ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान

ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान
ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड तंत्रज्ञान
Published on
Updated on

ब्रुसेल्स स्प्राऊटचे शास्त्रीय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया’ एल. व्हरा. जेमीफेरा असे आहे. ब्रुसेल्स स्प्राऊटचा गड्डा वाफवून भाजीसाठी किंवा कच्चा बारीक चिरून खाण्यासाठी वापरतात. कोबीसारखाच दिसणारा पण छोट्या आकाराचा गड्डा असतो. गड्डा पानांच्या बेचक्‍यांत वाढतो. यास उत्तम स्वाद आणि चव असते.

  • जपान, ऑस्ट्रेलिया, युरोप, इटली आणि अमेरिकेत ब्रुसेल्स स्प्राऊटची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. अमेरिकेमध्ये ब्रुसेल्स स्प्राऊटचे अंदाजे ९० टक्के उत्पादन दर वर्षी डबाबंद प्रक्रियेसाठी वापरले जाते.
  • भारतामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, पुणे येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये या भाजीची चांगली मागणी आहे.
  • भारतामध्ये याची लागवड उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये केली जाते. राज्यात पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील काही शेतकरी हिवाळी हंगामात लहान क्षेत्रावर याची लागवड करतात.
  • आहारात वापर :

  •  स्प्राऊट्‌सचे बारीक तुकडे करून इतर भाज्यांमध्ये मिसळून सॅलड म्हणून कच्च्या स्वरूपात वापरतात. स्प्राऊट वाफवून गड्डे खाण्यास वापरतात.
  • स्प्राऊटचे तुकडे ऑलिव्ह तेल किंवा बटरमध्ये फ्राय करतात.
  • औषधी गुणधर्म :

  • यामध्ये अॅन्टि-ऑक्‍सिडंट द्रव्ये असतात. यामधील सल्फोराफेन द्रव्य मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे नियंत्रण करते.
  • यात कॅलरीजचे प्रमाण कमी आहे. अ, के, बी- ६३, फोलिक आम्ल आणि खनिजे, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचे योग्य प्रमाण असते.
  • हवामान :

  • लागवडीसाठी हिवाळी हंगाम योग्य आहे. साधारणतः १५ ते २६ अंश सेल्सिअस     तापमान पिकास चांगले मानवते. उष्णतामान अधिक वाढल्यास स्प्राऊट लहान आणि पोकळ राहून प्रत चांगली मिळत नाही. चव कडू होते.
  • वर्षभर पुरवठा करण्यासाठी याची हरितगृहात लागवड करावी. हरितगृहामध्ये १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करून उच्च प्रतीचे उत्पादन घेता येते.
  • ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणीसुद्धा याची लागवड करता येते. दिवसा २५ ते २६ अंश सेल्सिअस आणि रात्रीच्या वेळी १६ ते १७ अंश सेल्सिअस तापमानात याचे उत्पादन व प्रत अतिशय चांगली येते.
  • जमीन :

  • पाण्याचा निचरा होणारी मध्यम, रेतीमिश्रित, सेंद्रिय खतेयुक्त जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त उपयोग केल्यास पिकाचे उत्पादन व स्प्राऊट्‌सची प्रत उत्कृष्ट मिळण्यास मदत होते.
  • जमीन उभी- आडवी नांगरून कुळवाच्या साह्याने भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळेस जमिनीत १५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • हरितगृहामध्ये शिफारस केल्याप्रमाणे खत- मातीचे मिश्रण करून निर्जंतुक करून घ्यावे. त्यानंतर ६० सें.मी. रुंद, ३० सें.मी. उंच असे गादी वाफे तयार करून घ्यावेत. दोन गादी वाफ्यांमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे.
  • जातींची निवड :  या पिकाच्या संकरित जाती उपलब्ध आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

    रोपे तयार करणे :

  • लागवड गादी वाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून करतात. गादी वाफे एक मीटर रुंद, ३० सें.मी. उंच आणि तीन मीटर लांब या आकाराचे तयार करावेत.
  • प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी, त्यानंतर गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे १० किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. प्रत्येक वाफ्यात  १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम पावडर मातीत मिसळून द्यावी.
  • वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सें.मी. अंतरावर दोन सें.मी. खोल रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बिया टाकाव्यात. चाळलेल्या बारीक शेणखताने बी झाकावे. झारीच्या साह्याने हलके पाणी द्यावे.
  • एक एकर क्षेत्र लागवडीसाठी ३० ग्रॅम बियाणे लागते. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात गादी वाफ्यावर बियांची पेरणी करावी. बियांची पेरणी एकदम न करता ८ ते १० दिवसांच्या अंतराने ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
  • बियाणे गादीवाफ्यावर पेरल्यानंतर सर्व गादी वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकून घ्यावे. बियांचे अंकुर दिसू लागल्याबरोबर प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा.
  • रोपे प्लॅस्टिक ट्रेमध्ये तयार करता येतात. यासाठी निर्जंतुक केलेले कोकोपीट माध्यम म्हणून वापरून बी प्लॅस्टिक ट्रेमध्ये पेरून घ्यावे. बियाणे ट्रेमध्ये पेरल्यावर ट्रे एकावर एक ठेवून प्लॅस्टिक पेपरने झाकावेत. बियाण्याची उगवण झालेली दिसल्यावर प्लॅस्टिक पेपर काढून ट्रे पॉलिहाउस किंवा शेडहाउसमधील वाफ्यावर पसरवून ठेवावेत. बियाण्याची उगवण सहा दिवसांत चालू होते.
  • रोपांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शिफारशीत कीडनाशकाच्या दोन फवारण्या कराव्यात.
  • रोपवाटिकेत रोपांच्या वाढीच्या काळात रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअस व दिवसाचे तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस असावे. या तापमानामध्ये बियाण्याची उगवण व रोपांची वाढ जोमाने होण्यास मदत होते.
  • रोपवाटिकेतील वाफ्यावरील व ट्रेमधील रोपांना पाणी देताना प्रत्येक वेळी १.५ ग्रॅम कॅल्शिअम नायट्रेट आणि दोन ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून रोपांना द्यावे.
  • रोपे पुनर्लागवडीसाठी २० ते २५ दिवसांत तयार होतात. या वेळी रोपांना सहा पाने व उंची दहा सें.मी. असते. रोपांची पुनर्लागवड करण्याच्या एक दिवस अगोदर रोपांना पाणी देऊ नये.
  • रोपांची पुनर्लागवड :

  • रोपवाटिकेत तयार झालेल्या रोपांची पुनर्लागवड बाहेरील क्षेत्रात ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यांत करावी. पारंपरिक पद्धतीने सरी- वरंबे अथवा सपाट वाफ्यांत लागवड करतात. या पद्धतीत मध्यम वाढीच्या जातीसाठी ६० सें.मी. × ६० सें.मी. आणि उंच व जोमदार वाढीच्या जातीसाठी ७० सें.मी. × ७० सें.मी. अंतर ठेवावे.
  • बुटक्‍या जाती किंवा सर्व स्प्राऊट एकदम (एकाच काढणीत) तयार होऊन सर्व पीक एकाचवेळी निघणाऱ्या जातींची लागवड  ६० सें.मी. × ४५ सें.मी. अंतरावर करावी.
  • हरितगृहातील लागवड :

  • एक एकर हरितगृहात लागवडीसाठी रोपे तयार करण्यास २१ ग्रॅम बियाणे पुरेसे होते. हरितगृहात लागवडीसाठी मध्यम उंचीच्या जातीसाठी प्रत्येक वाफ्यावर ५० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. दोन गादी वाफ्यांमधील अंतर ६० सें.मी. ठेवावे. रोपे लावताना गादी वाफ्याच्या मधोमध सरळ रेषेत ५० सें.मी. दोन रोपांत अंतर ठेवून लावावे. एक एकर हरितगृहात ७,२७२ रोपांची लागवड होते.
  • उंच असणाऱ्या जातीसाठी प्रत्येक वाफ्यावर ६० सें.मी. अंतर ठेवून वाफ्याच्या मधोमध सरळ रेषेमध्ये लागवड करावी. दोन गादी वाफ्यांमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे. या पद्धतीने एकरी एकूण ५,५५५ रोपांची लागवड होते. बाहेरील क्षेत्रातसुद्धा उंच वाढीच्या जातींसाठी गादी वाफ्यावरील रोपे लागवडीचे अंतर वर सांगितल्याप्रमाणेच ठेवावे.
  • रोपांची पुनर्लागवड मुख्यत्वे दुपारनंतर करावी. लागवड करताना प्रत्येक ठिकाणी एकच जोमदार रोप लावावे. रोपांची लागवड  करण्यापूर्वी रोपे शिफारस केलेल्या कीडनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत.
  • पाणी व्यवस्थापन :

  • पारंपरिक सरी पद्धतीने रोपांना पाणी दिल्यास स्प्राऊटची प्रत समाधानकारक मिळत नाही. म्हणून लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन स्प्राऊटची प्रत चांगली मिळण्यास मदत होते.
  • पिकाला किती लिटर पाण्याची दररोज संभाव्य गरज आहे हे प्रथम निश्‍चित करून दररोज ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन करावे.
  • रोपेवाढीच्या काळात कोरडे वातावरण असल्यास किंवा पाणी कमी पडल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. विशेषतः बी उगवताना, रोपांची वाढ होताना आणि फळधारणा होऊन स्प्राऊट पोसताना पुरेसे पाणी द्यावे.
  • प्लॅस्टिक मल्चिंग :

  • रोपे गादी वाफ्यावर लागवड करण्याच्या अगोदर वाफ्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करणे फायद्याचे ठरते, कारण यामुळे जमिनीलगतचे तापमान नियंत्रित राहून बाष्पीभवन कमी होते, तसेच तणांच्या वाढीचे नियंत्रण होत असल्याने मजुरीचा खर्च वाचतो. स्प्राऊटची प्रत चांगली मिळते.
  • आंतरमशागत :

  • खुरपणी करताना रोपांच्या सभोवतालची माती हलवून भुसभुशीत करावी. आवश्‍यकतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.  
  • पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये खुरपणी करताना खताचे दोन हप्ते बांगडी पद्धतीने द्यावेत. लगेच पाणी द्यावे.
  • खत व्यवस्थापन :

  • चांगले उत्पादन मिळण्यासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा.
  • प्रति एकरी लागवडीच्या अगोदर पूर्वमशागत करताना चांगले कुजलेले १५ टन शेणखत मिसळून द्यावे. एकरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
  • पारंपरिक पद्धतीत लागवडीपूर्वी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश खतांच्या मात्रा जमिनीत मिसळून द्याव्यात. शिल्लक राहिलेली नत्राची मात्रा समान दोन हप्त्यांत द्यावी.
  • दुसरा नत्राचा हप्ता लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी आणि तिसरा नत्राचा हप्ता खोडावर स्प्राऊट लागणे सुरू होण्याच्या वेळेस द्यावा.
  • खतांच्या मात्रांचे प्रमाण जास्त झाल्यास स्प्राऊट पोकळ राहतात, तसेच पालाशची मात्रा जास्त झाल्यास स्प्राऊटला कडू चव येते, प्रत कमी होते.
  • विद्राव्य खतांचा वापर : रोपांची एकसारखी वाढ, स्प्राऊटचा एकसारखा आकार व उत्तम प्रत आणि जादा उत्पादन मिळण्यासाठी या पिकास ठिबक सिंचनाने शिफारशीत प्रमाणात खतमात्रा द्यावी.

    काढणी आणि उत्पादन : 

  • ८० ते ९० दिवसांत स्प्राऊट काढणीस तयार होतात.
  • पिकाची वाढ नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान जोमदार होते. पुढे फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक पानाच्या देठाच्या कोपऱ्यालगत बुंध्यास छोटे छोटे स्प्राऊट दिसायला लागतात. हे स्प्राऊट जमिनीलगत प्रथम लागतात. कालांतराने शेंड्याकडे लागत जातात. स्प्राऊटची उत्तम प्रत व त्यातील सुगंध मिळण्यासाठी स्प्राऊट घट्ट असताना काढणी करावी.
  • जमिनीलगतचे (खालच्या बाजूचे) स्प्राऊट अगोदर पक्व होतात. वरच्या भागांतील स्प्राऊट क्रमाक्रमाने पक्व होतात.
  • स्प्राऊटची पूर्ण वाढ झाल्यावर काढणी चालू करावी. खोडाच्या खालील बाजूस     असलेले स्प्राऊट प्रथम काढणीस तयार होतात.
  • बुटक्‍या जातींत एक ते दोन तोडण्यांत काढणी संपते. उंच जातीच्या झाडांचा शेंडा न खुडल्यास हिवाळ्याच्या अखेरपर्यंत वाढत राहतो. ४ ते ५ टप्प्यांत काढणी पूर्ण होते.
  • चांगल्या प्रकारच्या स्प्राऊटचे गड्डे घट्ट चिकटलेले असतात. रंग गडद हिरवा किंवा फिकट हिरवा असावा. स्प्राऊट पिवळसर रंगाचे नसावेत.
  • स्प्राऊटची खालची पाने मोकळी असल्यास तसेच स्प्राऊट वरून पोकळ राहिल्यास तो कमी प्रतीचा समजला जातो.
  • उत्पादन :

  • प्रत्येक झाडाला जातिपरत्वे सरासरी ५० ते ६० स्प्राऊट लागतात. प्रत्येकाचे सरासरी ८ ते १० ग्रॅम वजन असते. प्रत्येक झाडापासून ४०० ते ६०० ग्रॅम उत्पादन मिळते.
  • मोठ्या गड्ड्यांचे मध्यम- उंच प्रकारच्या जातींपासून एकरी सरासरी चार टन उत्पादन मिळते. सर्वसाधारण एकाच तोडणीत निघणाऱ्या बुटक्‍या जातींपासून एकरी १.२५ ते दोन टन उत्पादन मिळते.
  • प्रतवारी, पॅकिंग :

  • पानांच्या बेचक्‍यातील तयार स्प्राऊट कापून त्यांची प्रतवारी करावी. २ सें.मी.पेक्षा कमी व्यास, २ ते ३ सें.मी. व्यास, ३ ते ४ सें.मी. व्यास आणि ४ सें.मी.च्या पुढे व्यास अशा आकारमानाप्रमाणे प्रतवारी करावी.
  • पॉलिस्टिरीन कोरूगेटेड बॉक्‍समध्ये पॅकिंग करावे. एका बॉक्‍समध्ये दोन किलो स्प्राऊट पॅक करावेत. बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे स्प्राऊटचे पॅकिंग करावे.
  • मोठ्या मॉलमध्ये विक्रीसाठी २५० ग्रॅमपर्यंत प्लॅस्टिक पारदर्शक पनेटमध्ये पॅकिंग करावे.
  • ज्या ठिकाणी पूर्वशीतकरणाची व्यवस्था आहे, तेथे काढणी केल्यावर शून्य अंश सेल्सिअस तापमान व ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये पूर्वशीतकरण पूर्ण झाल्यानंतर पॅकिंग बॉक्‍सेस शून्य अंश सेल्सिअस ते दोन अंश सेल्सिअस तापमानात शीतकरण व्हॅनमधून बाजारात विक्रीसाठी पाठवावेत.
  • साठवणूक :

  • शीतगृहात शून्य अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये १६ आठवडे स्प्राऊट्‌स चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात.
  • २० अंश सेल्सिअस तापमान व ८०- ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये स्प्राऊट प्लॅस्टिक फिल्मध्ये पॅकिंग करून ११ दिवसपर्यंत चांगल्या स्थितीत शीतगृहात साठवून ठेवता येतात.
  • शीतगृहात १० टक्के कार्बन- डाय- ऑक्‍साईड वायू आणि २.५ टक्के प्राणवायूमध्ये शून्य अंश सेल्सिअस तापमानात साठविल्यास स्प्राऊट पिवळसर रंगाचे न होता चांगले टिकतात.
  • पीक संरक्षण : कीड नियंत्रण

  • मावा : पानांच्या बेचक्‍यांत देठांजवळ, गड्ड्यांजवळ असतात. कोवळ्या पानांतील अन्नरस शोषतात. वेळेवर नियंत्रण झाले नाही तर पाने रोगट पिवळी दिसतात. वाढ खुंटते, उत्पादन कमी येते.
  • मोहरीवरील माशी (मस्टर्ड सॉ फ्लाय) : माशी पानांच्या पेशींत अंडी घालते. त्यातून काळपट रंगाच्या अळ्या बाहेर पडून कोवळी पाने खातात.
  • चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) :  अळी पानांच्या खालच्या बाजूस राहून पानांना छिद्रे पाडून पानांतील हरितद्रव्य शोषून घेते. पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते.
  • रोग नियंत्रण :

  • रोप कोलमडणे (डॅंपिंग ऑफ) : हा रोग पिथियम, फायेटोप्थोरा, रायझोक्‍टोनिया बुरशीमुळे होतो. प्रादुर्भावीत रोपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. उष्ण आणि दमट हवेत तसेच रोपवाटिकेत पाण्याचा योग्य निचरा नसल्यास हा रोग दिसून येतो.
  • घाण्या रोग (ब्लॅक रॉट) : हा अणुजीविजन्य रोग आहे. उष्ण आणि दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव होतो. पानांच्या मुख्य आणि उपशिरांमधल्या भागांत पानांच्या कडा मरून इंग्रजी अक्षर ‘V` आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. रोगग्रस्त भाग कुजून वाळून जातो. रोगट भागातील पानांच्या शिरा काळपट पडतात. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास झाडाच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळपट द्रव निघतो, त्याला दुर्गंधी येते.
  • करपा किंवा काळे डाग (ब्लॅक स्पॉट) : या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बियाण्यातून होतो. पाने, देठ आणि खोडावर वर्तुळकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. हे डाग एकमेकांत मिसळून प्रादुर्भाव झालेला भाग करपल्यासारखा काळपट दिसतो. जास्त दमट हवामान असल्यास स्प्राऊटवर डाग दिसतात.
  • केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात हा रोग दिसून येतो. दमट हवामानात रोग झपाट्याने पसरतो. रोगग्रस्त पानावर जांभळट किंवा पिवळट डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर भुरकट केवड्याची वाढ झालेली दिसते.
  • भुरी (पावडरी मिल्ड्यू) : या बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव उष्ण व दमट हवामानात दिसतो. प्रथम जून झालेल्या पानांवर ठिपके दिसतात. कालांतराने हे ठिपके आकाराने वाढून पानांच्या दोन्ही बाजूस व खोडावर पांढरी भुकटी टाकल्याप्रमाणे दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास स्प्राऊटवरसुद्धा पांढरी भुकटी दिसते. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र असल्यास पाने वाळून जातात.
  • संपर्क : डॉ. अरूण नाफडे, ९८२२२६११३२. (लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com