गोठ्यातील गाई-म्हशींचे गाभण राहण्याचे प्रमाण हे जो वळू कृत्रिम रेतनासाठी वापरला जातो त्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. चांगल्या प्रजोत्पादनासाठी वळूंना संतुलित, सकस अाहार पुरवणे गरजेचे अाहे. दुर्लक्षित अाहार व्यवस्थापनामुळे अारोग्य, प्रजनन अाणि उत्पादनावर ताण येतो. पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विर्याची प्रत कमी होते. त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते.
पैदाशीच्या वळूचे आहार व्यवस्थापन
पचनीय प्रथिने १२-१५ टक्के आणि ७० टक्के एकूण पचनीय घटक आहेत असे पशुखाद्य २-३ किलो दर दिवशी द्यावे. नवीन वळूला भरपूर प्रमाणात हिरवा चारा द्यावा. कारण त्यांना ‘अ’ जीवनसत्त्वाची गरज असते.अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वीर्य निकृष्ट दर्जाचे तयार होते. वळूचा नैसर्गिक रेतनासाठी जास्त वापर असल्यास आहारात पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे. नैसर्गिक रेतनासाठी उपयोगात असलेल्या वळूच्या आहारामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, सेलेनियम, कॉपर या खनिजांचा, ‘अ’ आणि ‘इ’ या जीवनसत्त्वांचा समावेश करावा. या घटकांच्या कमतरतेमुळे वळूची प्रजोत्पादन क्षमता घटू शकते. आहारात कॅल्शिअमचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पाठीच्या मणक्याचे हाड आणि इतर हाडे जोडली जातात, त्यामुळे वळूमध्ये नैसर्गिक रेतनावेळी समस्या निर्माण होतात. नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आहारात सर्व पोषणतत्त्वांच्या योग्य प्रमाणाबरोबरच पिण्यासाठी योग्यवेळी मुबलक पाणी गरजेचे आहे. वळूला गरजेपेक्षा जास्त किंवा कमी चारा देणे टाळावे. योग्य प्रमाणात हिरवा चारा, वाळला चारा अाणि पशुखाद्य द्यावे. मुरघासाचाही वापर करावा. गरजेपेक्षा जास्त आहार दिल्याने शरीरामध्ये फॅट जमा होऊन वळूंचे वजन वाढते. त्यामुळे पायावर ताण वाढतो. नैसर्गिक रेतनाची इच्छा कमी होते. गरजेपेक्षा कमी आहार दिल्यास पोषणतत्त्वांची कमतरता होऊन प्रजोत्पादनक्षमता कमी होते. आहार देताना वळूचे वजन व त्याचा नैसर्गिक रेतनासाठी वापर या गोष्टींचा विचार करावा. आहारामध्ये शुष्क पदार्थांचे प्रमाण वजनाच्या २ टक्के इतके असावे. संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)