हरितगृहात गुलाब लागवडीनंतर घ्यावयाची काळजी

हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची संरचना (स्ट्रक्चर) तयार करणे गरजेचे असते. त्यावरच पुढील पाच वर्षांतील उत्पादनाचे गणित बसवता येते. त्यासाठी खत, पाणी व्यवस्थापनासाठी मशागतीच्या विविध पद्धतींचा योग्य अवलंब करावा.
The buds in different positions of the rose should be preserved
The buds in different positions of the rose should be preserved

हरितगृहामध्ये गुलाब लागवड केल्यानंतर त्यांची संरचना (स्ट्रक्चर) तयार करणे गरजेचे असते. त्यावरच पुढील पाच वर्षांतील उत्पादनाचे गणित बसवता येते. त्यासाठी खत, पाणी व्यवस्थापनासाठी मशागतीच्या विविध पद्धतींचा योग्य अवलंब करावा. लागवडीनंतर सुरुवातीचे १५ ते २० दिवस होजपाइपला झारी लावून हलके पाणी द्यावे. यामुळे सुरुवातीच्या काळात आवश्यक असलेली आर्द्रता हरितगृहामध्ये तयार करणे सोपे पडते. यामुळे मुळांची व कलमांची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर पुढील काळात हरितगृहामध्ये गुलाबाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. त्यामुळे रोपांना अचूक तेवढे पाणी व खते देता येतात. पाण्याचे प्रमाण हे तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश यावर अवलंबून असते. पाण्याचा सामू ६.५ ते ७ दरम्यान असावा. २ ते २.५ लिटर पाणी प्रति चौ.मी. प्रति दिवस द्यावे. उष्ण व कोरड्या हवामानाच्या काळात पॉलिहाउसमधील तापमान कमी करण्यासाठी मिस्टर्स व फॉगर यंत्रणा दर ठरावीक काळानंतर सुरू करावी.  खत व्यवस्थापन हरितगृहात गुलाबाची लागवड आणि त्याला लागणारी खते यांचा सतत अभ्यास सुरू असतो. झाडांची वाढीव संख्या, झाडांची सतत होणारी वाढ, उंचावलेली गुणवत्ता आणि अधिक उत्पादन यासाठी गुलाब झाडास नवीन लागवडीनंतर २१ दिवसांनी दररोज खते दिली जातात. त्याचे प्रति चौरस मीटर प्रमाण साधारणपणे पुढीलप्रमाणे  असते.

 •   २१ दिवसांनंतर पुढील दोन महिने (पहिली बेंडिंग होईपर्यंतचा खताचा डोस) १०० पीपीएम नत्र, ५० पीपीएम स्फुरद, १५० पीपीएम पालाश, ६० पीपीएम कॅल्शिअम, ३० पीपीएम मॅग्नेशिअम
 •   पहिली बेंडिंग पूर्ण झाल्यानंतर १२० पीपीएम नत्र, ६० पीपीएम स्फुरद, १८० पीपीएम पालाश, ८० पीपीएम  कॅल्शिअम, ४० पीपीएम मॅग्नेशिअम आणि दोन ते पाच पीपीएम इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये. 
 • बहुतांश सूक्ष्म अन्नद्रव्ये जमीन किंवा फवारणीतून पुरेशा प्रमाणात मिळतील, याची खात्री करावी. मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी योग्य ते नियोजन बसवावे. व्यावसायिक लागवडीमध्ये दर काही टप्प्यानंतर माती व पानाचे परीक्षण करून खत नियोजनात योग्य बदल करावेत. आंतरमशागत  लागवडीनंतरची निगा  लागवडीनंतर लगेच होज पाइपद्वारे किंवा झारीच्या साहाय्याने रोपांना पाणी द्यावे. गरजेनुसार कार्बेन्डाझीम दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ड्रेंचिंग करावे. विशेष मशागतीच्या पद्धती  गुलाबामध्ये योग्य वाढ अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पुढील महत्त्वाच्या मशागत पद्धती उपयुक्त ठरतात. झाडाचा प्राथमिक विकास/ मातृ काडीची बेंडिंग करणे. लागवडीनंतर झाडाच्या  फुटलेल्या डोळ्याची वाढ होऊन त्या काडीला (मदर शूट) एक महिन्यानंतर कळी येते. कळी आल्यानंतर ती तोडून टाकावी. कळी तोडल्यानंतर मुख्य फांदीवर दोन ते तीन डोळे वाढतात. त्याचे रूपांतर पुढे फांद्यांमध्ये होते. या फांद्यांना नंतर कळ्या येतात. झाडाच्या या अवस्थेत या मातृ काडी उपफांद्यासह  वाकवली जाते. मातृकाडी नेहमी क्राउनपाशी (अंकुराच्या सांधा) वाकवली जाते. असे केल्याने झाडाच्या तळापासून नवीन अंकुर (बेसल शूट किंवा तळ फुटवा) तयार होतात. त्यातून मिळणारी फुले आकाराने मोठी व लांब दांड्याची असतात. या तळ फुटव्यापासून झाडाची उत्तम संरचना तयार करता येते.   झाडाच्या संरचनेचा विकास  मातृकाडी वाकवल्यानंतर पहिला फुटवा (बेसल) वाढतो, त्यापासून झाडाचा मुख्य पाया तयार होतो. या फुटव्याचा उपयोग पायाभूत आधाररचनेसाठी होतो. झाडाच्या पूर्ण आयुष्यापर्यंत त्याची मदत उत्पादनासाठी होते. तळातील हे सर्व  फुटवे साधारणतः दोन ते सव्वादोन महिन्यांनी वाकवले जातात.  बेंडिंग झाडाची पाने प्रकाश संश्‍लेषणातून अन्नद्रव्याची निर्मिती करतात. झाडावर पानांचे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी बेंडिंग करण्याची गरज असते. पानांना झाडांची फुफ्फुसे म्हटले जाते. बेंडिंग करण्याअगोदर फांद्यांच्या कळ्या काढून टाकाव्यात. कळी काढून टाकल्यामुळे या खोडावरील अंकुराची वाढ थांबवली जाते. बेंडींगच्या खालून फुटणारे फुटवे वाढू दिले जातात. मात्र, ते बारीक किंवा कमजोर असल्यास, त्यांचे दोन ते तीन पाने सोडून पुन्हा बेंडिंग केली जाते. जंगली फुटवे काढून टाकणे कलम लावल्यानंतर मूळ खुंट (रूट स्टॉक) मधूनही फूट वाढ लागते. ती अनावश्यक असून, वेळीच काढणे गरजेचे असते. मात्र ही फूट अगदी जोडापासून किंवा फुटलेल्या जागेपासून काढावी. अन्यथा तेथे पुन्हा फुटवे येत राहतील. डिसबडिंग मुख्य कळी असलेल्या फांदीवरील पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या कळ्या किंवा अंकुर काढून टाकण्याच्या क्रियेला डिसबडिंग असे म्हणतात. मुख्य दांड्यांचा व फुलांचा दर्जा उंचावण्यासाठी हे आवश्यक असते. सुरुवातीलाच हे अंकूर काढून टाकल्यामुळे झाडाची ऊर्जा अनावश्यक वाया जात नाही. ती पूर्णपणे मुख्य दांडा व कळीसाठी उपयोगी पडते. रोपांना आधार देणे  गुलाबाच्या विशेषतः लांब दांड्याच्या जातींना आधाराची आवश्यकता असते. अन्यथा हे लांब दांडे चालण्याच्या वाटेत येतात, कामे करताना अडथळा होतो. तसेच दांडेही खराब होऊ शकतात. हे नुकसान टाळण्यासाठी बेडच्या दोन्ही बाजूंना दर काही अंतरावर बांबू अथवा लोखंडी खांब उभारून तारा बांधून घ्याव्यात. या तारांमुळे दांडे आत राहतात.  माती खुरपणी  दर पंधरा दिवसांनंतर बेडमधील माती खुरपणे, माती हलवणे गरजेचे असते. त्यासाठी लांब दांड्याच्या खुरप्याचा वापर करून दोन ते पाच सेंटिमीटर खोलीपर्यंत माती हलवून घ्यावी. त्यापेक्षा जास्त खोलीपर्यंत माती हलवू नये. अन्यथा, झाडांची मुळे तुटून नुकसान होईल.  माती खुरपणीमुळे होणारे फायदे 

 •   जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
 •   पाण्याचा निचरा चांगला होतो.
 •   खतामुळे जमिनीवर निर्माण होणारा पांढरा थर हलविला जातो.
 •   शेवाळ व गवत काढले जाते.
 • - दशरथ पुजारी,  ९८२३१७७८४४, ९८८१०९७८४४ (लेखक तळेगाव दाभाडे,  ता. मावळ जि. पुणे येथील खासगी फूल उत्पादक कंपनीत कार्यरत आहेत.)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com