नाशिक : शेतकरी आणि शेती व्यवसायाचे उत्पन्न वाढविणे तसेच शेतीला पर्यटनाची जोड देण्याच्या उद्देशाने १२ मे रोजी ‘कृषी पर्यटनातून शाश्वत ग्रामविकास’ या विषयावर पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील बसवंत गार्डन, मुखेड रोड येथे राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम’चे तांत्रिक संचालक डॉ. भास्कर गायकवाड यांनी दिली.
आनंदी जीवनासाठी कृषी संस्कृती आणि कृषी पर्यटनाचे महत्त्व सांगण्यासाठी बसवंत कृषी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. परिसंवादाचे उद्घाटन ‘अॅग्रोवन’चे संचालक-संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. बी. पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
परिसंवादामध्ये कृषी पर्यटनाची संकल्पना, महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाची सद्य:स्थिती आणि संधी, राज्यातील यशस्वी कृषी पर्यटन उद्योजकांचे मार्गदर्शन तसेच कृषी पर्यटनासाठी शासनाच्या विविध योजना या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ‘महाराष्ट्रात कृषी पर्यटनाच्या संधी व शासनाच्या विविध योजना’ या विषयावर मधुमती सरदेसाई-राठोड मार्गदर्शन करणार आहेत.
‘मधमाशीपालन व त्या अनुषंगाने कृषी पर्यटन’ या विषयावर ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम’चे संचालक संजय पवार हे मार्गदर्शन करतील. सगुणा बागचे (नेरळ, जि. रायगड) संचालक चंद्रशेखर भडसावळे हे ‘सगुणा बागेची यशोगाथा’ व पराशर कृषी पर्यटन केंद्राचे (राजुरी, जि. पुणे) संचालक मनोज हाडवळे हे ‘पराशर कृषी पर्यटनाची यशोगाथा’ सांगणार आहेत. डॉ. भास्कर गायकवाड हे ‘कृषी पर्यटन सध्य:स्थिती आणि संधी-एक दृष्टिक्षेप’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मुक्त चर्चा झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. परिसंवाद विनामूल्य असून, प्रवेश संख्या मर्यादित स्वरूपात निर्धारित असल्यामुळे आपली नावनोंदणी www.baswant.com या संकेतस्थळावर करावी किंवा नितीन कराळे (मो. नं. ७७७४०८९५१७) यांच्याशी संपर्क साधून या परिसंवादामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.