.
  • अतिशय दमट वातावरणामध्ये भुरी रोगाचा उपद्रव आढळतो.
  • जमिनीची निवड 

  • हलक्या ते भारी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होते.
  • काळी, कसदार, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते.
  • जमिनीचा सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असावी.
  • पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत वाढ खुंटते व फूलगळ होते. त्यामुळे चोपण क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.
  • हलक्या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा.
  • लागवडीसाठी जाती  अर्का अनामिका, परभणी क्रांती, अर्का अभय, पुसा सावनी, अकोला बहार, प्रगती, फुले विमुक्ता. बियाणे  एकरी १० ते १२ किलो बियाणे. बीज प्रक्रिया 

  • पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्यात ठेवावे. किंवा
  • क्लोरमेक्वाट क्लोराईड (१०० पीपीएम) १ ग्रॅम किंवा जिबरेलीक आम्ल (५० पीपीएम) ०.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात भिजत ठेवावे.
  • लागवड 

  • १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.
  • लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी.
  • सरी पद्धतीत हलक्या जमिनीत २.५ फूट किंवा भारी जमिनीत ३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन बियांमध्ये ६ ते ७ इंच अंतर ठेवून लागवड करावी.
  • गरजेनुसार उगवण झाल्यावर विरळणी करावी. एकरी ६० ते ६२ हजार रोपांची संख्या ठेवावी.
  • आंतरमशागत 

  • २ ते ३ खुरपण्या करून झाडांना भर द्यावी.
  • फळे येण्याच्या वेळी रोपांना भर द्यावी.
  • ओलित व्यावस्थापन 

  • पेरणीनंतर त्वरित पहिले पाणी द्यावे.
  • जमिनीच्या प्रकारानुसार पेरणीनंतर ३ किंवा ४ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
  • साधारणतः पीक काढणीस सुरवात झाल्यानंतर, हलक्या जमिनीस ५ ते ७ दिवसांनी तर भारी जमिनीत ७ ते ८ दिवसांनी पाणी द्यावे.
  • सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.
  • ठिबक सोबत १२ ते १५ दिवसांनी मोकाट पाणी द्यावे. म्हणजे उत्पादन व गुणवत्ता चांगली येते.
  • उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी २ ओळींत सुक्या गवताचे आच्छादन द्यावे.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.
  • हेक्टरी ८ ते १० किलो ॲझेटोबॅक्टर व फॉस्फोकल्चर एक बैलगाडी शेणखतामध्ये मिसळून द्यावे.
  • सुरवातीच्या काळात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. जास्त वापरामुळे भेंडीची शाखीय वाढ जास्त होऊन फळधारणा कमी होते.
  • उत्पादन वाढीसाठी स्फुरद व पालाशची मात्रा दोन टप्प्यात द्यावी.
  • रासायनिक खते 

  • पेरणीच्या वेळी नत्र, स्फुरद व पालाशची प्रत्येकी ५० किलो हेक्टरी मात्रा जमिनीत मिसळावी.
  • पेरणीनंतर ४५ दिवसांनी नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ५० किलो द्यावा.
  • माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
  • अन्नद्रव्य कमतरता  स्फुरद कमतरता

  • झाडाची व मुळांची वाढ खुंटते. फूलगळ होऊन फळे पोसली जात नाहीत.
  • पाने मागील बाजूस वळतात. झाडाची पाने जांभळट हिरवे होतात.
  • उपाययोजना 

  • ००:५२:३४ प्रतिलिटर पाण्यात ७.५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी.
  • जमिनीतून शिफारशीत स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा.
  • लोह कमतरता 

  • पाने व देठ पिवळे दिसतात.
  • नवीन फुटलेली पाने पिवळी पडतात. पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसतो.
  • उपाययोजना 

  • फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.
  • फेरस सल्फेट (चिलेटेड) हेक्टरी २५ किलो जमिनीत द्यावे.
  • संजीवकांचा वापर 

  • जिबरेलीक आम्ल ०.१ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यामुळे भेंडी हिरवीगार व लुसलुशीत होते.
  • फळ तोडणीच्या १ दिवस आधी, अल्फा नॅप्थील ॲसिटीक ॲसिड ०.२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • काढणी 

  • फुले आल्यानंतर ६ ते ७ व्या दिवसांपर्यंत भेंडीची लांबी, जाडी आणि वजन वाढते.
  • फळे ८ ते १० सेंमी लांबीची झाल्यावर काढणी करावी.
  • फळे ब्लेड, चाकू किंवा भेंडी प्लकरने देठासहीत काढावीत. काढलेली भेंडी सावलीत ठेवावी.
  • भेंडी ओरबाडून काढल्यास इजा होऊन खराब होते.
  • तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावी. त्यामुळे भेंडीचा रंग आणि ताजेपणा जास्त काळ टिकून राहतो.
  • निर्यातीसाठी ५-७ सेंमी लांब कोवळ्या एकसारख्या फळांची तोडणी करावी. काढणीनंतर चांगला दर मिळण्यासाठी फळांची प्रतवारी करावी.
  • प्रतवारी करताना पिवळी, जरड, वाकडी व किडग्रस्त फळे काढून टाकावीत. फळांची योग्य पद्धतीने हाताळणी न झाल्यास ती काळी पडतात.
  • फळे प्लॅस्टिक क्रेट किंवा २५० गेजच्या प्लॅस्टिक पिशवीत ठेवल्यास बराच काळ चांगली राहतात.
  • कोवळ्या फळांची काढणी २ ते ३ दिवसांच्या अंतराने करावी. फळे दररोज तोडल्यास दुय्यम दर्जाची फळे कमी मिळून उच्च प्रतीची फळे जास्त मिळतात.
  • उत्पादन  खत व पाण्याचे चांगले नियोजन केल्यास, एकरी ५ ते ५.५ टन उत्पादन मिळते. संपर्क : निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५ (उद्यानविद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र, वाशिम)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com